एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीतून धडा घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करताना मोठी खेळी केल्याचे उघड झाले आहे. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दोन दिवस आधीच निवडणूक आयोगाला एक ईमेल पाठवत केवळ पक्षाचे नाव आणि पक्षचिन्हावरच नाही, तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने निवडणूक आयोगातील सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून, तसे पत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन शरद पवारांना हटवत अजित पवार यांची निवड केल्याच्या आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादीवरच अजित पवार गटाने दावा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाला अजित पवारांकडून 30 जूनला याबाबत ईमेल मिळाला. याचा अर्थ राष्ट्रवादीत बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारचा भाग होण्याच्या दोन दिवस आधीच अजित पवारांनी या सर्व खेळी केल्या. त्यात त्यांनी 40 आमदार व काही खासदारांची प्रतिज्ञापत्रही सादर केली. तसेच आपल्याला पक्षाने एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्याचेही नमूद केले आहे, असा दावा एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने आपल्या वृत्तात केला आहे.
कोणाकडे किती संख्याबळ?
अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून काल मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार गटाकडे जवळपास 30-35 आमदार आणि 5 विधान परिषद आमदारांचा पाठिंबा आहे, तर शरद पवार गटाकडे 16 ते 18 आमदार आणि 6 खासदारांचे संख्याबळ आहे.
तुम्ही कधी थांबणार आहात की नाही?
गेली अनेक वर्षे तुम्ही राजकारण आहात. आता 82-83 वर्षांचे झालात. नवीन नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असा सवाल अजित पवारांनी कालच्या मेळाव्यात शरद पवारांना केला. चार की पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो. मी तर विक्रमच केला; पण तिथेच गाडी थांबते, पुढे काही जात नाही. राज्याचा प्रमुख व्हावे, अशी आपली देखील इच्छा आहे, असे अजित पवार म्हणाले.
पक्ष आणि चिन्ह जाऊ देणार नाही
आज अनेकांनी वेगळी भूमिका घेतली, त्याबद्दल माझं काही मत नाही, पण पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिले, त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली. मात्र काही झाले तरी पक्ष आणि चिन्ह जाणार नाही, ते जाऊ दिले जाणार नाही, असा ठाम विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.