– दीपक कृष्णा नार्वेकर
निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेल्या गोव्याला देश-विदेशांतील लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. इथले रमणीय सोनेरी वाळूचे किनारे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आलेले आहेत. आता त्याला जोडूनच साहस आणि निसर्ग-पर्यटनाला सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जाऊ लागल्याने पर्यटकांना नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. म्हादईच्या खोर्यातील व्हाईट वॉटर राफ्टिंग हा त्यातीलच एक.
हिरव्यागार गर्द वनराईने नटलेला म्हादई खोर्याचा परिसर पावसाळ्यात आणखीनच खुलतो. खळाळून पांढरेशुभ्र तुषार उडवत जाणारे म्हादई नदीचे पाणी नेहमीच साहसी पर्यटकांना व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी खुणावत होते. राज्य सरकारने अंतर्गत भागातील पयर्र्र्टनस्थळांचा विकास करण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर म्हादई नदीतील व्हाईट वॉटर राफ्टिंगच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पाठिंब्याच्या जोरावर पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल आणि पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांच्या प्रयत्नांमुळे म्हादई नदीच्या पात्रातील व्हाईट वॉटर राफ्टिंगचा उपक्रम यशस्वी होताना दिसत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सत्तरी तालुक्यातील म्हादई नदीच्या पात्रात राबवल्या जाणार्या या साहसी पर्यटन क्रीडाप्रकाराला पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढतच आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पंचायतीच्या सहकार्यामुळे व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले सत्तरी तालुक्याकडे वळू लागली आहेत. व्हाईट वॉटर राफ्टिंग हा उपक्रम ज्या भागात राबवला जातो तो परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे स्थानिक पंचायतीला रोख स्वरूपातील आर्थिक मदत दिली जाते. सर्वांकडून मिळणारे सहकार्य आणि एकत्रित प्रयत्नांमुळे व्हाईट वॉटर राफ्टिंग हा साहसी क्रीडाप्रकार पर्यटकांमध्ये लोकप्रिय होऊ लागला आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळाने सत्तरी तालुक्यातील म्हादई नदीच्या पात्रात व्हाईट वॉटर राफ्टिंगसारख्या साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम सुरू व्हावा यासाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. गोवा पर्यटन विकास महामंडळाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे पर्यटकांना साहसी पर्यटनाचा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पावसाळ्यातील गोवा अनुभवणे हा वेगळा आणि सुखद असा अनुभव असतो. सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागातून फेसाळत वाहणारे म्हादई नदीचे पात्र साहसी क्रीडाप्रकारासाठी उत्तम स्थळ आहे. जूनपासून सप्टेंबरअखेरपर्यंत पावसाळ्याच्या दिवसांत गोव्यातील पर्यटनस्थळांची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. नद्या-नाले ओसंडून वाहत असतात. डोंगर हिरवा शालू नेसून नटलेले असतात. उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात. अशा वातावरणात व्हाईट वॉटर राफ्टिंगचा उपक्रम राबवला जात असल्याने पर्यटकांना एका वेगळ्याच विश्वात गेल्याचे समाधान लाभत आहे. सरकारने जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळेच पावसाळी पर्यटनाचा हंगाम बहरू लागला आहे.
व्हाईट वॉटर राफ्टिंग या साहसी क्रीडाप्रकाराकडे पर्यटकांना आकर्षित करताना गोवा पर्यटन विकास महामंडळाने जॉन पोलार्ड यांच्यासारख्या तज्ज्ञाची मदत घेतली आहे. पोलार्ड यांच्या दांडग्या अनुभवाचा फायदा व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थरार अनुभवणार्या पर्यटकांना होत आहे.
व्हाईट वॉटर राफ्टिंग हा साहसी क्रीडाप्रकार सावदन रिव्हर ऍडव्हेन्चर्स ऍण्ड स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतर्फे राबवला जातो. या कंपनीची स्थापना २००७ मध्ये झाली असली तरी व्हाईट वॉटर राफ्टिंगमधील संस्थेचे कार्य २००१ पासून सुरू आहे. या कंपनीचे संस्थापक आणि चालक हे जॉन पोलार्ड असून त्यांच्याकडे जगभरातील रिव्हर राफ्टिंगचा २२ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील व्हाईट वॉटर राफ्टिंग हा साहसी क्रीडाप्रकार पर्यटकांच्या पसंतीस उतरू लागला आहे.
गोव्यात येण्यापूर्वी जॉन पोलार्ड यांनी दक्षिण भारतात व्हाईट वॉटर राफ्टिंग हा साहसी क्रीडाप्रकार रुजवण्यात आणि लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. कर्नाटक सरकारच्या सहकार्याने पोलार्ड यांनी ११ वर्षे तिथे व्हाईट वॉटर राफ्टिंग या साहसी क्रीडाप्रकाराची पर्यटकांना ओळख करून दिली आहे. गोव्यात पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतलेला व्हाईट वॉटर राफ्टिंगचा उपक्रमही पोलार्ड यांच्या सहकार्यामुळेच यशस्वी होऊ लागला आहे.
गेल्या तीन वर्षांत स्थानिकांबरोबरच देश-विदेशांतील हजारो पर्यटकांनी म्हादई नदीतील व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थरार एन्जॉय केला आहे. दरवर्षी व्हाईट वॉटर राफ्टिंगला मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. युरोपमधील पर्यटकांना साहसी क्रीडाप्रकारांचा आनंद लुटायला आवडतो. व्हाईट वॉटर राफ्टिंगचा आढावा घेता देशातील पर्यटकांबरोबरच विदेशातील पर्यटकही मोठ्या प्रमाणात व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी वेबसाइटवरून नोंदणी करत असल्याचे आढळून आले आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे थोड्या उशिराने हा साहसी क्रीडाप्रकार सुरू झाला असला तरी पर्यटकांचा प्रतिसाद अजिबात कमी झालेला नाही.
गोव्यातील जलक्रीडांना पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत आलेली आहे. समुद्रातील पाण्यापुरत्या मर्यादित असलेल्या जलक्रीडा प्रकारांमध्ये म्हादई नदीतील व्हाईट वॉटर राफ्टिंगमुळे आणखी एकाची भर पडली आहे. चहुबाजूंनी गर्द हिरवाई आणि फेसाळत वाहणारे नदीचे पाणी यामुळे रोमांचित होण्याचा अनुभव पर्यटकांना घेता येतो. १० किलोमीटरच्या व्हाईट वॉटर राफ्टिंगच्या प्रवासातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय असाच असतो. बिग डॅडी आणि जायंट हायस्टॅक्स अशा दोन प्रकारांत पर्यटक व्हाईट वॉटर राफ्टिंगचा आनंद लुटू शकतात.
म्हादई नदीच्या पात्रातील व्हाईट वॉटर राफ्टिंगचा अनुभव घेतल्यानंतर निसर्गप्रेमी पर्यटकांना नैसर्गिक विविधतेने नटलेल्या पश्चिम घाट आणि म्हादई वन्यजीव अभयारण्यात फेरफटका मारून वेगळ्या विश्वाची सफर करता येऊ शकते. एकाच वेळी आनंद द्विगुणित करण्याची संधी पर्यटकांना मिळत असल्याने व्हाईट वॉटर राफ्टिंगला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे.
व्हाईट वॉटर राफ्टिंग हा साहसी क्रीडाप्रकार असल्याने त्यात सहभागी होणार्या प्रत्येकाची जबाबदारी महत्त्वपूर्ण असते. व्हाईट वॉटर राफ्टिंगचा आनंद लुटण्यासाठी येणार्या पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यासाठी आवश्यक असणार्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीतच हा उपक्रम राबवला जात असल्याने कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय त्याचा आनंद लुटणे पर्यटकांना शक्य होत आहे.
व्हाईट वॉटर राफ्टिंगचा उपक्रम दिवसातून दोन वेळा आयोजित केला जातो. सकाळी १० वाजता आणि दुपारी २.३० वाजता. वाळपई येथून त्याची सुरुवात होते. पर्यटकांना वाहनातून वाळपई येथून व्हाईट वॉटर राफ्टिंगच्या ठिकाणी नेले जाते. त्यानंतर १० किलोमीटरचा व्हाईट वॉटर टफ्टिंगचा पल्ला पूर्ण केल्यानंतर पुन्हा पर्यटकांना वाहनाने वाळपई येथे आणून सोडले जाते. जवळपास तीन ते साडेतीन तासांचा वेळ त्यात कसा निघून जातो हे समजतही नाही. तुम्हाला साहसी क्रीडाप्रकार आवडत असतील तर निश्चितपणे एकदा तरी म्हादई नदी पात्रातील व्हाईट वॉटर राफ्टिंगचा आनंद लुटायला हरकत नाही. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी – ुुु.सेर्रींेीीळीा.लेा, ुुु.सेरीरषींळपस.लेा या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ०८३२-२४३८८६६, २४३७७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.