‘शांतिदूत’ ट्रम्प

0
15

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यंदाचे शांततेचे नोबेल मिळवण्याचा विडाच उचलला आहे की काय नकळे, परंतु सध्याच्या इस्रायल – इराण संघर्षातही दोन्ही देशांदरम्यान युद्धविराम घडविल्याचे श्रेय उकळून ते मोकळे झाले आहेत. आधी इराणच्या आण्विक तळांवर सर्वांत शक्तिशाली बॉम्ब टाकून सर्वनाशाच्या धमक्या देणाऱ्या ट्रम्प यांनी अचानक इस्रायलशी युद्धविरामाची बोलणी लावली आणि कतारच्या मध्यस्थीने इराणलाही त्यासाठी राजी केले. युद्ध कोणालाच नको असते, त्यामुळे दोन्ही देशांनी ही मध्यस्थी स्वीकारून युद्धविराम घोषित केला आहे. अर्थात, तो प्रत्यक्षात लागू होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागलीच. ट्रम्प जेव्हा दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आले, तेव्हा आपण जगातील सर्व युद्धे थांबवून जागतिक शांतता प्रस्थापित करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. ‘संतप्त, हिंसक आणि पूर्णतः अनाकलनीय बनलेल्या जगामध्ये एकतेची भावना’ जागविणार असल्याचे ट्रम्प तेव्हा म्हणाले होते. त्यानुसार प्रत्येक जागतिक संघर्षामध्ये त्यांनी चोंबडेपणा चालवला आहे. देशादेशांतील संघर्ष थोपविण्याचे श्रेय ते स्वतःच उपटत सुटले आहेत. मात्र, त्यांनी आतापर्यंत केलेल्या एकाही युद्धविरामाच्या प्रयत्नाला पूर्ण सफलता प्राप्त झालेली आहे असे दिसत नाही. इस्रायल आणि हमासदरम्यान गाझामध्ये चाललेले युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी चक्क गाझापट्टीतील पॅलेस्टिनींचे अन्यत्र स्थलांतर करून तेथे रिसॉर्ट उभारण्याची अजब कल्पना मांडली होती. ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतरही इस्रायलने गाझाला पोळून काढलेच. रशिया – युक्रेन संघर्षातही ट्रम्प यांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलादिमीर झेलेन्स्की यांची भर पत्रकार परिषदेत त्यांनी खरडपट्टीही काढली, परंतु युक्रेनने त्यांच्या नाकावर टिच्चून स्वबळावर रशियावर अभूतपूर्व अशा प्रकारचे द्रोन हल्ले चढवले. भारत – पाकिस्तान संघर्षातही ट्रम्प यांनी युद्धविरामाचे श्रेय उपटले, परंतु पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी बोलताना हा युद्धविराम अमेरिकेच्या मध्यस्थीविना झाल्याचे स्पष्टपणे सुनावले. आता इस्रायल – इराण संघर्षात इराणच्या आण्विक तळांवर आपल्या सर्वांत शक्तिशाली बंकरबस्टर बॉम्बफेकीद्वारे उडी घेऊन अचानक युद्धविरामासाठी मध्यस्थी करून मोकळे झाले आहेत. काँगो – रवांडा, इथिओपिया – ईजिप्त संघर्षातही आपण मध्यस्थी केल्याची शेखी ट्रम्प मिरवत आहेत. एवढे करूनही आपल्याला नोबेल शांती पुरस्कार काही मिळणार नाही असे दुःख त्यांनी जाहीरपणे प्रकट केलेले आहे. खरे तर सध्याच्या इस्रायल – इराण संघर्षाला इराणच्या आण्विक तळांवर थेट हल्ले करून व्यापक युद्धाच्या उंबरठ्यावर ट्रम्प यांनीच नेऊन ठेवले. खरे तर इराण अण्वस्त्रबंदी कराराला राजी झालेला होता. परंतु अमेरिकेच्या मागील प्रशासनाने केलेला तो करार ट्रम्प यांनीच धुडकावून लावला होता. पुन्हा सत्तेवर येताच इराण अण्वस्त्रबंदीसंबंधीच्या चर्चेत सहभागी झाला होता, परंतु तरीही ते इराणला सर्वनाशाच्या धमक्या देत राहिले. खरे तर अमेरिकेने आजवर जगावर जी जी युद्धे लादली, ती त्यांच्या अंगलटच आलेली आहेत, मग ते व्हिएतनामचे युद्ध असो किंवा अफगाणिस्तानचे. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच अमेरिकेने अल कायदा आणि तालिबानच्या नायनाटाचा संकल्प करून अफगाणिस्तानमध्ये पाऊल टाकले. मात्र, वीस वर्षांनंतर त्याच तालिबानकडे सत्ता सुपूर्द करून तिला माघार घ्यावी लागली. 2003 साली इराकने रासायनिक शस्त्रास्त्रे बाळगली असल्याचे सपशेल खोटे सांगून अमेरिकेने तेथील सद्दाम हुसेन राजवट उलथवली. 2011 साली लिबियावर आक्रमण करून तेथील राजवट उलथवली. सगळ्या जगाने आपल्याच तालावर नाचले पाहिजे असे अमेरिकेला नेहमी वाटते. ट्रम्प भले स्वतःला शांतिदूत म्हणून जगापुढे प्रस्तुत करीत असले तरी ते देखील ह्याच परंपरेचे पाईक आहेत. त्यांची भाषा तर पूर्वसुरींपेक्षाही दांडगाईची आहे. इस्रायल – इराण संघर्ष थोपवायचा असता तर अमेरिकेला तो स्वतः त्यात न उतरताही थोपविता आला असता. परंतु इराणचे आण्विक तळ उद्ध्वस्त करून, आपले ईप्सित साध्य करूनच ट्रम्प यांनी युद्धविरामासाठी मध्यस्थी केली. मध्य पूर्वेतील सर्व राजवटी अमेरिकेच्या अंकित असाव्यात हाच त्यामागील उद्देश आहे. इराणवरील हल्ला अमेरिकी जनतेला पसंत पडला नव्हता. शहराशहरांतून त्याविरुद्ध निदर्शने सुरू झाली होती. पुन्हा एका नव्या युद्धामध्ये अमेरिकेने पडू नये असे खुद्द ट्रम्प यांच्या पाठीराख्यांनाही वाटते. ट्रम्प यांनाही त्याची कल्पना नक्कीच आहे. युद्धविरामामुळे इस्रायल – इराण संघर्ष तूर्त थंडावला असला तरी तो कितपत टिकाऊ ठरेल ह्याबाबत मात्र साशंकता आहे.