शरणार्थींना सन्मानाने जगण्यासाठी सीएए

0
145

>> पणजीतील भव्य जाहीर सभेत भाजप नेते जे. पी. नड्डा यांचा दावा

पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश या देशांतून धार्मिक छळाला कंटाळून भारतात आलेल्या हिंदू, बौद्ध (ख्रिस्ती), जैन आदी धर्मांतील लोकांना भारतात आश्रय मिळावा व सन्मानाने जीवन जगता यावे यासाठीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत संमत केला असल्याचे भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी काल पणजीतील आझाद मैदानावर सदर कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेतून स्पष्ट केले.

भारत हा मानवतावादी देश आहे आणि मानवतावादी दृष्टीकोन ठेवूनच हा कायदा करण्यात आला असल्याने नड्डा म्हणाले. आता हा कायदा झाला असल्यानेे वरील तिन्ही देेशांतून येऊन भारतात स्थायिक झालेल्या मुसलमान सोडून सर्व धर्मांतील लोकांना नागरिकत्व मिळणार असल्याचे त्यांना भारतात सर्व हक्क मिळतील व सन्मानाने जगता येईल, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.

लम्हों ने खता की थी
सपनों ने सजा पाई
भारत-पाकिस्तान अशी जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा लाखों लोकांची हत्या झाल्याचे सांगून नड्डा म्हणाले की ‘लम्हों ने खता की थी, सपनों ने सजा पाई.’
तद्नंतर १९५० साली जवाहरलाल नेहरु लियाकत अली करार करण्यात आला होता. या कराराद्वारे दोन्ही देशांनी आपापल्या अल्पसंख्यकांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांना सगळे हक्क देण्याचे ठरले होते. मात्र, पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र बनले व तेथे अल्पसंख्याक हिंदूवर अत्याचार व्हायला लागल्याचे नड्डा म्हणाले.

या कायद्याखाली मुस्लिमांना
आणण्याचा प्रश्‍नच नाही
पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या देशांत मुस्लिम हे बहुसंख्याक आहेत. त्यामुळे तेथे त्यांच्यावर अत्याचार होण्याचा प्रश्‍नच नाही आणि म्हणूनच त्या देशांतील मुस्लिमांना सीएएखाली आणण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे सांगून कॉंग्रेस विनाकारण मुस्लिमांना वगळण्यातआल्याचे सांगून त्यांना भडकावत असल्याचा आरोप नड्डा यांनी यावेळी केला.

कुणाचेही नागरिकत्व रद्द होणार नाही
सीएएमुळे भारतातील कुठल्याही नागरिकांचे नागरिकत्व रद्द होणार नाही. या कायद्यात तशी तरतूद नाही. त्यामुळे विरोधी पक्ष पसरवीत असलेल्या अफवांवर जतनेने लक्ष देऊ नये, असे नड्डा म्हणाले.

६० वर्षांपासून प्रलंबित
प्रश्‍न मोदींनी सोडवले
नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर गेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासून अडून पडलेले कित्येक प्रश्‍न सोडवल्याचे नड्डा म्हणाले. जम्मू आणि काश्मिरातील ३६० कलम रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला. मुस्लिम महिलांना भेडसावणारा ‘तीन तलाक’ प्रश्‍नीही त्यानी तोडगा काढला. आणि आता सीएए संमत केला. यामुळे देशाला भेडसावणार्‍या कित्येक समस्या दूर झाल्या असल्याचे ते म्हणाले.
काश्मीरमध्ये ३६० कलम रद्द केल्याने ते राज्य मुख्य प्रवाहात आले.तीन तलाक रद्द केल्याने मुस्लिम महिलांना न्याय मिळाला. आता सीएएमुळे धर्मछळामुळे भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना न्याय मिळणार असल्याचे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी हे मोठे नेते असून त्यामुळे सध्या त्यांची जागतिक नेते अशी ओळख निर्माण झाली असल्याचे नड्डा म्हणाले. अमेरिकेसारख्या देशातही मोदीना चांगला मान मिळत असून त्यांच्या नेतृत्व गुणांमुळेच त्यांचा सर्वत्र गवगवा असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या आयुष्मान भारतसारख्या योजनेची जागतिक स्तरावर दखल असल्याचे सावंत म्हणाले. समान नागरी कायदा अस्तित्वात असलेले गोवा हे देशातील एकमेव राज्य असून येथे सगळे गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे ते म्हणाले. यापुढेही गोमंतकीय तसेच राहणार असून सीएएमुळे गोमंतकीयांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे ते म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री माविन गुदिन्हो, प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर व माजी सभापती राजेंद्र आर्लेकर आदींचीही भाषणे झाली.
सभेपूर्वी पाटो येथील काढलेल्या मिरवणुकीत सुमारे ५ हजार नागरिक सहभागी झाले होते. तर त्यानंतर आझाद मैदानावर झालेल्या जाहीर सभेला सुमारे ८ हजार लोक उपस्थित होते.

मुस्लिम २ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांवर
भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात मुसलमानांची संख्या ही २ टक्के एवढी होती. आता ती वाढून १४ टक्के एवढी झाली आहे. या उलट पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या देशांत हिंदूची संख्या घटली आहे. ही संख्या कशी काय घटली असा प्रश्‍न त्यांनी यावेळी केला. अफगाणिस्तानमध्ये एकेकाळी ५० हजार शिख कुटुंबे होती. आता फक्त २ हजार कुटुंबे असल्याचे नड्डा म्हणाले. धर्मछळामुळे वरील राष्ट्रांतील अल्पसंख्यांकाची संख्या कमी झाली आहे असे त्यांनी नमूद केले.

२०१४ नंतर आलेल्यांना नागरिकत्व मिळणार नाही
डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात येऊन स्थायिक झालेल्या पाक, अफगाणी व बांगलादेश येथील अल्पसंख्यांकानाच भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. धार्मिक छळामुळे पळून येऊन भारतात आश्रय घेतलेल्या या अल्पसंख्यांकाना भारतीय नागरिकत्व मिळालेले नसल्याने त्यांना कित्येक अडचणींना सामना करावा लागत असून सन्मानाने जगता येत नाही आणि म्हणूनच मानत्त्वावादी दृष्टीकोन ठेवून त्यांच्यासाठी केंद्राने सीएए संमत केला असल्याचे नड्डा यांनी नमूद केले.

सीएएविषयी कॉंग्रेस नेते अज्ञानीच
सर्वांत जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसमधील एकाही नेत्याला सीएएवर बोलता येते नसून राहूल गांधी यानी या कायद्यावर दहा ओळी बोलून दाखवाव्यात. राहूल गांधी यानी वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ते करायचे सोडून कॉंग्रेस नेते जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप नड्डा यांनी यावेळी केला.