शहानिशा तर करा

0
0

गोव्यातील कोट्यवधी रुपयांच्या जमीन बळकाव प्रकरणातील एक सूत्रधार सुलेमान खान उर्फ सिद्दिकीच्या पलायननाट्याला त्याने अज्ञात ठिकाणाहून जारी केलेल्या एका व्हिडिओमुळे नवे वळण मिळाले आहे. मुळातच पोलीस कोठडीतून आणि तेही एका पोलिसाच्या मदतीने परराज्यात पळून गेलेल्या ह्या सुलेमानने त्या व्हिडिओमधून जे दावे केले आहेत, ते बिनबुडाचे म्हणून दुर्लक्षिता येणारे नाहीत. त्यासंदर्भात चौकशीची नितांत गरज निर्माण झाली आहे. मात्र, ह्या विषयामध्ये निष्पक्ष चौकशीसाठी पुढाकार घेण्याऐवजी हा व्हिडिओ एका पळून गेलेल्या गुन्हेगाराचा आहे, त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत, तो एक आंतरराज्य गुन्हेगार आहे, अशी नानाविध कारणे देत सरकार ह्यासंदर्भात जी आक्रमकता दाखवीत आहे, ती अस्थानी आहे हे संबंंधितांना कळायला हवे. ह्या व्हिडिओसंदर्भात काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षाची दोन तास चौकशी झाली. चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचाच हा प्रकार ठरतो. मुळात हा गुन्हेगार पोलीस कोठडीतून आणि तेही एका पोलिसाच्या मदतीने पळून गेला हे मुळात सरकारसाठी नामुष्कीचे आहे. एवढा कुख्यात आंतरराज्य गुन्हेगार असा सहजासहजी पळून जाऊच कसा काय शकतो आणि तोही एका पोलीस शिपायाच्या मदतीने? सुलेमानला स्वतःच्या मोटारसायकलीवर बसवून राजरोस पळून जाण्यास मदत करणाऱ्या पोलीस शिपायाची बडतर्फी झाली, कोठडीवर पहारा देण्याची जबाबदारी ज्याच्यावर होती त्या शिपायावरही निलंबनाची कारवाई झाली, परंतु ह्या कारवाईमुळे मूळ घटनेचे गांभीर्य तीळमात्रही कमी होत नाही. आपण पळून गेलेलो नाही, तर आपल्याला पळून जाण्यास भाग पाडले गेले, त्यासाठी बारा पोलिसांची दोन पथके तैनात केली गेली होती. एक पथक आपल्या मागून येत होते, तर एक पुढे गेले होते, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला रात्री अकरा वाजता कोठडीत मारहाण केली व आपल्या ताब्यातील जमीन एका सत्ताधारी आमदाराच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला असे व्हिडिओत सदर सुलेमान म्हणतो. तो जरी एक कुख्यात गुन्हेगार असला, तरी तो जो घटनाक्रम सांगतो, तो खरा आहे की खोटा आहे ह्याची निष्पक्ष शहानिशा करायला हरकत काय आहे? परंतु त्याऐवजी हा व्हिडिओ माध्यमांना पुरवणाऱ्या विरोधी नेत्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते हा काही सरकारपक्षाचा बचाव ठरू शकत नाही. ज्या सत्ताधारी आमदारावर आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केले गेले आहेत, त्यांच्या निरपराधित्वावर जनतेने विश्वास कसा ठेवावा? बारा पोलिसांच्या पथकाने आपल्याला पळून जाण्यास मदत केली हे जे सुलेमान सांगतो आहे, त्याच्या त्या दाव्याच्या सत्यासत्यतेची शहानिशा का होऊ नये? मुळात जेव्हा हा सुलेमान पोलीस शिपायाच्या दुचाकीवर मागे बसून जातानाचा व्हिडिओ समोर आला, तेव्हा त्याने कोणत्या आमिषाने हे कृत्य केले असा सवाल आम्ही केला होता. केवळ आर्थिक आमिषाने एखादा पोलीस आपली महत्प्रयासांती मिळवलेली सुखाची नोकरी सोडून द्यायला कदापि तयार होणार नाही. तीन कोटींचे आमीष त्याला दाखवले गेले होते अशी एक बातमी आली. हा तीन कोटींचा दावा काही पोलिसांनी केलेला नव्हता. मग हा आकडा आला कुठून? सदर पोलीस शिपायाने आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यामागे त्याच्यावरील कोणता मानसिक दबाव कारणीभूत आहे, ह्याची उत्तरे कोणी शोधायची? सुलेमानने व्हिडिओत जे आरोप केले आहेत, त्यांच्या सत्यासत्यतेची शहानिशा व्हायला हवी. ‘तो कोणी तरी लिहून दिलेली स्क्रीप्ट वाचतो आहे’ असे म्हणून त्याकडे कानाडोळा करणे योग्य नाही. तो पोलिसाच्या मदतीने पळून गेला हे तरी सत्य आहे. मग एका पोलीस शिपायाला एवढ्या सहजतेने एवढ्या कुख्यात गुन्हेगाराला उघडउघड दुचाकीवर मागे बसवून शंभर किलोमीटर पळवून नेता येऊ शकते, त्याला वाटेत कुठेही अटकाव होत नाही, कोणत्याही तपासणी नाक्यावर चौकशी होत नाही हे सारेच धक्कादायक आहे. पोलिसांनी आपली पथके त्याच्या मागावर रवाना केली आहेत. तो सापडेलही, परंतु आपल्या जिवाला धोका आहे असे त्याने सांगितले असल्याने उद्या त्याचे काही बरेवाईट झाले, तर त्याची जबाबदारी कोणाची हाही प्रश्न आहे. त्याने केलेल्या आरोपांची शहानिशा झाली पाहिजे आणि पोलीसच यात गुंतल्याचा आरोप असल्याने न्यायालयीन देखरेखीखाली तटस्थपणे ही चौकशी झाली पाहिजे. ज्या सत्ताधारी आमदाराचे नाव यात आले आहे, त्याच्या मालमत्तेशी ह्या सुलेमानचा संबंध काय व ती हस्तांतरीत करण्यासाठी खरोखरच त्याच्यावर दबाव टाकला गेला होता का ह्याचीही चौकशी झाली पाहिजे. तो पळून गेलेला गुन्हेगार आहे ह्याचा अर्थ तो खोटेच बोलत असेल असे नाही.