शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना त्वरित द्यावा

0
31

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआय किंवा तंत्रनिकेतनमधील अभ्यासक्रम प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला मागितल्यास त्यांची अडवणूक न करता त्यांना त्वरित तो द्यावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व नोंदणीकृत शिक्षण संस्थांना एका परिपत्रकाद्वारे काल केली.

शिक्षण संस्थांकडून दहावी, बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिल्यानंतर त्यांना पुन्हा दहावी, बारावीच्या परीक्षेला बसण्यास मान्यता मिळणार नसल्याचे गृहीत धरून त्यांना सदर दाखला दिला जात नाही, असे गोवा शालांत मंडळाच्या निदर्शनास आले आहे.
अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा पुन्हा देण्यासाठी त्याच शाळेतून अर्ज करण्याचे कुठलेही बंधन नाही. दहावी, बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थी समकक्ष आयटीआय किंवा तंत्रनिकेतनमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. त्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो. त्यामुळे शाळा व्यवस्थापनांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला त्वरित देऊन सहकार्य करावे, असे सूचनेत म्हटले
आहे.