शारदे! नमन सदा तव चरणी…

0
13
  • मीना समुद्र

ऐश्वर्य, समृद्धी देणारी लक्ष्मी आणि दया-क्षमा-शांतीस्वरूपा गौरी यांचा जणू संगम शारदेच्या ठायी झाला आहे. ती अशुभनिवारक अशी मंगलकारक शक्ती आहे. नवरस, नवरंग, नवकलांचे स्फुरण करणाऱ्या शारदेचे हे शरद ऋतूतले शारदीय नवरात्र!

देवी नवरात्राचं मंगलमय पर्व आता सुरू आहे. अशावेळी आठवण होते ती संत एकनाथांनी केलेल्या आदिशक्तीच्या स्तवनाची.
अनादि निर्गुण प्रगटली भवानी।
मोह महिषासुर मर्दनालागोनी॥

असं त्यांनी म्हटलं आहे. मोह, मद, मत्सर, दंभ, लोभ, क्रोध अशा षड्रिपूंशी मानवाचा सदैव झगडा चालू असतो. यातला प्रत्येक शत्रू हा प्रबळ आहे. मोहामुळे तर अनेक वाईट कृत्ये आणि पापे घडतात. या अमानुषतेच्या पातळीवर वर्तन करणाऱ्या माणसाला या शत्रूंचे दमन करायचे असेल, त्यांना सर्वस्वी नष्ट करायचे असेल, मनुष्यजन्माचे कल्याण साधायचे असेल तर जगाच्या उत्पत्तीचे कारण असलेल्या आदिमातेला शरण जाणे योग्य ठरते. स्वविनाश टाळून स्वविकास साधायचा असेल तर महामातेचे स्मरण करणे, सामर्थ्यवान बनण्यासाठी तिची प्रार्थना करणे हे प्रत्येक जिवाचे कर्तव्य आहे. जगताचे अरिष्ट, दुर्बुद्धी, दुःख दूर करून तमाच्या तळाशी दिवे लावण्याचे काम ही देवता करते. या आदिमातेचं, या महामातेचं ध्यान, तिची पूजाअर्चा, प्रार्थना आपण वेगवेगळ्या रूपांत तिला कल्पिलेली आहे. महिषासुर माजून त्याने त्रिखंड उद्ध्वस्त केले तेव्हा ही आदिमाता स्वयंतेजाने प्रगट झाली. इंद्रादी सर्व देवदेवतांनी तिला आपापली अस्त्रशस्त्रे दिली. केवळ शक्ती जिथे काम करत नाही तेव्हा तिला युक्तीचीही साथ लागते; आणि बुद्धी किंवा ज्ञानाच्या प्रकाशात ही युक्ती सुचते. अशा बुद्धीचे चेतनारूप आणि ज्ञानाचे प्रेरणारूप असणारी देवी म्हणजे या आदिशक्तीचेच एक तेजस्वी पण तरीही सौम्य, सौज्वळ रूप. आणि हे रूप म्हणजे माता सरस्वती! हीच शारदा, हीच बुद्धिदात्री सरस्वती आणि हीच महाविद्या. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची अधिष्ठात्री देवता. ती आपल्या आशीर्वादाने भक्तांवर कृपेचा वर्षाव करते. त्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखविते. अज्ञानांधकार दूर करून त्यांची बुद्धी तेजस्वी करते. त्यांच्या हाती नवसृजनाची बीजे ठेवते. सारासार विवेकबुद्धी, चातुर्य, पांडित्य, विद्वत्ता, वाणीची किमया घडवते. संगीत, नाट्य, चित्र, शिल्प आदी कलांची प्रेरणादायिनी आणि सर्वानंददायिनी शारदेला विद्याबुद्धीच्या प्रांगणात श्रीगणेशाबरोबरीचेच स्थान आहे. त्यामुळे कोणत्याही सभासमारंभप्रसंगी श्रीगणेशाचे जसे स्तवन होते, तशीच सरस्वतीवंदनाही होते. कोणत्याही ग्रंथारंभी श्रीशारदेचीही प्रार्थना केली जाते. जशी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी अक्षरब्रह्म अशा श्रीगणेशरूपाला वंदन केल्यानंतर-

आतां अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कलाकामिनी
ते श्रीशारदा विश्वमोहिनी, नमिली मीयां
असे म्हटले आहे. ती वाणीचा नवनवीन विलास करते, त्यामुळे तिला वागेश्वरी, वाग्देवताही म्हटले जाते. चातुर्य, वागर्थ आणि कला यांची ती देवता आहे. सर्व जगाला ती आपल्या प्रभावाने आणि आशीर्वचनरूप वाणीने सुखविते. ती अखिल विश्वाला मोहविणारी आहे. अशा शारदेला मी नमन करतो (केले आहे), असे ज्ञानदेव म्हणतात. ऐश्वर्य, समृद्धी देणारी लक्ष्मी आणि दया-क्षमा-शांतीस्वरूपा गौरी यांचा जणू संगम हिच्या ठायी झाला आहे. ती अशुभनिवारक अशी मंगलकारक शक्ती आहे. जगताच्या कल्याणासाठीच तिची निर्मिती झाली आहे. नवरात्रात तिचे शांत-सौम्य रूप नाना प्रकारे आळविले जाते. नवरस, नवरंग, नवकलांचे स्फुरण करणाऱ्या शारदेचे हे शरद ऋतूतले शारदीय नवरात्र!
कवयित्री शांता शेळके यांनी तिच्या रूपाचे अतिशय मनोरम वर्णन करताना सुरुवातीला या विधिकन्यकेला ‘विद्याधरी’, ‘वागेश्वरी’ संबोधून तिचा जयजयकार केला आहे. शरदाच्या स्वच्छ शुभ्र चांदण्यासारखी तिची कांती आहे आणि तिचे सुंदर मुख शरदाच्या पूर्णचंद्रासारखे तेजस्वी, सुंदर आहे. तिच्या हास्यातून चारी युगांची पौर्णिमा चांदणे बरसते. वीणेवर तिची बोटे फिरली की नवे स्वर्गीय संगीत निर्माण होते, आणि बुद्धीची जडता भंग पावते. नवउन्मेषाच्या कल्पतरूवर नवमंजिरी बहरून येतात. शुभ्रवसना शारदेचा वरदहस्त लाभला की जीवनात कसलीही उणीव राहत नाही. बहिणाबाई चौधरींच्या शब्दात सांगायचे तर ती त्यांना बोली शिकविणारी त्यांची माय आहे. ती किती रहस्ये, किती गुपिते या लेकीच्या मनात पेरते. तुलसीदासांनी ‘रामचरितमानसा’च्या सुरुवातीला तिला ‘सूरसरिता’ म्हटले आहे, जी सर्वांचे पाप आणि अविवेक दूर करते. बालपणीच शिकवल्या गेलेल्या-
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभि र्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा-

या श्लोकातही शुभ्रवसना, श्वेत पद्मावर बसलेल्या आणि ब्रह्मा-विष्णू-महेशांनी नेहमी वंदन केलेल्या सरस्वतीला आपले अज्ञान दूर करण्याची प्रार्थना केली आहे. सरस्वती कधी श्वेत कमळात बसलेली, कधी मोरावर तर कधी शुभ्र हंसावर बसलेली आपल्याला चित्रांतून दिसते. जलाशयाची शीतलता आणि प्रवाहीपण, त्यातले जीवनदायी चैतन्य आणि त्यातून उमललेल्या कमळाची शुभ्र सुंदरता असो; शुभ्र हंसाचे जललहरींवर तरंगत-विहरत जाणे असो की वृक्षलतावल्लरींनी फुललेल्या, फळलेल्या हिरव्यागार वनरायांतून नर्तन करणारा सुंदर तेजस, राजस मोर असो; सरस्वतीच्या आसनात आणि तिच्या असण्यात म्हणजे अस्तित्वात सर्वत्र पावित्र्य, सुगंध, शीतलता, चैतन्य, सौंदर्य आणि वीणेतून उमटणाऱ्या मधुर झंकाराचे निनाद असतात.
जिच्यापुढे संपत्ती फिकी आणि शक्तीचे तिच्यावाचून अडते ती शारदा अशी व्याख्या आणि-
दुःखहेतू तो दूर घालवी, वसुमतीस जी स्वर्ग भेटवी
भगवती अशी सांग कोणती? ती सरस्वती! ती सरस्वती!
अशी विद्याप्रशस्ती केलेली दिसते.
शारदेने जो मंत्र दिला कानी
तसे लिहिले मी काव्य तिचे मानी
अशाप्रकारे तिच्याच प्रेरणेने काव्यस्फुरण झाल्याचेही कवीने नमूद केले आहे.
नवरात्राच्या या शारदोत्सवात मयूरासना, वीणापुस्तकधारिणी शारदेचे स्वतन करताना आणि विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पुस्तकवाद्यांसहित आकड्यांच्या सरस्वतीचे प्रतीकरूप पूजन करीत असताना झेंडूसारख्या फुललेल्या मनाने म्हणूया-
जय जय हे भगवति सुरभारति तव चरणौ प्रणमामः।
नादब्रह्ममयि जय वागेश्वरि शरणं ते गच्छामः॥