आंतरराष्ट्रीय योग दिनी योगाभ्यासकांचे मत
योग म्हणजे, मन, शरीर व आत्मा यांचे संतुलन व मिलन होय, असे मडगाव येथील अंबिका योग कुटिराचे योग शिक्षक व निवृत्त प्राचार्य विश्वनाथ स्वार यांनी काल आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले. हिंदू तत्त्वज्ञ व लेखक पातंजली हे योगाचे जनक असून, त्यांनी भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला योग ही दिलेली अनमोल अशी देणगी आहे, असे ते पुढे म्हणाले.
भारतात योगाचा प्रचार आणि प्रसार हा पुरातनकाळी ऋषिकेश येथून झाला. त्या अर्थी ऋषिकेश ही योगभूमी म्हणावी लागेल, अशी माहिती देखील स्वार यांनी दिली. योग विद्येद्वारे मन, शरीर व आत्मा यांचे संतुलन घडवून आणण्यात यश मिळवल्यानंतर त्या माणसाची जी प्रगती होते, ती कल्पनेपलीकडील अफाट एवढी असते. योगाद्वारे माणसाचे मन आणि शरीर फक्त निरोगीच होत नाही, तर त्या माणसाचा आत्माही पवित्र होतो. आणि त्या माणसाचे संपूर्ण जीवनच आनंददायी होत जाते. योगाद्वारे निरोगी व उच्च विचारसरणी असलेला समाज उदयास येतो, असेही स्वार म्हणाले.
योगामुळे माणूस निरोगी व बलवार
योग माणसाला उर्जावान बनवतो, निरोगी बनवतो, बलवान बनवतो. जीवन कसे जगावे ते योग शिकवतो. रोजच्या 24 तासांपैकी किमान एक तास योगाभ्यासासाठी देणे सहज शक्य आहे. आपण स्वत: पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत योगाभ्यास करतो. आपला हा दिनक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून चालू असून, त्यात आपण खंड पडू दिलेला नाही, असे स्वार यांनी सांगितले.
आनंददायी जीवनासाठी
योगाशिवाय पर्याय नाही
जीवनात आनंदी रहावे की दु:खी, निरोगी रहावे की रोगी हे प्रत्येक माणसाला ठरवावे लागते. माणसाचे जीवन हे अल्पकाळाचे आहे. एखादा माणून जास्तीत जास्त 100 वर्षे जगतो. हे जगणे आनंददायी बनवण्यासाठी योगाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्वार यांनी नमूद केले.
योगाकडे दुर्लक्ष झाल्याने
विविध व्याधींचा विळखा
आपल्या धर्माने व पूर्वजांनी योग ही आम्हाला दिलेली फार मोठी व अनमोल अशी देणगी आहे. आधुनिक काळात आम्हाला योगाविद्येचा विसर पडल्याने व लोक योग विद्येकडे दुर्लक्ष करू लागल्याने त्यांना विविध रोगांचा व व्याधींचा सामना आता करावा लागत असल्याचे स्वार म्हणाले. जगभरात हृदयविकार वाढू लागला आहे. मधुमेहाचे प्रमाण तर खूपच वाढले आहे. मानसिक आजारही वाढू लागले आहेत. योगाद्वारे ह्या रोगांवर प्रतिबंध ठेवणे शक्य असल्याचे ते म्हणाले. सर्वांनीच योगाभ्यास करून निरोगी व सुखी जीवन जगावे, असा सल्लाही स्वार यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शेवटी दिला.
योगाभ्यासाची सवय लावा : लोटलीकर
मडगाव घोगळ येथील चिन्मय आश्रममध्ये योग शिक्षण देणाऱ्या पी. अनुराधा लोटलीकर दै. ‘नवप्रभा’शी बोलताना म्हणाल्या की, पहाटे उठून रोज योग करणे ही चांगली सवय सर्वांनीच लावून घ्यायला हवी. योग केल्याने निरोगी जीवन प्राप्त होते. मानसिक व शारीरिक असे दोन्ही आरोग्य चांगले राहते.
निद्रानाश, क्रोधावर नियंत्रण
योगाद्वारे निद्रानाश, ताणतणाव, चंचल स्वभाव, क्रोध, भीती, निराशा आदींवर सहजपणे विजय मिळवता येतो. आळस कुठल्या कुठे पळून जातो. जीवनाला एक शिस्त लागते. पहाटे लवकर उठून योग केल्यानंतर जो मानसिक अनंद मिळतो व जी मनशांती मिळते त्याला तोड नाही. सर्वांनीच प्राणायाम, योगासने व सूर्यनमस्कार घालणे नित्यनियमाने करायला हवे, असे लोटलीकर म्हणाल्या.
कोणते आसन कोणत्या आजावर फायदेशीर?
वेगवेगळ्या योगासनांद्वारे वेगवेगळ्या रोगांवर विजय मिळवणे अथवा त्यांना प्रतिबंध करणे शक्य आहे. ‘प्रत्याहारा’ योगाद्वारे माणसाला केवढ्याही मोठ्या तणावाच्या स्थितीतून बाहेर आणता येते.
‘उज्जई प्राणायाम व मार्जारासन’ यासारखे अत्यंत साधे आसन हे हृदयरोगींसाठी खूपच चांगले आहे.
‘शीर्षासन’, ‘सर्वांगासन’ अशा आसनांद्वारे वाढत्या वयामुळे येणारे म्हातारपण पुढे ढकलता येते. मानवी शरीराला सर्वच योगासने नवसंजीवनी प्राप्त करुन देतात, असे विश्वनाथ स्वार यांनी सांगितले.