>> उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन
>> पेडण्यात आंबिये महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन
माहिती तंत्रज्ञान युगात आज सर्व क्षेत्रात देशाचा विकास होत आहे. शिक्षणक्षेत्रातही विविध प्रकारचे प्रयोग होत आहेत. अशावेळी गोवा शिक्षणात देशातील एक अग्रगण्य राज्य म्हणून नावारूपास येणार आहे. त्यासाठी सर्वांनी आणि खास करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरीद्वारे आपला ठसा सर्व क्षेत्रात उमटवावा. जेणेकरून आपल्या राज्याची ओळख देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर पोहोचेल असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विर्नोडा पेडणे येथे केले.
विर्नोडा पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभासाठी उपराष्ट्रपती नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यावेळी खास निमंत्रित पाहुणे म्हणून राज्यपाल श्रीधरन पिलाई, निमंत्रित पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, आमदार दयानंद सोपटे, मुख्य सचिव परिमल राय उपस्थित होते.
गोव्यात उत्कृष्ट सुविधा
उपराष्ट्रपती नायडू यांनी पुढेे, गोवा राज्यात साधनसुविधा चांगल्या असून सरकारमार्फत विविध क्षेत्रांचा विकास होत आहे. चांगल्या साधनसुविधांद्वारे आज शिक्षण क्षेत्र प्रगतशील होत आहे.
माहिती तंत्रज्ञान विभागात सर्व क्षेत्रांचा अभ्यास करून त्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करावी असे आवाहन केले. उपराष्ट्रपतींनी पुढे बोलताना, अठराव्या शतकातील संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या नावाने आज हे महाविद्यालय पेडण्याच्या भूमीत सर्व साधनसुविधांनी युक्त झाले आहे. या महाविद्यालयातून चांगले विद्यार्थी घडावेत. सरकारने चांगला अभ्यासक्रम आणून महाविद्यालयाचा लौकिक वाढवावा असा सल्ला दिला.
सरकार सर्व क्षेत्रांचा विकास करत असताना आर्थिकदृष्ट्याही राज्य आणि देश कसा पुढे जाईल त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न आहेत. विद्यार्थ्यांनी शिकत असताना दुसर्याचा आदर्श घेणे गरजेचे आहे. चांगली मूल्ये, चांगली क्षमता आपल्यामध्ये यावी यासाठी विविध माध्यमांचे शिक्षण आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
महापुरुषांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा
भारत सरकारने २०२० शैक्षणिक धोरण लागू केले असून या धोरणानुसार सर्व शैक्षणिक क्षेत्राचा विकास होणार आहे. महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना उपकुलगुरूंनी शिक्षण आणि अभ्यासक्रमात नवीन क्रांती घडवून आणणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अभ्यासक्रमात बदल व्हायला हवा. थोर महापुरुषांचा इतिहास, आपली संस्कृती जतन करण्यासाठी आणि तो इतिहास भावी पिढीचे आदर्श घेण्यासाठी त्या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रात बदल होणे गरजेचे आहे. या भारत देशाच्या अमृत महोत्सवी वर्षी शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारे आमुलाग्र बदल होत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी बहुआयामी तसेच सर्व क्षेत्रांतील ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन नायडू यांनी केले.
भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू
करण्याची आवश्यकता
भारत हा पूर्वी विश्वगुरू होता आणि त्यामुळे विदेशातील अनेक विद्यार्थी हे भारतात शिक्षणासाठी येत होते. येत्या काळात भारत देशात विदेशातील विद्यार्थी विविध माध्यमांचे शिक्षण घेण्यासाठी परत एकदा येणार असून सर्वांनी यासाठी आपला सहभाग आणि सहकार्य देण्याचे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी भारत हा जगात विश्वगुरू व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
यावेळी उपराष्ट्रपतींनी गोव्याच्या विविध प्रख्यात मान्यवरांचा उल्लेख केला. त्यात भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर, पद्मश्री रेमो फर्नांडिस आदींनी आपल्या कीर्तीने गोव्याची आणि देशाची ओळख निर्माण केल्याचे सांगितले. यावेळी नायडू यांनी, आपल्याला गोव्याबद्दल प्रेम व आत्मियता असल्याचे सांगितले.
युवकांबद्दल बोलताना उपराष्ट्रपती नायडू यांनी, युवक हा तंदुरुस्त असायला हवा. युवा पिढी ही देशाचे बलस्थान आहे. त्यासाठी सर्व क्षेत्रात उत्कृष्ट होण्यासाठी मेहनत घ्यावी. आजच्या युवकांनी बाहेरचे फ्रोजन फूड तसेच बर्गर, पिझ्झा वगैरे न खाता घरगुती अन्नाला प्राधान्य द्यावे असे सांगितले.
शिक्षणात गोवा प्रथम ः मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, शिक्षण क्षेत्रात गोवा राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. ते प्रथम क्रमांकावर आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विविध प्रकारच्या साधनसुविधा, शैक्षणिक सुविधा गोवा सरकारने राज्याला दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रगतिशील राज्य म्हणून गोव्याचा लौकिक आहे.
पेडण्याच्या भूमिला इतिहास आहे. या भूमीत अनेक नामवंत कलाकार आणि संत, स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. या भूमीत आज हे महाविद्यालय सर्व सोयीयुक्त होत आहे आणि या महाविद्यालयाचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्या असे आवाहन केले. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्वागत केले. आभार मुख्य सचिव परिमय राय यांनी मानले.कार्यक्रमाला उच्च शिक्षण मंडळाचे संचालक प्रसाद लोलयेकर, विर्नोडाच्या सरपंच अपर्णा परब, पेडण्याच्या नगराध्यक्ष उषा नागवेकर, नगरसेवक, विविध पंचायतीचे सरपंच, पंच, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.