शाकिब अल हसनवर बंदी

0
112

>> बुकीने केलेल्या संपर्काची माहिती तीनवेळा लपवली

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दोन वर्षांची बंदी घातली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमावलीचा भंग केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाईची तलवार उगारण्यात आली आहे. त्याने आपल्यावरील सर्व आरोप मान्य केल्यामुळे त्याच्यावरील बंदीचा कालावधी २०१८ पासून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बंदीचा कालावधी केवळ एका वर्षाचा (पूर्वलक्षी प्रभावापासून) असेल. २९ ऑक्टोबर २०२० रोजी शाकिब आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. सध्या शाकिब अष्टपैलूच्या यादीत तिसर्‍या (कसोटी), पहिल्या (वनडे) व दुसर्‍या (कसोटी) स्थानी आहे. तसेच बांगलादेशच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी संघाचा तो कर्णधारदेखील होता. बंदीच्या कारवाईमुळे आगामी इंडियन प्रीमियर लीग तसेच टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेतही त्याला खेळता येणार नाही.

आयसीसीच्या कलम २.४.४ अंतर्गत सामना निकाल निश्‍चितीची ऑफर असल्याची माहिती शाकिबने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाला दिली नाही. जानेवारी २०१८ मध्ये बांगलादेश, झिंबाब्वे व श्रीलंका यांच्यात झालेल्या तिरंगी मालिकेच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. यापूर्वी २६ एप्रिल २०१८ मध्ये सनरायझर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यातही त्याला फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. त्याबाबतची माहितीही त्याने लपवली, असे आरोप शाकिबवर करण्यात आले होते. शाकिबने हे सर्व आरोप मान्य केले आहेत.

आयसीसीचे महाव्यवस्थापक आलेक्स मार्शल यांनी सांगितले की शाकिबने आपल्यावरील आरोप मान्य करून तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. पण त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खूप अनुभव आहे. सट्टेबाज दीपक अगरवाल याने त्याच्याशी वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा संपर्क साधला होता. त्याने ही माहिती आयसीसीला द्यायला हवी होती. मात्र त्याने तसे केले नाही. त्याने आयसीसीच्या अनेक शिबिरांना हजेरी लावली आहे. तरीही त्याने नियमांचे उल्लंघन केले हे खूपच अनपेक्षित आहे. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. २३ जानेवारी व २७ ऑगस्ट रोजी आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकातील सदस्याने शाकिबकडून माहिती मिळवली होती.

नोव्हेंबर २०१७
दीपक अगरवाल याने सर्वप्रथम शाकिबशी संपर्क साधला. यावेळी शाकिब बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ढाका डायनामाईट्‌स संघाकडून खेळत होता. शाकिबच्या एका जवळच्या माणसाने अगरवाल याला शाकिबचा दूरध्वनी क्रमांक दिला होती. बीपीएलमधील अनेक खेळाडूंचे क्रमांक या व्यक्तीने अगरवाल याला दिले होते.

जानेवारी २०१८
बांगलादेशने श्रीलंका व झिंबाब्वेचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेचे यजमानपद भूषविले. १९ जानेवारी रोजी बांगलादेशने श्रीलंकेला नमविले. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या शाकिबचे दीपक अगरवालने मॅसेज पाठवून अभिनंदन केले. यानंतर अगरवाल याने एक गूढ संदेश शाकिबला पाठवला. या मॅसेजनंतर आयसीसीचा संशय बळावला.

एप्रिल २०१८
२६ एप्रिल २०१८ रोजी अगरवालने शाकिबशी संपर्क साधला. सनरायझर्स हैदराबाद व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात त्या दिवशी सामना होता. यावेळी शाकिबने अगरवाल याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अगरवाल याने एखादा खेळाडू ‘अंतिम ११’मध्ये खेळणार ही नाही याची विचारणा शाकिबला केली. शाकिबच्या बिटकॉईन, डॉलर अकाऊंटची विचारणा देखील त्याने केली. शाकिबने मात्र भेटण्याचा आग्रह धरला. अगरवाल याने पाठवलेले सर्व मॅसेज डिलीट केल्याचेदेखील त्याने मान्य केले.