>> सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
शापूर, फोंडा येथील कदंब बस स्थानकाजवळील डोंगराळ भागात काल दुपारी अज्ञात महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला असून सदर महिलेचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कपड्यावरून सदर महिला परप्रांतीय असण्याची शक्यता असून ६-७ दिवसांपूर्वी खून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मृत महिलेचे वय ३० ते ३५ च्या दरम्यान आहे.
सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका निर्जन स्थळी मृतदेह आढळल्याची माहिती फोंडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक हरीश मडकईकर, उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहापासून सुमारे २ ते ३ मीटर अंतरावर एक दगड आढळून आला आहे. सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेची ओळख पटू नये म्हणून अज्ञातांनी तिच्या चेहर्यावर दगड घातल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मृतदेह एक लहानशा खड्ड्यात घालून त्यावरून झाडाच्या फांद्या घातलेल्या होत्या. उपअधीक्षक महेश गावकर यांनी सदर महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला. रात्री उशिरा पर्यंत महिलेची ओळख पटली नव्हती. फोंडा पोलीस सध्या अज्ञात महिलेची ओळख पटविण्यासाठी चौकशी करीत आहेत. यापूर्वी १ मे २०१२ रोजी याच भागात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. मात्र, त्या खुनाचा अजूनपर्यंत तपास लागलेला नाही.