शंकरसिंह वाघेला कॉंग्रेसमधून बाहेर

0
99

गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला कॉंग्रेसचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरू असतानाच काल वाघेला यांनी स्वतःहून आपल्या समर्थकांच्या जाहीर सभेत कॉंग्रेसने आपल्याला २४ तासांआधी बडतर्फ केल्याचे जाहीर केले. वाघेला यांच्या ७७ व्या वाढदिनानिमित्त या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दोन दशकांपूर्वी वाघेला यांनी भाजपचा त्याग करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, वाघेला यांनी आपण पुन्हा भाजपात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गुजरात विधानसभेच्या निवडणुका नजीक असल्याने या निवडणुकीत कॉंग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून आपल्या नावाचा विचार करावा अशी मागणी वाघेला यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींकडे केली होती. मात्र पक्षश्रेष्ठी योग्य प्रतिसाद देत नसल्याने ते नाराज होते. मुख्यमंत्रीपदाचा कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून आपले नाव पुढे केल्यास विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यात भाजपचा पराभव करणे कॉंग्रेसला शक्य होईल असा वाघेला यांचा दावा आहे.
राष्टपतीपदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गुजरातेत कॉंग्रेसच्या ५७ आमदारांपैकी ४० जणांनीच मीरा कुमार यांना मतदान केल्याच्या पार्श्‍वभूमीवर वाघेला यांनी नवी चाल खेळली आहे.