शिक्षक दिनाचा ‘गुरू उत्सव’ करण्यास कॉंग्रेसचा विरोध

0
95

गेल्या कित्येक वर्षांपासून देशात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून पाळण्यात येतो. या दिनाचे नामकरण ‘गुरू उत्सव’ म्हणून करण्याचा सरकारचा विचार सुरू असून या प्रयत्नास कॉंग्रेस विधिमंडळाचे प्रवक्ते आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विरोध केला आहे.
यंदा दि. ५ रोजी शिक्षकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनावर भाषण करणार असून दुपारी ३ ते ४.४५ यावेळेत त्यांचे भाषण प्रक्षेपित केले जाईल. त्यासाठी सर्व शाळा प्रमुखांना शाळा, विद्यालयांमध्ये व्यवस्था केली जावी, अशा आशयाचे परिपत्रक शिक्षण खात्याने सर्व शाळा, पालिकांना पाठविले आहे. त्यासाठी सरकारने शिक्षकांना संध्याकाळी ५ पर्यंत शाळेत थांबण्याची सक्ती केली आहे. सरकारच्या या निर्णयास लॉरेन्स यांनी हरकत घेतली आहे.
शालेय वेळेतच पंतप्रधानाचे भाषण ऐकण्याची व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रत्येक शाळेत दरवर्षी शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, पंतप्रधानांच्या नावाने शिक्षकांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न का? असा प्रश्‍न त्यांनी केला आहे.
प्रक्षेपण दाखवण्याची शिक्षण खात्याची सूचना
दरम्यान, सरकारने शिक्षकदिनी शाळा विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दुपारी ३ ते संध्याकाळी ४.४५ वा. यावेळेत पंतप्रधानांचे प्रक्षेपित केले जाणारे भाषण दाखवण्याची सूचना करणारे परिपत्रक शिक्षण खात्याने शाळांना धाडले आहे. विद्यार्थ्यांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्याची सूचना संबंधितांना खात्याने केली आहे. ज्या शाळांना वरील व्यवस्था करणे अडचणीचे होऊ शकेल, अशा शाळांच्या प्रमुखांना पंचायतीकडे संपर्क करून व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. या प्रकारामुळेही गोंधळ उडण्याची शक्यता आहे.