शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह

0
7

>> निवडणूक आयोगाचा निर्णय; तळपता सूर्य, पिंपळ झाड चिन्ह नाकारले

शिवसेनेच्या शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह काल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्याय दिले, त्यातील ढाल-तलवार चिन्ह त्यांना देण्यात आले.

निडणूक आयोगाने सोमवारी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नवी नावे दिली होती. त्यात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले होते. शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले होते, तर शिंदे गटाला दुसर्‍या तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून काल ढाल-तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचे झाड अशी तीन चिन्हे देण्यात आली होती. त्यातील ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले.

शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि त्यामध्ये ढाल आहे. तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटाने पहिल्या पसंतीस दिले होते; परंतु निवडणूक आयोगाने हे चिन्ह शिंदे गटाला नाकारले; कारण उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यामध्ये गोंधळ होऊ शकतो. उगवता सूर्य हे पहिल्यापासूनच डीएमके पक्षाचे चिन्ह आहे. याबरोबरच मिझोराम नॅशनल पक्षाचे देखील तळपता सूर्य हे चिन्ह आहे. त्यामुळे शिंदे गटाला तळपता सूर्य हे चिन्ह नाकारण्यात आले.

शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्हं दिल्यानंतर प्रवक्ते भरत गोगावले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. आम्हाला एकदम योग्य चिन्ह मिळाले आहे. ढालीने जनतेचे रक्षण करायचे आणि कोणी अंगावर आले, तर तलवार समोर धरायची. ढाल आणि तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असून, आमच्यासाठी ही चांगली बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.