>> आरोग्य व शिक्षण सचिव नीला मोहनन यांची माहिती
ाज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना घरातून काम करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या आदेशानंतर शिक्षण खात्याने शिक्षकांना घरातून काम करण्यासंबंधीचा नवा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला असून योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असे आरोग्य व शिक्षण सचिव नीला मोहनन यांनी सांगितले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. काल राज्यात १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहितीही त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्रालयाच्या आदेशानंतर शिक्षण खात्याने शिक्षकांना घरातून काम करण्यासंबंधीचा नवा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला असून योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असे आरोग्य व शिक्षण सचिव मोहनन यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रालयाचा शिक्षकांना घरातून काम करण्यासंबंधीचा आदेश जारी होण्यच्या पूर्वी शिक्षण खात्याने शिक्षकांच्या शाळांतील उपस्थिती बाबतचा आदेश जारी केला आहे, असेही मोहनन यांनी सांगितले.
बांबोळीत प्लाझ्मा बँक सुरू
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली असून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळामध्ये प्लाझ्मा बँक सुरू करण्यात आली असून प्लाझ्मा दानासाठी इच्छुक काही दात्यांनी संपर्क साधला आहे, अशी माहिती मोहनन यांनी दिली.
कोविड औषधांचा तुटवडा नाही
राज्यात कोविड रुग्णांवरील उपचारांसाठी औषधांचा तुटवडा नाही. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व औषधांचा साठा उपलब्ध आहे. तसेच औषधांच्या नवीन ऑर्डर सुध्दा देण्यात आलेल्या आहेत. राज्यात पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. केंद्र सरकारकडून ते मिळाले आहेत. तसेच राज्य सरकारकडून खरेदी केले आहेत, असे आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.
मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये कोरोना पॉझिटिव्ह ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ७८३ जणांवर विविध कोविड केअर सेंटरवर उपचार सुरू आहेत.
शिक्षण खात्यातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सदर कार्यालय बंद करण्यात आले असून सहवासातील १९-२० कर्मचार्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे मोहनन यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांच्या ऍन्टीबॉडी तपासणीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कीटच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील आठवड्यापासून ऍन्टीबॉडी तपासणीला सुरुवात केली जाऊ शकते, असेही मोहनन यांनी सांगितले.
आमदार डायस यांची प्रकृती स्थिर
कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावरील वैद्यकीय उपचाराबाबत कोणतीही हयगय केली जात नाही. आमदार डायस यांना नॉन इनव्हान्सिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे. केवळ आमदाराला चांगली वैद्यकीय सुविधा दिली जात नाही. तर, इस्पितळामध्ये सर्वच रुग्णांना समान वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली जात आहे. कोरोना रुग्णांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, असे मोहनन यांनी सांगितले.
कोलवाळ कारागृहातील २०३ स्वॅब नमुने तपासले
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील जेलगार्ड, कर्मचारी व इतरांच्या स्वॅबचे नमुने घेण्याचे काम सुरू असून कोरोना बाधित नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. कारागृहातील २२६ जणांच्या स्वॅबचे नमुने काल घेण्यात आले आहेत. यापूर्वी २०३ जणांच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली असून सर्व नमुने निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत, अशी माहिती मोहनन यांनी दिली.