>> सिग्नल यंत्रणा त्वरित बसवण्याची मागणी
शापूर व आसपासच्या भागांतील नागरिकांनी रविवारी काही वेळ महामार्ग अडवून फार्मागुडी-फोंडा महामार्गावरील चौपदरी रस्त्यावर शापूर येथे त्वरित सिग्नल यंत्रणा उभारण्याची तसेच भुयारी मार्ग बांधण्याची जोरदार मागणी केली. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला.
यावेळी नागरिकांबरोबर आजी माजी पंच सदस्य तसेच आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोंड्यातील शापूर भागात जाणारा पारंपरिक रस्ता येथील चौपदरी रस्त्याचे बांधकाम करताना बंद करण्यात आला. त्यामुळे आता शापूरवासीयांना फोंड्यातून शापूर येथे जाण्यास जीव्हीएम सर्कलला वळसा घालून जावे लागत आहे. त्यासाठी दोन कि. मी. एवढे जास्त अंतर कापावे लागत आहे. परिणामी इंधन व वेळ वाया जात आहे. शापूरसाठीचा रस्ताही अरुंद आहे. शिवाय वाटेवर वाहने पार्क करून ठेवण्यात येत असल्यानेही अडचण होत असते.
फोंडा कदंब बसस्थानक व वाहतूक खात्याचे कार्यालय शापूर येथे असल्याने नागरिकांची मोठ्या संख्येने शापूर भागात ये-जा होत असते. पण अरुंद रस्त्यामुळे गैरसोय होत असते. शिवाय अरुंद रस्त्यामुळे अपघातात वाढ झालेली आहे. ही अडचण लक्षात घेऊन सिग्नल यंत्रणा बसवावी व अंडरपासची सोय करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.