पणजी महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या काल घेण्यात आलेल्या बैठकीत नवीन मार्केटमधील व्यापार्यांसोबत करारपत्र करण्याचे काम लांबणीवर टाकण्यात येत असल्याने तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. मार्केटमधील व्यापार्यांशी करारपत्रे करण्याचे आश्वासन दिले जाते. तथापि करारपत्र निश्चित केल्यानंतर पुन्हा त्यात बदल करणे अयोग्य असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर मार्केटच्या विषयावर चर्चा करण्यासाठी येत्या ५ फेब्रुवारीला खास बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
मार्केटमधील व्यापार्यांसोबत करारपत्र करण्यासाठी एक मसुदा तयार करण्यात आला होता. या करारपत्राची कार्यवाही सुरू करण्याचे नगरपालिका प्रशासनाने निश्चित केल्यानंतर व्यापार्याकडून आक्षेप घेऊन करारपत्रासाठी ३० सूचना सादर केल्या आहेत. मागील तीन महिन्यात मार्केट समितीची बैठक झालेली नाही. जीएसआयडीसीच्या यादी प्रमाणे व्यापार्यांशी करारपत्रे करण्याची गरज आहे. महानगरपालिका क्षेत्रातील फिरत्या गाड्यांबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे, असे आयुक्त संजीत रॉड्रीगीस यांनी बैठकीत बोलताना सांगितले.
मनपा उपनियम दुरुस्ती
रेंगाळल्याने नाराजी
मार्केटमधील दुकानांची परस्पर विक्री केली जात आहे, अशी तक्रार नगरसेवकांनी केली. नगरसेवक रूपेश हर्ळणकर, सुरेंद्र फुर्तादो, पुंडलिक राऊत देसाई, राहुल लोटलीकर, मिनिनो क्रुझ, नगरसेविका वैदेही नाईक व इतरांनी मार्केट प्रश्नावर विचार मांडले. महानगरपालिकेच्या उपनियम दुरुस्तीची कामे रेंगाळत पडल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
मार्केटमधील दुकानांचे पुन्हा सर्वेक्षण करून घेण्यात आले आहे. मार्केटच्या प्रश्नावर ५ फेब्रुवारीच्या बैठकीत खास चर्चा केली जाणार आहे, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.
मिरामार, कांपाल येथे पर्यटकांना समुद्र सफारी करणार्या बोटीमुळे अस्वच्छता निर्माण होत आहे. समुद्र सफारी करण्यासाठी मिरामार येथे धक्का नाही. पर्यटकांना बोटीमध्ये चढण्यासाठी सुविधा नाही. याविरोधात कारवाई करण्याची गरज आहे, असे आयुक्त रॉड्रीगीस यांनी सांगितले.
महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागात केबल, जल, गॅस वाहिनी घालण्यासाठी खोदण्यात येणार्या रस्त्यामुळे नागरिक व वाहन चालकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. खोदण्यात येणार्या रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती केली जात नसल्याने दुचाकी वाहन चालकांना अपघात होत आहेत, असे नगरसेवक राहुल लोटलीकर यांनी सांगितले.