>> शिक्षण खात्याकडून आदेशाद्वारे विद्यालयांना सूचना
राज्यातील विद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत; परंतु प्रत्यक्ष वर्ग पुन्हा सुरू करताना विद्यालयांनी गणवेशाचा आग्रह धरू नये, असे शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी काल जारी केलेल्या एका आदेशात म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रारंभीच्या काळात गरज भासल्यास विद्यालयाच्या वेळेमध्ये सवलत द्यावी. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
राज्यातील सरकारी, अनुदानित पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि विशेष मुलांच्या शाळांचे वर्ग २१ फेब्रुवारीपासून सुरू केले जाणार आहेत. कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वे आणि सर्व आरोग्य नियमांचे पालन करून वर्ग घेण्याची सूचना शिक्षण खात्याने केली आहे.
राज्यातील कोविड महामारीच्या काळात बराच काळ राज्यातील विद्यालयांचे वर्ग बंद आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांसाठी नवीन गणवेश घेतलेला नाही. मुलांच्या वाढत्या वयामुळे त्यांना जुना गणवेश मुलांना होत नाही. आता शैक्षणिक वर्षाचे केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यालय गणवेशामध्ये सूट देण्याची मागणी पालकांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याकडून जारी झालेल्या आदेशामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जानेवारी २०२२ मध्ये कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेमध्ये राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने वर्ग बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा शाळांची घंटा वाजणार आहे.
२१ फेब्रुवारीला मातृभाषा दिन साजरा
राज्यातील सरकारी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विशेष मुलांच्या विद्यालयांनी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘मातृभाषा दिन’ साजरा करावा, अशी सूचना शिक्षण खात्याने केली आहे. देशपातळीवर २१ फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मुलांमध्ये मातृभाषेबाबत प्रसार करण्यासाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. विद्यालय पातळीवर मुलांसाठी पोस्टर, निबंध लेखन, चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन आदी स्पर्धांचे आयोजन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
गोवा विद्यापीठ, महाविद्यालये सोमवारपासून सुरू
राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता गोवा विद्यापीठाचे विविध विभाग आणि संलग्न महाविद्यालये सोमवार दि. २१ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची सूचना करण्यात आली आहे. कोविडच्या तिसर्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने प्रत्यक्ष वर्ग बंद करण्यात आले होते.