शासकीय योजनांचे जनजागरण

0
537

– श्रीकांत कासकर
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्रालयाच्या पणजी येथील पत्र सूचना कार्यालयाने पेडण्यापासून पैंगीणपर्यंत लोक माहिती अभियाने आयोजित करून गोव्यात सर्वच केंद्र सरकारच्या विविध योजनांचे जनजागरण केले. ग्रामीण भागातील जनता केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत अनभिज्ञच असते. कार्यकर्त्यांच्या माध्यमामार्फत खरे तर या योजना जनतेपर्यंत पोचणे आवश्यक असते. परंतु अलिकडे राजकारण ८० टक्के व २० टक्के विकासाला प्राधान्य असे समीकरण असल्यामुळे बर्‍याचशा योजना कागदावरच राहतात, त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे उपेक्षित, दुर्बल घटक योजनांपासून वंचित राहतो. किंबहुना आपल्यासाठी अशा स्वरूपाच्या योजना आहेत हे त्यांना माहितही नसते. त्यामुळे बर्‍याचवेळा विकासयोजनांवरची रक्कम पडून राहते किंवा परत जाते, असे प्रकार बर्‍याचवेळा घडतात. सरकार व जनता यांमध्ये कार्यकर्ते, स्वेच्छा संस्थांनी दुवा म्हणून काम करणे आवश्यक ठरते. विकास योजनांची परिणामकारक अंमलबजावणी झाली तरच सरकारला अपेक्षित असलेले लोककल्याण साधू शकते.पत्र सूचना कार्यालयाने प्रथम पेडण्यासारख्या ग्रामीण भागात अशा स्वरूपाचे अभियान आयोजित करून योजनांबाबत जनजागरण केले. आधारकार्ड, जनधन योजना, जननी सुरक्षा किंवा कृषी क्षेत्रातील अनेक योजनांबाबत जागृती करून ग्रामीण शेतकरी व महिलांपर्यंत योजना पोचविल्या. खरे तर सरकारी योजना आपल्या दारी अशीच या अभियानाची संकल्पना होती. पेडण्यानंतर मडगाव, बार्देश गटातील म्हापसाजवळील पर्वरी व नंतर काणकोण तालुक्यातील पैंगीण येथे अभियाने आयोजित करून संपूर्ण गोवाभरच जनजागरणाची मोहिम उघडली. त्याला स्थानिक जनतेकडून अपेक्षित असा सहभागही मिळाला. हे अभियानाच्या यशस्वीतेचे गमकच म्हणावे लागेल. केंद्र सरकारने अलिकडच्या काळात लोकाभिमुख असे काही झटपट निर्णय घेतले, त्यामुळे लोकांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. लोकांना दिलासा मिळेल अशाच त्या योजना आहेत. या योजनांची परिणामकारक लोकांत जागृती झाली तरच त्याचे परिणामही चांगले दिसून येतील, हाच अभियानामागचा उद्देश! मुलींसाठी ‘बेटी बढाव, बेटी पढाव’ योजना असो किंवा अन्नधान्य व्यवस्थापनाबाबतही घेतलेला निर्णय ग्रामीण, दुर्बल घटकांतील जनतेला दिलासा देणारा असाच आहे. आवश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणून महागाईची झळ कमी करण्याचा प्रयत्न नव्या सरकारने केला आहे. हे निश्‍चितच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांत समाधान पसरवेल, असाच आहे.
साठेबाजांवर नियंत्रण आणण्यासाठी बटाटे व कांदे या वस्तूंना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ठ करून त्यांचा साठा करण्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. एवढे करून सरकार थांबले नाही तर आवश्यक वस्तूंच्या किंमतीवर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणाही स्थापन करण्याची सूचना केंद्राने राज्य सरकारला केली आहे. एकात्मिक राष्ट्रीय ग्राहक मदत वाहिनीसुद्धा सार्वजनिक प्रशासन संस्थांमार्फत सुरू करण्यात आली आहे. देशातील अन्नधान्य व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाची पुनर्रचना करण्याच्यादृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. देशातील सर्वच दुर्बल घटकांना बँकांत सामावून घेण्यासाठी ‘जन-धन’ योजनांही देशात सर्वत्र लागू करण्यात आली आहे.
अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी फुगड्या, पाककला स्पर्धा, विविध कला गुणाविष्कार स्पर्धा घेऊन त्यांना सहभागी करून घेतले जाते. महिलांचा सहभाग त्यादृष्टीने आवश्यक असतो तरच त्या योजना कुटुंबा-कुटुंबांपर्यंत पोचतात. पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या सर्वच अभियानात महिलांचा लक्षणीय असा सहभाग होता. त्यामुळे अभियानांची यशस्वी सांगता झाली. प्रधानमंत्री जनधन योजना, मुलींना वाचवा, मेक इन इंडिया, शहरांचे आधुनिकीकरण, ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, सर्वांसाठी आरोग्य, अनुसूचित जाती-जमाती कल्याण योजना, दीनदयाळ उपाध्याय योजना इत्यादी बर्‍याचशा केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण जनतेपासून दूरच राहिल्या होत्या. या सर्व योजनांबाबत जनजागरण व्हावे हाच अभियानामागचा उद्देश होता. या अभियानांद्वारे ग्रामीण भागात सरकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत वातावरण निर्मिती झाली. प्रत्यक्ष ग्रामीण भागातील जनताच अशा अभियानातून सहभागी होऊन आपल्याबाबत असलेल्या योजनांबाबत जागरूक होऊ लागली.
पैंगीण येथे परशुराम देवालयाच्या सभागृहात तीन दिवस चाललेल्या अभियानात स्थानिक जनता, शासकीय अधिकारी, बचत संस्थांचे प्र्रतिनिधी, महिला मंडळे, युवक क्रीडा संस्था, वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. विविध खात्याच्या अधिकार्‍यांनी उपस्थितांना विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळा, चर्चासत्रे, फिल्म शो तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे योजनांची माहिती देण्यात आली. गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी आपल्या उद्घाटन भाषणात उद्बोधक अशी माहिती देऊन जनतेच्या मनात असलेल्या शंका-कुशंकांचेही परस्पर निवारण केले. विकलांग, आणि दीन-दुबळ्यांच्या विकासासाठी समाज सुदृढ व सक्षम बनविणे आवश्यक असल्याची गरज प्रतिपादन केली. कुशल कामगारांची गरज असून त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. मनुष्यबळाचे संसाधनात रूपांतर करण्यासाठी कौशल्य विकास ही काळाची गरज आहे. त्यासाठी युवकांनी पांढरपेशा नोकरीच्या मागे न धावता सरकारी योजना व कौशल्य यांची सांगड घालून नव्या संधी शोधण्याची गरजही पटवून दिली. स्थानिक पातळीवरील उदाहरण देताना त्यांनी काणकोणात जून ते नोव्हेंबरपर्यंत सुमारे अडीच कोटी रुपयांची जाईची फुले विकली जातात त्यावर प्रक्रिया करण्याची गरज प्रतिपादली. पेडणे किंवा काणकोणसारख्या शहरांपासून दूर असलेल्या ग्रामीण भागात काजू, आंबे, फणस यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या स्थानिक मालांवर प्रक्रिया करणारे उद्योग युवकांनी सुरू केल्यास स्वयंरोजगाराच्यादृष्टीने वाटचाल होईल. त्यासाठी सरकारच्या योजनांचा लाभ घेतला तर ग्रामीण भागातील दरडोई उत्पादन वाढवण्यास मदत होईल. हा विचार ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांनी अंमलात आणण्याच्यादृष्टीने पावले उचलली तरी अभियानाचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. निदान या अभियानांनी योजना मार्गी लागण्यास चालना तरी मिळाली, असे म्हणता येईल. कृषिक्षेत्रातील नवनव्या प्रयोगांची उद्बोधक माहिती कृषितज्ञ विश्राम गावकर यांनी दिली. श्रीहरी आठल्ये यांनी जनशिक्षण संस्थांबाबत माहिती देऊन उपस्थितांचे प्रबोधन केले. कृषी क्षेत्रात नवनव्या प्रयोगांची माहिती खरे तर ग्रामीण भागात पोचत नाहीत अन् ग्रामीण शेतकरी या योजनांबाबत अनभिज्ञच राहतात. अभियानात शेतकर्‍यांना अनेक योजनांची माहिती या निमित्ताने उपलब्ध झाली.
या अभियानाचा समारोप दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांच्याहस्ते करण्यात आला. सावईकरांनी आपल्या भाषणात अभियान संकल्पनेचे कौतुक करून अशी अभियाने वारंवार आयोजित करून सरकारी योजनांबाबत जागरण आवश्यक असते असे सांगितले. ग्रामीण जनता सरकारी योजनांबाबत अनभिज्ञ असते. त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोचविण्यासाठी अभियाने हे उत्कृष्ट माध्यम असल्याचे सांगितले. सावईकर यांनी प्रत्येक स्टॉलधारकाची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी सावईकरांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
अभियान यशस्वीतेसाठी पत्रकार अजित पैंगीणकर, परशुराम देवस्थान समितीचे अध्यक्ष अजय प्रभुगावकर, लोकवेद अभ्यासक कमलाकर म्हाळशी, हरिश्‍चंद्र खोलकर, रामकृष्ण फळदेसाई यांचे सहकार्य लाभले. पत्र सूचना कार्यालयाचे संचालक गुरुनाथ पै यांनी यंदाचे चौथे अभियान यशस्वीपणे राबविले. त्यांना कार्यालयाचे सहाय्यक अधिकारी समरजीत ठाकूर, क्षेत्रिय अधिकारी मालखेडकर, अनुराधा चोडणकर, रेषा घाडी, राजन शेट्ये इत्यादीनीं परिश्रमपूर्वक साथ दिली. प्रथम महेश गावकर व त्यांच्या पथकाने वेगवेगळी नृत्ये व पथनाट्य सादर केली. कुंभारजुवे येथील शांतादुर्गा कल्चरल असोसिएशन, आदिनाथ कारे पायक स्वयं सहायता गट, मल्लिकार्जुन महिला मंडळ या पथकांनी उद्बोधक असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून अभियानात रंगत आणली.