शिंदेंची शिवसेना गोव्याच्या राजकारणात

0
12

>> गोव्यात ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करणार; आनंदराव अडसूळ यांची माहिती

>> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवेसेनेने गोव्यातील राजकारणात

उतरण्याचा निर्णय घेतला असून, विकास, स्थिरता व चांगले प्रशासन हे महाराष्ट्रातील मॉडेल गोव्यात राबवण्याची आपली योजना असल्याचे काल शिंदे गटाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना आपल्या पक्षाच्या गोव्यातील भावी योजनांविषयी पत्रकारांना माहिती दिली.
धनवर्षा समुहाचे चेअरमन अंशुमन जोशी यांनी यावेळी आनंदराव अडसूळ यांचे स्वागत केले व गोव्यात उद्योजकता विकास व आर्थिक वाढीस चांगला वाव असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना आनंदराव अडसूळ यांनी शिंदे गटाची शिवसेना ही सुशासनासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांच्या पक्षाचा सुशासनासाठीचा महाराष्ट्र मॉडेल गोव्यात लागू केल्यास राज्यात सकारात्मक असे बदल निश्चितच दिसून येणार असल्याचे स्पष्ट केले. महाराट्र मॉडेलमधून साधनसुविधा विकास, रोजगार व उद्योजकता विकास यावर भर देण्यात आलेला असूनख हाच मॉडेल शिंदे गटाची शिवसेना गोव्यात लागू करू पाहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अन्य पक्षांप्रमाणे शिवसेना मतदारांना काहीही मोफत देण्याचे आमिष दाखवत नसल्याचे सांगून आमचा भर हा चांगले प्रशासन, विकास, उद्योजकता व रोजगार यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोव्यात वेगवेगळे धर्म, जाती, पंथ आदींचे लोक आहेत याची पक्षाला कल्पना आहे आणि कोणताही भेदभाव न करता या सर्व लोकांना पुढे घेऊन जाणे व त्यांच्या उन्नतीसाठी हातभार लावणे यावर पक्षाचा भर असेल, असेही त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

19 राज्यांत पक्षाचा शिरकाव
शिंदे गटाची शिवसेना भारतभर आपली पाळेमुळे घट्ट करू पाहत असून, त्यासाठीच 19 राज्यांत पक्षाने शिरकाव केला असल्याचे अडसूळ यांनी स्पष्ट केले. आता पक्षाने गोव्यातही आपल्या विस्ताराची योजना आखली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात सदस्यता मोहीम राबवणार : अडसूळ
शिवसेना राज्यात व्यापक स्वरुपात सदस्यता मोहीम हाती घेणार असल्याचे यावेळी आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेचे चिन्ह धनुष्य बाण हे भारतीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिल्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष आता राष्ट्रीय स्तरावर आपला विस्तार करण्यासाठी सज्ज झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.