शाही ईदगाह मशिदीचे एएसआय सर्वेक्षण होणार

0
0

>> मथुरेतील कृष्ण जन्मभूमी खटल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

मथुरेतील शाही ईदगाह मशीद ही कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली आहे, असा दावा करत हिंदू संघटनांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणी न्यायालयाने काल महत्त्वाचा आदेश देत शाही ईदगाह मशीद परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली. या सर्वेक्षणासाठी विशेष आयुक्तांची नियुक्ती केली जाईल. या सर्वेक्षणात किती लोक सहभागी होतील? सर्वेक्षण कधी सुरू केले जाईल? मशीद परिसरातील कोणकोणत्या भागांचे सर्वेक्षण केले जाणार? याबाबतचा निर्णय 18 डिसेंबर रोजी घेतला जाईल. हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू जैन यांनी या प्रकरणी न्यायालयाकडे तीन आयुक्तांची नुियक्ती करावी अशी मागणी केली होती.

हिंदू पक्षकारांनी डिसेंबर 2022 मध्ये मथुरा न्यायालयात विवादित परिसराच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती. मथुरा न्यायालयाच्या मंजुरीनंतर मुस्लीम पक्षकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आता उच्च न्यायालयानेही या सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे.
भगवान श्री कृष्ण विराजमान ट्रस्ट आणि इतर सात जणांनी विधीज्ञ हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभाष पांडे आणि देवकी नंदन यांच्या माध्यमातून अलाहाबाद उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेद्वारे मशीद परिसराचे एएसआय सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. हिंदू पक्षकारांनी न्यायालयात दावा केला आहे की, भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या या जमिनीवर पूर्वी श्रीकृष्णाचे भव्य मंदिर होते. हे मंदिर पाडून तिथे मशीद बांधण्यात आली आहे. या संपूर्ण परिसरात श्रीकृष्णाचे प्राचीन मंदिर होते, जे औरंगजेबाच्या काळात पाडण्यात आले.