शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते सुदृढ हवे

0
2704
  •  देवेश कु. कडकडे (डिचोली)

पावित्र्य, सदाचार, विश्‍वास, ज्ञान, सुख आदी सगळ्या शब्दांचा पर्याय हा शिक्षकच आहे. नैतिकता आणि चारित्र्य हेच शिक्षकांचे खरे भांडवल असते. तेच संपन्न असले पाहिजे. उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त –

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्वज्ञ आणि शिक्षकांचे आदर्श डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उद्या ५ सप्टेंबरला ‘शिक्षक दिन’ म्हणून देशात सर्वत्र साजरी केली जाते. खरा आदर्श शिक्षक कसा असावा, त्याने आपली कर्तव्ये कशी पार पाडावीत याचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. शिक्षक हा समाजात सदैव पूजनीय असतो. शिक्षक ही समाजाची आधारशीला असून तोच राष्ट्राचे भविष्य निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो. शिक्षकाला ईश्‍वराचा दर्जा दिला आहे. त्यांना अध्ययन, अध्यापन करणार्‍या ऋषीमुनींचे वारसदार म्हटले आहे. राष्ट्रसंपन्न, सामर्थ्यशाली, स्वावलंबी आणि प्रगत होते ते त्या राष्ट्राच्या शिक्षणाच्या दर्जावरून आणि हे कार्य करण्याचे शिवधनुष्य केवळ शिक्षकच पेलू शकतो.

शिक्षकांना आपल्या व्यवसायात अनेक भूमिका बजावाव्या लागतात. पालक, सल्लागार, आदर्श व्यक्ती, मित्र आणि शिस्त लावणारा अशा अनेक भूमिका ते बजावतात. आजही अनेक शिक्षक आपल्या आदर्श पदपथावरून चालत एक आदर्श समाज निर्माण करण्याची परंपरा चालवत आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते जितके सदृढ असेल तेवढे सक्षम नागरिक भविष्यात उभे राहणार आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते गुरु-शिष्यासारखेच असायला हवे. शिक्षकांचा आदर केलाच पाहिजे, ही शिकवण विद्यार्थ्यांना देताना शिक्षकांनीही आपले कार्य निष्ठेने करायला हवे.

संगणक युगामध्ये विद्यार्थ्यांना इंटरनेटवरून माहितीचे जाल खुले झाले तरी ते आत्मसात करण्यास अपुरे आहे. ते विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यास, त्याचे नीट आकलन होऊन त्याचा वापर शिक्षण पद्धतीत करण्यास शिक्षकांचे मार्गदर्शन अपरिहार्य असते. विद्यार्थ्यांना आपल्या विषयी प्रेम व आदर निर्माण होण्यासाठी कितीतरी गोष्टी कराव्या लागतात. शिक्षक शिस्तप्रिय हवाच. मात्र,शिस्त अती करडी आणि अती ढिसाळ नसावी. विद्यार्थी शिक्षकांशी सहज हितगुज करेल असे त्याचे व्यक्तिमत्त्व असावे.

अनेक शिक्षक अध्यापनात कुशल आणि उत्कृष्ट असूनही करडी शिस्त, तापट आणि मारकुट्या स्वभावामुळे विद्यार्थ्यांमध्ये अप्रिय असतात. काही मुले अभ्यासात कच्ची असतात, गृहपाठ करतच नाहीत. त्यांच्याबद्दलचा नकारात्मक दृष्टीकोन बदलून समस्या कौशल्याने सोडवायला हव्यात. गेल्या दीडशे वर्षांत आम्हाला शिक्षणाने केवळ बुद्धीवान आणि तर्कवादीच बनवले. आजच्या शाळा या केवळ बुद्धिमान मुलांसाठीच आहेत. सामान्य मुलांना आपल्या शाळा कधीही वर काढू शकत नाहीत. शाळा, शिक्षक ही केवळ चांगल्या, भल्या, हुशार मुलांसाठी नसून सर्वांसाठी असायला हवी. काही मुले शाळेच्या नियमाविरुद्ध वागतात. शिस्त बिघडवतात. त्यांना शेवटी शाळेतून काढून टाकले जाते. पुढे हीच मुले समाजासाठी धोकादायक बनतात आणि समाजाची शत्रू बनतात.

शिक्षकांचा पहिला धर्म सर्वांच्या शिक्षणासाठी समभावनेनेे झटणे हा आहे. समाजाला राजकीय आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हा आहे. श्रीमंत आणि गरीब, उच्च नीच हा भेदभाव शैक्षणिक धोरणाला कलंक फासणारा आहे. आम्हाला आमच्या शाळेची, आमच्या अध्यापनाची अशी प्रणाली बनवली पाहिजे. ज्यातून शिक्षक हा अशा व्यवसायाशी निगडित असेल जो समाजाच्या वैभवशाली भविष्याची निर्मिती करील.

आज शिक्षकांना वाटते की, पालकांना आपल्या पाल्यांची पर्वा नाही. पालकांना वाटते की, शिक्षक विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत आणि मुलांना वाटते की, दोघेही आपल्याला समजून घेत नाहीत, तसेच शाळा संचालकांचे यातून कसा आपला उद्योग वाढवता येईल आणि मंडळाची सांपत्तिक स्थिती, प्रतिष्ठा आणि राजकीय वर्चस्व कसे अबाधित राहील याकडे जास्त लक्ष असते. अनेक शाळांत मुलांना नववीपर्यंत पास केले जाते. परिणामी ही मुले दहावीत नापास होतात आणि शाळेला रामराम ठोकतात. शिक्षणाचे झालेले बाजारीकरण आज देशापुढे सर्वांत मोठे आव्हान आहे. शिक्षक बनण्याचा ज्यांच्याकडे एकही गुण नाही ते शिक्षक बनले आहेत. मुलांना समभावनेने न शिकवणे, वरिष्ठांची हांजीहांजी करणे असे शिक्षक या शिक्षकी पेशाला कलंकित करत आहेत.

विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संबंध जिव्हाळ्याचे असायला हवेत. तसेच मजबूत समाज घडविण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा मिळून भक्कम सेतू बांधण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी स्वतःमध्ये ज्या उणिवा आहेत त्या दूर केल्या तर आपले अध्ययनाचे कार्य अधिक प्रभावशाली आणि योग्य रीतीने करू शकेल. आजच्या माहितीयुगात विद्यार्थी आणि सातत्याने शिक्षक असल्यामुळे शिक्षकांनी आपली कार्यतत्परता वाढवली पाहिजे. शिक्षकांनी ग्रंथालयात जाऊन अत्याधुनिक पुस्तके, मासिके यांचा उपयोग करून आपली ज्ञानलालसा सतत जागृत ठेवली पाहिजे. जो रात्रंदिवस ज्ञान मिळविण्यासाठी धडपडतो आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देतो, तोच खरा तळमळीने कार्य करणारा शिक्षक असतो आणि तिच त्याची खरी कर्तव्यपरायणता असते. आपल्या वाट्याला आलेले कार्य कुशलतेने, आनंदीवृत्तीने, बिनचूकपणे, वेळेत, नियमांच्या अधीन राहून करायला हवे.

आज अनेक शिक्षक केवळ वर्गात शिकवून मोकळे होतात, तर काही शिक्षक पूर्वतयारी न करता वर्गात पुस्तक उघडून धडाधड पाठ वाचत सुटतात. नंतर गृहपाठ देऊन मोकळेे होतात. आपण काय शिकवले हे विद्यार्थ्यांच्या डोक्यात शिरले की नाही याबद्दल आस्था नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीचे बहुधा निवारण होत नसल्यामुळे ते गाईडचा उपयोग करतात, नाही तर शिकवणीवर भर देतात. आज अनेकजण शिक्षक बनतात ते आवडीने नव्हे तर धनसंपत्ती आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी.

गावांतील शाळांत अजूनही छडी लागे छम छम, विद्या येई घम घम अशाच पद्धतीने शिकवले जाते. शिक्षकांनी मुलांवरचे दडपण कमी केले तर वर्गातील वातावरण प्रेरणादायी होऊन शिक्षण आनंदमय होईल.

आज शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अनेक कामे करावी लागतात. जनगणना, रेशनकार्ड तसेच इतर सर्व्हेक्षण करणे, सतत निवडणुकांची कामे यामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यात व्यत्यय येऊन ते यथायोग्य पार पडत नाहीत. तसेच एका वर्गामध्ये मुलांची भरमसाट संख्याही काही शिक्षकांसमोरील मोठी समस्या आहे.
अनेक शिक्षकांना त्यांच्या शिक्षणकार्यात अडथळा बनणारा समाज आणि शासनाशी लढावे लागते. तेव्हा काही शिक्षक समाज आणि शासनाला अनुकूल राहून कार्य करतात. अन्यथा राजकीय दबावामुळे अनेक शिक्षकांच्या बदल्या लांब ठिकाणच्या त्रासदायक ठिकाणी होतात. अनेक पालकांना आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना कळत नाही की, शिक्षकांचे काम किती अवघड आहे. शैक्षणिक जीवनात शिक्षकचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

पावित्र्य, सदाचार, विश्‍वास, ज्ञान, सुख आदी सगळ्या शब्दांचा पर्याय हा शिक्षकच आहे. नैतिकता आणि चारित्र्य हेच शिक्षकांचे खरे भांडवल असते. तेच संपन्न असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या सुसंस्कारित आदर्शवादी जीवनाचे श्रेय शिक्षकांना दिले तर शिक्षकी जीवन सार्थ आणि धन्य होते.