राज्य सरकारच्या शिक्षण संचालनालयाने आगामी 2024-25 या शैक्षणिक वर्षाचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी वेळापत्रक काल जारी केले. या वेळापत्रकात शाळांची सत्र परीक्षा आणि सुट्ट्यांच्या कालावधीबाबत माहिती देण्यात आली आहे.
शिक्षण संचालनालयाने या संदर्भातील परिपत्रक सर्व शाळांना पाठवले आहे. या परिपत्रकात शालेय कामकाजाचे दिवस 220 पेक्षा कमी असता कामा नये आणि एकूण शैक्षणिक दिवसांची संख्या 200 दिवसांपेक्षा कमी नसावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार पहिले सत्र 4 जून ते 26 ऑक्टोबर आणि दुसरे सत्र 18 नोव्हेंबर ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत घेण्याचे स्पष्ट केले आहे.
या परिपत्रकात मोठ्या सुट्ट्यांचा कालावधीही नमूद करण्यात आला आहे. त्यात श्रीगणेश चतुर्थीची सुट्टी 6 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर, दिवाळीची सुट्टी 28 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर आणि नाताळची सुट्टी 24 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत असेल. उन्हाळी सुट्टी 1 मे 2025 ते 3 जून 2025 या काळात राहील. सार्वजनिक सुट्या नेहमीप्रमाणे असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.