व्हायब्रंट परिषदेमुळे व्यापार व गुंतवणुकीस चालना

0
119

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती

>> उद्यापासून तीन दिवसांच्या परिषदेस प्रारंभ

व्हायंब्रट गोवा गुंतवणूक शिखर परिषद आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील व्यापार व गुंतवणुकीला चालना मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

व्हायंब्रट गोवा शिखर परिषद आणि प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून येत्या १७ ते १९ ऑक्टोबर २०१९ दरम्यान बांबोळी येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये ही शिखर परिषद होणार आहे. राज्यातील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. शिक्षण, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, हरित प्रकल्पांना चालना मिळू शकते. स्थानिक युवा वर्गाच्या गुणवत्तेला चालना मिळणार आहे. नवीन रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

या परिषदेत ५० – ५२ देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या ठिकाणी प्रदर्शनासाठी १७३ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. देश आणि विदेशातील सुमारे अडीच हजार प्रतिनिधी या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेबाबत १७ देशात रोड शो व इतर माध्यमांतून जनजागृती करण्यात आली आहे. तसेच देशातील २० राज्यांत जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामुळेच व्हायब्रंट शिखर परिषद आयोजनाची संकल्पना पुढे आली. मागील आठ महिन्यापासून शिखर परिषदेच्या आयोजनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. राज्य सरकारने या परिषदेच्या आयोजनासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य सरकारच्या उद्योग, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, आयडीसी व इतर खात्याचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

या परिषदेत राज्यातील तालुका पातळीवरील विकासाबाबत अहवाल जारी केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
या परिषदेत २५ व्याख्यान सत्रातून देश, विदेशातील प्रख्यात ८६ वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत, असे व्हायंब्रट परिषदेचे अध्यक्ष राजकुमार कामत यांनी सांगितले.
या शिखर परिषदेच्या दरम्यान १९ शिष्टमंडळे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी विविध विषयावर चर्चा करणार असून व्यापाराच्या आदान प्रदानाबाबत सामंजस्य करार केले जाणार आहेत, अशी माहिती मनोज कामत यांनी दिली.