शाळा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार ः शिक्षणमंत्री

0
125

राज्यातील बंद असलेल्या शाळा कधी सुरू करायच्या याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूचनांनुसार त्यासंबंधीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे काल शिक्षणमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. सुदिन ढवळीकर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला राज्यातील विद्यालये कधी खुली होतील असे विचारले होते. त्यावर ते बोलत होते.

रोहन खंवटे यांनी, राज्यातील बहुतेक ठिकाणी नेटवर्कची समस्या असून त्यामुळे ऑनलाइन शिक्षण देण्यास येत असलेल्या अचडणी दूर करण्यास सरकारला अद्याप यश आले नसल्याचे सभागृहाच्या नजरेस आणून दिले.

आमदार ढवळीकर यांनी ग्रामीण भागात कुठेही ‘रेंज’ नसते तर शहरातही बर्‍याच ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याचे सांगून सरकारने विनाविलंब ही समस्या दूर करण्याची गरज असल्याचे सांगितले.

यावर बोलताना सावंत म्हणाले की, लोक गावात मोबाईल टॉवर उभारू देत नाहीत. त्यामुळे नेटवर्कची समस्या निर्माण झाली आहे. अजूनही गावागावात टॉवर उभारण्यास विरोध होत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नसल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगितले. ‘सायबर एज’ योजना सरकारने का बंद केली, असे सरदेसाई यांनी विचारले असता मुख्यमंत्री व सरदेसाई यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ‘सायबर एज’ योजनेखाली देण्यात येणार्‍या संगणक, टॅब आदींचा विद्यार्थ्यांकडून गैरवापर होत असल्याच्या पालकांकडून तक्रारी येऊ लागल्यानंतर सदर योजना सरकारने बंद केल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी इंट्रानेट सुविधेचा ऑनलाईन शिक्षणासाठी वापर करावा. त्याचे नेटवर्क सर्वत्र आहे. त्यामुळे विनाव्यत्यय ऑनलाईन क्लासेस भरवता येणार असल्याची सूचना केली.