
टेनिससुंंदरी मारिया शारापोवा हिने तियानजिन ओपन स्पर्धा जिंकून जवळपास दोन वर्षांनंतर डब्ल्यूटीए किताब पटकावला. चिकाटी व इच्छाशक्तीच्या जोरावर शारापोवाने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही सेटमध्ये पिछाडीवरून मुसंडी मारत बेलारुसची युवा खेळाडू आर्याना सबालेंका हिला ७-५, ७-६ (८) असे पराभूत केले.
माजी क्रमांक एकची खेळाडू असलेल्या शारापोवाने उत्तेजक सेवनप्रकरणी १५ महिन्यांच्या बंदीनंतर एप्रिल महिन्यात स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन केले होते. आपल्या पहिल्या सर्व्हिस गेममध्ये सबालेंकाची सर्व्हिस भेदल्यानंतर शारापोवा १-४ अशी पिछाडीवर पडली. यानंतर तिने सामन्यात प्रथमच स्वतःची सर्व्हिस राखत दुसरा गुण घेतला. आपल्या १९ वर्षीय प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस मोडून शारापोवाने पिछाडी ३-४ अशी कमी केली. शारापोवाने यानंतर आपला नैसर्गिक खेळ करताना सबालेंकाची सर्व्हिस पुन्हा भेदताना ६-५ अशी आघाडी घेतली व स्वतःची सर्व्हिस राखत पहिला सेट खिशात घातली. दुसर्या सेट तर शारापोवा गमावण्याच्या मार्गावर होती. बेलारुसची सबालेंका ५-१ अशा आघाडीवर असताना शारापोवाने पिछाडी भरून काढताना ६-५ अशी आघाडी घेतली. सामन्यात सात बिनतोड सर्व्हिस करणार्या शारापोवाने विजयाच्या उंबरठ्यावर असताना दुहेरी चूक केल्याने सबालेंकाने ६-६ अशी बरोबरी साधली व सामना टायब्रेकरपर्यंत लांबला. टायब्रेकरदेखील रंगतदार झाला ८-८ अशा बरोबरीत असताना सबालेंकाने दुहेरी चूक केल्याने शारापोवाचा विजय झाला.
२०१५ साली मे महिन्यात इटालियन ओपन जिंकल्यानंतर ३० वर्षीय शारापोवाची पाटी कोरीच होती. रुळावरून घसरलेली तिची गाडी कालच्या विजयामुळे पुन्हा रुळावर आली आहे.