मोदींची स्तुती बंद करा
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणे बंद करावे, अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा केरळ कॉंग्रेसचे अध्यक्ष व्ही. एम. सुधीरन व उपाध्यक्ष एम. एम. हसन यांनी दिला आहे.
‘या अनुषंगाने पहिली कृती म्हणून मोदी यांची स्तुती करणे थांबवावे अशी सूचना आम्ही थरूर यांना करीत आहोत. थरूर यांची भूमिका कॉंग्रेसच्या आदर्शांविरोधात आहे’ अशी प्रतिक्रिया हसन यांनी व्यक्त केली. थरूर यांना कॉंग्रेसने खासदार बनवले हे त्यांनी विसरू नये. पक्षाच्या विचारांची मर्यादा त्यांनी ओलांडू नये असेही सुधीरन म्हणाले. मात्र थरूर यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. मोदी यांनी स्वच्छ भारत उपक्रमासाठी केलेल्या आवाहनाला आपण प्रतिसाद दिला असला तरी भाजपच्या हिंदुत्वविषयक कार्यक्रमाच्या बाजूने आपण मुळीच नाही असे त्यांनी स्पष्ट केले.