शवचिकित्सा अहवालानुसार मृत्यू गळफास घेतल्याने!

0
95

>> दिल्लीतील प्रकरण ः नातेवाईकांच्या मते त्यांच्या हत्या

उत्तर दिल्लीत बुरारी येथील एका घरात ११ जण संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळल्याप्रकरणातील ८ जणांच्या शवचिकित्सा अहवालात त्यांचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचे म्हटले आहे. मृत्यूपूर्वी त्यांच्याकडून प्रतिकार किंवा झटापट झाल्याबाबत कोणतीही चिन्हे शवचिकित्सेत आढळली नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. मात्र मृतकांच्या निकटवर्तीयांनी याप्रकरणी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान, सदर घरातील सर्वांनी मिळून ठरवून हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांनी घरात मिळालेल्या एका चिठ्ठीवरून व्यक्त केला आहे. ‘कोणी मरणार नाही, मात्र काही तरी मोठी प्राप्ती होईल’ असे त्या चिठ्ठीत लिहिलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर कुटुंबाच्या एका नातेवाईकाने सांगितले की, घरातील सर्वजण सुशिक्षित असून अंधश्रद्धांवर त्यांचा विश्‍वास नव्हता. हे कुटुंब सधन होते आणि त्या सर्वांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा केतन नागपाल या सदर कुटुंबाच्या नातेवाईकाने फेटाळला आहे. त्याच्या मते त्यांना ठार मारण्यात आले आहे. मृतांमध्ये नागपाल यांच्या आजीचा समावेश आहे. त्या कुटुंबाला कोणतीही आर्थिक समस्या नसल्याचे ते म्हणाले. त्यांना जर आत्महत्या करायची होती तर त्यांनी आपले चेहरे झाकले नसते व तोंडावर टेप लावली नसती.

कुटुंबाच्या आणखी एका नातेवाईकाने सांगितले की, आपण त्यांच्याशी शनिवारी (प्रकरण रविवारी समजले) रात्री बोललो होतो तेव्हा ते सर्वसामान्य वाटले. त्यांच्यात नैराश्याची भावना आढळली नाही. त्यांचे कोणाशी वैमनस्यही नव्हते. त्यांना कोणी तरी मारले असावे असे या नातेवाईकाने म्हटले आहे. मृतांपैकी मीनू (२३) ही प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी ट्यूशन्स घेत होती. तर निधी (२५) ही तिची बहीण पदव्युत्तर शिक्षण घेत होती असे त्यांनी स्पष्ट केले.