>> अंत्रुज बास्केटबॉल स्पर्धा
व्हायएमसीए नाईट्स पणजी संघाने अंत्रुज बास्केटबॉल स्पर्धा २०१९चे अजिंक्यपद प्राप्त केले. अंत्रुज आर्ट अँड स्पोर्ट्स अकादमीतर्फे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने या स्व. राजेश पी कुंकळयेकर स्मृती अखिल गोवा बास्केटबॉल स्पर्धेचे फार्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बास्केटबॉल कोर्टवर आयोजन केले होते.
अंतिम सामन्यात व्हायएमसीए नाईट्स पणजीने फातोर्डा फायर मडगावचा २६-१२ अशा गुणफरकाने पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यांत व्हायएमसीए नाईट्स पणजीने असेलन्ट्सचा ३९-३७ असा निसटता पराभव केला होता. तर फातोर्डा फायरने यजमान अंत्रुज आर्ट अँड स्पोर्ट्स अकादमीला रोमहर्षक लढतीत ४५-४४ असे केवळ एका गुणाच्या फरकाने पराभूत केले होते.
बक्षीस वितरण सोहळ्याला गोव्याचे पर्यटन संचालन संजीव गडकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य कृपाशंकर एम. एस., आयोजक संघटनेचे मुख्य आधारस्तंभ संदीप खांडेपारकर, एआयसी प्रमोटर ज्ञानेश्वर हळदणकर, टाइम्स ऑफ इंडियाचे क्रीडा संपादक मार्कुस मेर्गुलाव व रघुवीर सांबारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचे औचित्त्य साधून टाइम्स ऑफ इंडियाचे क्रीडा संपादक मार्कुस मेर्गुलाव याचा त्याने क्रीडा क्षेत्रात आणि क्रीडा पत्रकारितेत दिलेल्या योगदानाबद्दल आयोजक संघटनेचे अध्यक्ष सचिन सुखटणकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच बंगलोर येथे झालेल्या ३६व्या वरिष्ठ राष्ट्रीय नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेल्या गोवा नेटबॉल वरिष्ठ संघाला यावेळी प्रशिस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.