शब्द शब्द जपून ठेव…!

0
323
  • लक्ष्मी जोग
    (फोंडा)

फोंडा येथील श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेने आयोजित केलेले १७ वे गोमंतक महिला साहित्य संमेलन फोंड्यातील काही स्त्रियांनी एकत्र येऊन यशस्वी करून नारीशक्तीची एकी जगाला दाखवली आहे. यंदा हे संमेलन रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. तर… कसे झाले १७ वे महिला साहित्य संमेलन याचा हा लेखाजोखा!

यंदाच्या संमेलनाचा विशेष म्हणजे ललित लेखांचे अभिवाचन, दुसरं म्हणजे स्मरणिका व सत्रांची नावं यांच्यात ‘शब्द’ या शब्दाचा (अक्षरांचा) नाविन्यपूर्ण उपयोग जसे ‘शब्दांकूर’, ‘शब्द लालित्य’, ‘शब्दवेध’, ‘शब्दसंवाद’, ‘शब्द काव्य’ , तसेच बोली भाषेची झलक दाखवणार्‍या कविता!!

‘‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे’’, असे म्हणत अत्युच्च विकास साधत असलेली आजची स्त्री पुढे चालली असली तरी पूर्वग्रहदूषितपणे तिला दिलेली दूषणे काही कमी होताना दिसत नाहीत. ‘तिचे अस्तित्व चूल आणि मूल यांच्यापुरतंच’, ‘ती अबला! ती काय करणार ते समजलेलं आहे!’ ‘तिच्या लेखनाला वरणभाताचा वास येतो’- अशी तिला कमी लेखणारी वक्तव्ये अजूनही तिचा पाठलाग करतच असतात. तिला फक्त भोगदासी समजून तिचा उपभोग घेतात.

पण तीच स्त्री एकत्र येऊन काय करू शकते? याचे साक्षात उदाहरण पाहायचे झाल्यास फोंडा येथील श्री शारदा ग्रंथालयाच्या महिला साहित्य संमेलनाकडे पहावे. दहा पुरुष एकत्र राहतील पण दोन स्त्रिया एकत्र काम करूच शकत नाहीत- या समजुतीला खोटी ठरवली आहे शारदा सख्यांनी! कारण आजपर्यंत १६ आणि यंदाचे १७ वे महिला साहित्य संमेलन यशस्वीरीत्या व दरवर्षी चढत्या दिमाखात भरवून त्यांनी नारी शक्तीची एकी जगाला दाखवली आहे. संमेलनाची सर्व कामें महिलांनीच करायची हा कानमंत्र आम्हाला स्व. माधवीताईंनी दिला आणि एकदिलाने काम करून आम्ही तो पाळला. खांद्यावर पालखी घेण्यापासून ते खुर्च्या ठेवण्या-काढण्यापर्यंत व सभागृह स्वच्छ करण्यापर्यंत सर्व कामं आमच्या सख्या आनंदाने करताना दिसतील.

यंदा २० ऑक्टोबर ही संमेलनाची तारीख निश्चित होऊन समजली आणि सर्व शारदा सख्यांनी पदर खोचले (काहींनी ओढण्या.) बैठक घेतल्यानंतर प्रत्येकीला आपापले काम काय ते समजले. त्याआधी संमेलनाध्यक्षांचं नाव नक्की करून त्यांच्याशी फोन संपर्क झालाच होता. लग्नकार्यात ज्याप्रमाणे लग्नदिवस जवळ आल्यावर तयारीला वेग येतो त्याचप्रमाणे आमच्या संमेलनाचे असते. फोना-फोनी करून अध्यक्षा व विशेष अतिथींचे बायोडेटाज मागवणे व अन्य छपाईची कामे यांची धांदल उडते. निमंत्रण पत्रिका छापून आल्या की त्या पाठवण्याचे काम असतेच. जवळच्या परिसरातल्या लोकांना त्या शेवटच्या आठवड्यात देतात. कारण त्यांना विसर पडू नये म्हणून! शिवाय जाहिराती मिळवायचेही काम असतेच!

अगदी आदल्या दिवशी पालखी सजवण्याचे महत्त्वाचे काम उमेदीने व भक्तिभावाने चार-पाच जणी हसत खेळत करतात. ऐन संमेलन-घाईसुद्धा याच दिवशी असते. सामान हॉलवर पोचवणे, हॉलची व व्यासपीठाची सजावट करणे, हॉलमधली इतर व्यवस्था पाहणे ही कामे स्वतःच जाऊन करावी लागतात. रांगोळी काढावी लागते.
हे सगळं यंदाही ठरल्याप्रमाणे आदल्या दिवशी पार पडलं आणि २० ऑक्टोबर हा संमेलनाचा दिवस उजाडला. फोंडा येथील हे महिला साहित्य संमेलन म्हणजे महिलांनी महिलांसाठी भरवलेलं महिलांचं संमेलन असलं तरी इथे पुरुषांची मदत घेतली जात नसली तरी प्रेक्षक व साहित्य रसिक म्हणून सहभागी होण्यास त्यांना प्रत्यवाय नसतो, हे पहिला संमेलनापासूनच ठरले आहे. त्यामुळे महिलांबरोबर पुरुषही येऊ लागले होते. सख्यांना रात्रभर झोप न लागल्याने (संमेलन चांगले होण्याच्या काळजीने) त्या पहाटेच घरातलं सगळं आवरून, व्यवस्था लावून (ते तर बायकांना चुकतच नाही!) सजून – धजून, आवडीची साडी परिधान करून हॉलवर यायला सुरवात झाली.

प्रत्येकीने आपापल्या कामाचा ताबा घेतला ः स्वागत कक्ष,व्यासपीठ व्यवस्था, दिंडी व्यवस्था शिवाय नाश्त्याची मांडणी (होऽ ऽ! ती मुख्य ना!) या सगळ्याची जय्यत तयारी पाहून येणार्‍या सख्या, साहित्य प्रेमी महिला व पाहुण्या खुश झाल्या होत्या. थोड्याच वेळात संमेलनाचं उद्घाटन होणार हे तिथल्या लगबगीवरून लक्षात येत होतं.
‘पुंडलीक वरदा ऽऽ ह ऽ ऽ री विठ्ठल ऽ ऽ! श्री ज्ञानदेव तुकाराम ऽ ऽ! ’ असा जयघोष होताना संमेलनाध्यक्षा श्री ज्ञानदेवांच्या फोटोला व ग्रंथाची पूजा करून ओवाळीत होत्या. ते झाल्यावर सख्यांनी पालखी खांद्यावर घेतली. दिंडी चालली चालली मराठीच्या उत्सवाला! विठूचा गजर करून, हरिनाम मुखाने म्हणत पालखी पायघड्यांवरून दिमाखात व्यासपीठाजवळ फुलांनी सजवलेल्या स्थानी आली. तिथे पुन्हा आरती झाली. सगळे उपस्थित स्थानापन्न झाले. पालखीतील श्री माऊलींच्या साक्षीने संमेलनाची सुरवात झाली.

सुरुवातीला शारदास्तवन झालं. व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा मा. मेघना सावईकर, स्वागताध्यक्षा मा. ममता बदामी, उद्घाटक मा. अंजली आमोणकर आणि कार्याध्यक्ष मा. नूतन देव या विराजमान झाल्या. या सर्वांचे व उपस्थितांचे स्वागत ओळख करून घेत ‘शब्दांकूर’ या पहिल्या सत्राची सुरुवात झाली.
‘‘शब्द माझे सोबती| शब्द माझे संगती| शब्द माझी माऊली| शब्द माझी सावली|’’ अशा शब्दांच्या सोहळ्यात पहिल्या सत्राचा प्रारंभ विद्यानं केला. सर्व सभागृह ‘शब्द’ मोहिनीने भारले होते. लगेचच उद्घाटिका मा. अंजली आमोणकर यांच्यासह सर्व मान्यवर दीपप्रज्वलनासाठी दीपवती (समई) जवळ आल्या. दीपप्रज्वलनाने संमेलनाचे विधिवत् उद्घाटन झाले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. आश्‍लेषा महाजन म्हणाल्या, ‘‘साहित्य व कलाक्षेत्रातील नवोदितांनी सुरक्षित मर्यादांच्या कक्षेत समाधान न मानता मुक्त आकाशात झेप घेण्याची तयारी ठेवली पाहिजेः त्यांना मर्यादांचे कुंपण नसावे. नवनिर्मितीसाठी मूलभूत विचार करण्याचे व उगमाच्या तळाशी जाण्याचे ध्येय व धैर्य बाळगले पाहिजे. समन्वयाचा धागा पकडून परंपरा व नवतेचा समन्वय साधत पुढे गेले पाहिजे. लेखनामागील प्रेरणा, माणूस व निसर्गामधील गूढ नावे तसेच वाङ्‌मयीन इतिहासाा त्यांनी मागोवा घेतला. स्त्री ही मुळातच सृजनशील व निसर्गाशी एकरूप होणारी असते. साहित्य निर्मिती हा एकांताचा उत्सव व लोकांताची मैफल असते. व्यक्त होणे हा स्वशोधाचा प्रवास आहे असे त्या म्हणाल्या. गोव्यातील भाषेला मातीचा गंध आहे. जगाला या प्रदेशाला अनेक प्रतिभावंत दिले आहेत. हीच गोव्याची खरी श्रीमंती आहे. असे त्यांनी सांगितले.

उद्घाटक मा. अंजली आमोणकरांनी शारदा ग्रंथालयाला शुभेच्छा दिल्या. ममता बदामी यांनी स्वागतपर भाषणात कार्यक्रमांचा आढावा घेतला.
तद्नंतर संस्कृत भाषेच्या विदुषी आ. सौ. अपर्णा पाटील यांचा संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्कृतमधून लिहिलेल्या मानपत्राचे वाचन मंजिरी पाटील यांनी केले. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या ‘‘वेद आणि उपनिषदात स्त्रियांच्या साहित्यनिर्मितीचे संदर्भ सापडतात. स्त्रियांना भाषेचा प्रचंड मोह असतो. त्यांना व्यक्त व्हायला खूप आवडते. म्हणूनच त्या सतत बोलत असतात.’’
याच सत्रात सुरुवातीला ‘अक्षर वृंद’ या स्मरणिकेचे व डॉ. सौ. अरुणा भदौरिया यांच्या ‘‘छोटी स्मृतियां’’ या हिंदी पुस्तकाचे तसेच माधुरी उसगावकरांच्या ‘‘गहिरे स्वप्न’’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सत्राची सांगता संगीता अभ्यंकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

दुसरे सत्र होते ‘शब्द लालित्य’! या नाविन्यपूर्ण सत्रात आमंत्रित लेखिकांनी आपापल्या ललित लेखांचे अभिवाचन केले. त्यात गौरी भालचंद्र, हिरिजा मुरगोडी, लीना पेडणेकर, रेवा दुभाषी, पौर्णिमा केरकर व अपूर्वा ग्रामोपाध्ये या होत्या. अंजली आमोणकर या सत्राच्या अध्यक्ष होत्या. यात उत्तमोत्तम ललित लेख श्रोत्यांना ऐकायला मिळाले.
यानंतरचं सत्र होतं ‘शब्दवेध’ हे! या सत्रात स्मार्ट फोनवर गुगल प्ले करून पडद्यावरच्या प्रश्‍नांना फोनवर टीक करून उत्तरे द्यायची होती. कौन बनेगा करोडपतीच्या धरतीवरील हा खेळ सर्वांनाच आवडला. यानंतर दीड ते अडीच ही वेळ भोजनासाठी होती.

भोजनानंतर ‘शब्द संवाद’ हे मुलाखतीचे सत्र होते. आरती गोखले, पुणे या अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ग्रीन कॉरिडोरचे नियोजन करणार्‍या समन्वयक व उज्ज्वला परांजपे, सांगली या तीन दशकांपासून अनाथ मुले व एड्‌सग्रस्त स्त्रिया यांच्यासाठी कार्यरत आहेत. या दोघींची मुलाखत संगीता अभ्यंकर व डॉ. पूर्वा सहकारी यांनी घेतली. सकारात्मक होणे गरजेचे आहे. भारतासारख्या १३० कोटी जनसंख्या असणार्‍या देशात वर्षाकाठी केवळ ९०० लोक मृत्यूपश्चात् अवयवदान करतात ही खेदाची गोष्ट आहे. १८ वर्षांवरील कुठलीही व्यक्ती मरणोत्तर अवयवदान करू शकते. यात कसलाही म्हणजे श्रीमंत-गरीब , मजूर किंवा खालच्या वर्गातील लोक यात भेदभाव नाही. अशिक्षित किंवा मजूर व खालच्या वर्गातील लोक जास्त संख्येने अवयवदान करतात असे त्यांनी आवर्जून सांगितले.

उज्ज्वला परांजपे म्हणाल्या, कुठलीही स्त्री स्वेच्छेने देहविक्रय करीत नाही. परिस्थिती तिला त्या व्यवसायात ढकलते. एकदा तिथे गेल्यावर तिला पुन्हा सामान्य लोकात आणणे कठीण असते. ती पुनर्वसनाला तयार होय नाही. त्यांच्या पोटी जन्मलेल्या अपत्याला दत्तक घ्यायला कुणीही भारतीय तयार होत नाही. त्यांच्या मानसिकतेत अजूनही बदल होत नाही. अशा मुलांचे पुनर्वसन करणे कठीण असते. त्यांनी यावेळी देहविक्रय करणार्‍या व एड्‌सबाधीत स्त्रियांचे अनेक अनुभव सांगितले.
दोन्ही विषय अतिशय गंभीर व सहसा न बोलले जाणारे असल्यामुळे त्याबद्दल अतिशय उत्सुकता श्रोत्यांमध्ये होती. दोघीही मान्यवर तळमळीने बोलत होत्या. त्यामुळे या मुलाखतीतून श्रोत्यांना बरीच माहिती मिळाली.

यानंतरच्या सत्राचे नाव होते ‘शब्दकाव्य’! या सत्रात ‘कविता तुझी नि माझी’ या शिर्षकाखाली टीम आश्‍लेषा व टीम हर्षदा असे दोन गट करून एकाच विषयावरच्या पूरक कविता दोघी-दोघींनी सादर करायच्या असा अभिनव प्रयोग होता. दोन्ही गटांच्या या जुगलबंदीत सर्वांनी उत्तमोेत्तम कविता सादर केल्या होत्या. सत्राच्या शेवटी भटी व चित्पावनी या बोली भाषेतल्या कविता श्रोत्यांना हसवून गेल्या.
यंदाच्या संमेलनाचा विशेष म्हणजे ललित लेखांचे अभिवाचन, दुसरं म्हणजे स्मरणिका व सत्रांची नावं यांच्यात ‘शब्द’ या शब्दाचा (अक्षरांचा) नाविन्यपूर्ण उपयोग, तसेच बोली भाषेची झलक दाखवणार्‍या कविता!!
शेवटी ‘शब्दतरू’ हे सत्र वेळेअभावी रहित करावे लागले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत उंची गाठत गेलेलं हे संमेलन सर्वांनाच खूप खूप आवडलं. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी… असं सांगणारं हे संमेलन कायमचे लक्षात राहील यात शंका नाही.

आपल्या देशात दीपावली हा सर्वांत मोठा व आनंदित करणारा हा सण मानला जातो. आपल्यातील प्रत्येक सण एक नवीन ऊर्जा आपल्याला देत असतो. आमच्या शारदा ग्रंथालयाच्या विश्‍वात अन्य कार्यक्रमात ‘महिला साहित्य संमेलन’ हाच मोठा सण असतो. या सणात आम्ही तमाम गोमंतकीय साहित्यप्रेमींना प्रेमाची मेजवानी साहित्यिक कार्यक्रमातून देत असतो असे म्हटले तर ते चूक ठरू नये!