पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भाजपचा चेहरा आहे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हा कणा. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या घोडदौडीमधील शहा यांचे पडद्यामागील योगदान फार मोठे आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाठीशी जसे लालकृष्ण अडवाणी खंबीरपणे उभे होते, तशाच प्रकारे मोदींच्या मागे अमित शहा ठामपणे उभे आहेत. पक्ष आणि सरकारमधील अमित शहांचे स्थान लक्षात घेता, नुकतीच त्यांची गोव्यात म्हापशामध्ये झालेली प्रचारसभा प्रदेश भाजपसाठी किती महत्त्वाची होती हे कळून चुकते. सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या श्रीपाद नाईक यांच्यासाठी शहा यांची ही सभा आवर्जून घेण्यात आली. पक्षाच्या गोव्यातील उमेदवारांच्या प्रचारामध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी ही खबरदारी होती. त्यामुळे येत्या दोन वर्षांत गोव्यातील खाणी पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू होतील असे ठोस आश्वासन शहांनी उत्तर गोव्यातील, विशेषतः खाणपट्ट्यातील अस्वस्थ मतदारांना ह्या सभेत दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत सतत पाठपुरावा केल्याने हा प्रश्न सुटू शकला आणि सरकारला खाणपट्ट्यांचा ई-लिलाव करता आला. आठ खाणपट्ट्यांचे वाटप झाले असून एका खाणपट्ट्यावर प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे ह्याचे स्मरण शहांनी ह्या सभेमध्ये करून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांकवाळच्या आपल्या सभेमध्ये मच्छीमारी आणि पर्यटन ह्या दक्षिण गोव्याच्या दोन जिव्हाळ्याच्या प्रश्नांभोवती आपले भाषण केंद्रित ठेवले होते. अमित शहांचे परवाचे म्हापशाचे भाषण मात्र, उत्तर गोव्यातील विशेषतः हिंदू मतदार समोर ठेवून केलेले स्पष्ट दिसत होते. त्यामुळेच मोदींनी गोव्यातील जाहीर सभांमधून मागे ठेवलेल्या राममंदिरासारख्या विषयावर शहा आक्रमकपणे बोलले. राजकीय सभा असूनही ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’ची घोषणा देखील त्यांनी दिली. काँग्रेस नेत्यांनी राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मतपेढीच्या भीतीपोटी नाकारल्याची त्यांची टीका काँग्रेसच्या वर्मी लागणारी होती. केवळ अयोध्येतील राममंदिरच नव्हे, तर आपले सरकार काशीपासून सोमनाथपर्यंत आणि बद्रिनाथपासून केदारनाथपर्यंत करीत असलेल्या विकासकामांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला पाहायला मिळाला. दुसरीकडे, शहांचे भाषण ‘इंडिया’ आघाडीचा फोलपणा अधोरेखित करणारे होते. ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आली तर पंतप्रधान कोण होणार हा त्यांचा खडा सवाल होता. शरद पवार कन्येसाठी, स्टालीन आणि उद्धव मुलासाठी, तर ममता पुतण्यासाठी राजकारणात स्थान निर्माण करू पाहत आहेत, सोनिया पुत्र राहुलला पंतप्रधान बनवू इच्छित आहेत ह्या घराणेशाहीवर त्यांनी अपेक्षेप्रमाणे प्रहार केलेच, शिवाय ‘इंडिया’आघाडीकडे ‘नेता भी नही और नीती भी नही’ हे सांगायलाही ते विसरले नाहीत. केंद्रातील काँग्रेसचे मागील सरकार आणि मोदींचे गेल्या दहा वर्षांतील सरकार यांची विस्ताराने तुलना करताना काँग्रेसच्या काळात बारा लाख कोटींचे घोटाळे झाले होते, परंतु मोदी गेली 23 वर्षे आधी मुख्यमंत्री व नंतर पंतप्रधान म्हणून सत्तेत आहेत, परंतु त्यांच्या बाबतीत पंचवीस पैशांच्या भ्रष्टाचाराचा देखील आरोप झालेला नाही हे शहांनी ठासून सांगितले. मोदींच्या एकही दिवस सुट्टी न घेता अहोरात्र काम करण्याच्या कार्यनिष्ठेकडे आणि समर्पिततेकडेही त्यांनी आवर्जून अंगुलीनिर्देश केला. मोदींच्या हाती सत्ता आली तर देश सुरक्षित आणि समृद्ध होईल ह्यावर त्यांचा रोख होता. याउलट राहुल गांधी जरासे तापमान वाढले की विदेशात कसे पळतात, त्यांच्याकडे गांभीर्य कसे नाही त्यावरही त्यांनी बोट ठेवले. येत्या निवडणुकीनंतर काँग्रेस शोधा यात्रा काढण्याची पाळी येईल असे भाकीतही शहांनी केल्याचे दिसले. मोदींच्या तुलनेत शहांचे भाषण आक्रमक असते. तसेच ते यावेळीही होते. गोव्याच्या संदर्भात बोलताना केंद्रातील भाजप सरकारने गोव्याला नेहमीच कसे झुकते माप दिले आहे त्यासंदर्भात ते आकडेवारीसह बोलले. काँग्रेसचे केंद्रात सरकार होते तेव्हा गोव्याकडे दुर्लक्ष व्हायचे, परंतु भाजपचे केंद्रातील सरकार गोव्याला सदैव मदतीचा हात देत आले आहे आणि गेल्या दहा वर्षांत गोव्यात पस्तीस हजार कोटींची विकासकामे केंद्र सरकारने केली हे त्यांनी विविध विकासप्रकल्पांवर खर्च झालेले आकडे सादर करीत सांगितले. एकूणच मोदींच्या दोन सभांमधून ज्या मुद्द्यांना स्पर्श झाला नव्हता, ती कसर शहांनी भरून काढली. विरोधी पक्षांकडून कोणीही स्टार प्रचारक गोव्यात यावेळी उतरला नाही. गोव्याच्या दोन जागांना तेवढे महत्त्व द्यावेसे त्यांना वाटले नसावे. केवळ स्थानिक भेटीगाठींवर ‘इंडिया’ आघाडीचा भर राहिला. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रचारामध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांच्या ह्या प्रचारसभा नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावून गेल्या आहेत.