शहबाजकडे सूत्रे

0
35

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शहबाज शरीफ यांची काल निवड झाली. इम्रान खान यांच्या अविश्वास ठरावाद्वारे हकालपट्टीनंतर विरोधकांचे सर्वसंमत उमेदवार या नात्याने शहबाज यांची ही निवड हा केवळ सोपस्कार राहिला होता. शहबाज हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू. पंजाब प्रांताचे ते तीनवेळा मुख्यमंत्रीही राहिले आहेत. आज ते वयाच्या सत्तरीत आहेत. मध्यंतरी ते कर्करोगाने आजारी होते आणि त्यातून सावरले आहेत. काळाचा महिमा कसा असतो पाहा. याच शहबाजना बंधू नवाज यांच्याविरुद्धच्या २००७ सालच्या लष्करी उठावानंतर सौदी अरेबियात आसरा घ्यावा लागला होता. पनामा पेपर्समध्ये नाव आल्याने नवाज शरीफ यांचे पुन्हा पंतप्रधानपद गेले तेव्हा शहबाज यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप होऊन त्यांना तुरुंगवासही घडला होता. आता हेच महोदय पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर आरूढ होणार आहेत आणि त्यांचे बंधू नवाज शरीफ पुढच्या महिन्यात सन्मानपूर्वक मायदेशी परतणार आहेत. हे शरीफ नावाने शरीफ असले तरी त्यांची बदमाशी भारताने वेळोवेळी अनुभवलेली आहे. त्यामुळे इम्रान गेले आणि शहबाज आले तरी पाकिस्तानच्या भारतविषयक नीतीमध्ये काही फार मोठा फरक पडेल असे वाटत नाही.
पाकिस्तानच्या कोणत्याही पंतप्रधानाला आजवर आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. पाकिस्तानात आजवर २२ पंतप्रधान होऊन गेले, परंतु कोणाला लष्कराने हटवले, तर कोणाला न्यायालयाने. इम्रान खान यांची मात्र अविश्वाव ठरावाद्वारे हकालपट्टी झाली. आपली पदच्युती टाळण्यासाठी इम्रान यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले. अविश्वास ठराव चर्चेला घेण्याऐवजी आपल्या सभापतीमार्फत संसदच काय बरखास्त केली, मुदतपूर्व निवडणुका काय घोषित केल्या, परंतु इम्रान यांनी आपले पद वाचवले असले तरी ते तात्पुरते असल्याचे आम्ही नमूद केले होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावावर मतदान घ्यायला लावल्याने निरुपायाने का होईना इम्रान यांना नामुष्कीने घरची वाट धरावी लागली. आता विरोधकांच्या हाती सत्ता जात असताना त्यांनी संसदेत विरोधकाची भूमिका बजावण्याऐवजी आपल्या सदस्यांना संसदेचे राजीनामे द्यायला लावले आहेत. इम्रान यांनी आपला हा रडीचा डाव अगदी टोकाला नेला आहे.
शहबाज शरीफ यांच्याकडे पाकिस्तानची सूत्रे आल्याने भारताने आनंदून जायचे काही कारण नाही. काश्मीरसंदर्भातील शहबाज यांची मते तेवढीच कडवी आहेत. हल्ली पंतप्रधानपद दृष्टिक्षेपात येताच त्यांना जरी सर्वधर्मसमभावाचा पुळका आलेला दिसत असला तरी आजवर भारताविरुद्ध तेही सतत गरळच ओकत आलेले आहेत. शहबाज हेही पाकिस्तानला चीनच्या पदराखालीच नेतील. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती रसातळाला पोहोचलेली आहे. त्यामुळे केवळ तेवढ्यासाठी ते आपल्या विदेशनीतीबाबत थोडी सौम्य भूमिका घेऊ शकतात, कारण कोणताही थेट संघर्ष त्यांच्या देशाला या परिस्थितीत परवडणारा नाही. पाकिस्तान महागाईत होरपळतो आहे. इम्रान खान यांच्या हकालपट्टीला विरोधकांनी जी दोन प्रमुख कारणे दिली ती अर्थातच गैरप्रशासन आणि आर्थिक गैरव्यवस्थापन हीच होती. इम्रान यांनी आपण कडवे इस्लामी नेते असल्याचा आव जरी शेवटी शेवटी आणला तरी त्याआड त्यांची आर्थिक बेबंदशाही लपू शकली नाही. विदेशी चलनसाठा रसातळाला पोहोचलेला दिसत असताना इंधनाचे दर कमी करण्यासारखे सवंग लोकप्रिय निर्णय घेऊन त्यांनी पाकिस्तानला आर्थिक संकटाच्या खाईत खोलवर नेले. एकीकडे श्रीलंकेमध्ये कशी दिवाळखोरीची स्थिती आलेली आहे हे दिसत असताना इम्रानही त्याच वाटेने चालले होते. त्यामुळेच त्यांचे समस्त विरोधक एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या बुडाखाली सुरूंग लावला.
पाकिस्तानमधील राजकारणात तेथील लष्कर, आयएसआय यांची भूमिका महत्त्वाची होती हे तर खरेच आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये पाकिस्तानी लष्कराने जरी तटस्थतेचा आव आणलेला असला, तरी इम्रानने आपल्याला पदावरून हटविण्याचे कारस्थान अमेरिकेने रचले असल्याचा आरोप केला, तेव्हा ज्या प्रकारे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी अमेरिका हा पाकिस्तानचा पारंपरिक दोस्त असल्याचे ठासून सांगितले, त्यावरून इम्रान आणि लष्कर यातील बेबनाव समोर आलाच आहे. आता नव्या राजवटीत लष्कराची भूमिका काय राहते, शहबाज आणि बिलावल भुत्तोंमधील सध्याची एकजूट किती अभंग राहते, शहबाज यांचे वय आणि प्रकृती त्यांना किती साथ देते, अशा बर्‍याच गोष्टींवर या नव्या राजवटीचे यशापयश अवलंबून असेल.