- – शशांक मो. गुळगुळे
गृह कर्ज, वाहन कर्ज व शैक्षणिक कर्ज ही बँकांच्या ‘किरकोळ’ कर्जे या कॅटेगरीत समाविष्ट होतात व बँका किरकोळ कर्जे देण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे गरजूंना सहज गृहकर्ज मिळू शकते. यांपैकी कोणता पर्याय स्वीकारायचा याचा निर्णय प्रत्येकाने विचारपूर्वक घ्यावा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या दोन पतधोरणांत ‘रेपो’दरात ९० बेसिक पॉईण्ट्सनी वाढ केल्यामुळे गृहकर्जदाराचा मासिक हप्ता वाढला. त्यामुळे नवीन गृहकर्ज घेणार्यांकडे एक पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे ‘होम लोन इंटरेस्ट सेव्हर अकौंट’ किंवा ‘स्मार्ट लोन’चा पर्याय स्वीकारणे. या कर्जासाठी कर्ज देणार्या यंत्रणांची वेगवेगळी नावे आहेत. आयसीआयसीआय बँकेचे नाव आहे- ‘मनी सेव्हर होम लोन’, स्टेट बँकेचे नाव आहे- ‘मॅक्सगेन होम लोन’, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या उत्पादनाचे नाव आहे- ‘होम सेव्हर.’ हा पर्याय सर्व गृहकर्ज घेणार्यांना योग्य ठरत नाही.
दुहेरी फायदा
यात तुमचे गृहकर्ज खाते चालू खात्याशी संलग्न केले जाते. या खात्यात तुम्ही कितीही रक्कम भरू शकता. जर रक्कम भरण्यात आली तर व्याज कमी भरावे लागते. बँक गृह खात्यातील शिल्लक व खात्यात भरलेली अतिरिक्त रक्कम यांचा रोज आढावा घेते व त्यानुसार गृहकर्जावर व्याज आकारणी केली जाते.
असे गृहीत धरू की, तुमच्या गृहकर्ज खात्यात ५० लाख रुपये रक्कम शिल्लक आहे आणि तुमचे इंटरेस्ट सेव्हर खात्यात २० लाख रुपये आहेत, तर गृहकर्जदाराला ३० लाख रुपये गृहकर्ज शिल्लकीवर व्याज आकारले जाणार. बँका साधारणपणे कर्जाचा जो मासिक हप्ता ठरविलेला असतो त्यात बदल करीत नाहीत, तर कर्जाचा कालावधी कमी करतात. जर गृहकर्जदाराला मासिक हप्तात बदल करायचा असेल तर तसे बँकेस सांगून करून घ्यावा लागतो. इंटरेस्ट सेव्हर खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी काही रक्कम किंवा सर्व रक्कम तुम्ही कधीही काढू शकता. गृहकर्जदाराने जर या खात्यातली रक्कम काढली तर त्याला जास्त व्याज भरावे लागेल. या अशा प्रकारच्या कर्जावर व्याजाचा दर जास्त असतो. नेहमीच्या गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षा या खात्यावर ०.५-०.६ टक्के व्याज जास्त आकारले जाते. जर तुमच्याकडे वरचेवर या खात्यात भरण्यासाठी पैसे उपलब्ध होत असतील तरच हे खाते उघडावे, नाहीतर हे खाते उघडून विनाकारण जास्त व्याज भरावे लागेल. नोकरदारांसाठी हा पर्याय चांगला आहे. कारण नोकरदार दर महिन्याला आपला पूर्ण पगार खर्च करीत नाहीत. त्यातील काही रक्कम वाचवितात. अशांनी जर गृहकर्ज घेतले तर हा पर्याय स्वीकारावा म्हणजे व्याज कमी भरावे लागेल. जर पगारदाराने त्याची रक्कम बचत खात्यात ठेवली तर त्याला अडीच ते तीन टक्के दराने व्याज मिळणार. जमा करून-करून मुदतठेव खात्यात ठेवली तर साडेपाच ते सहा टक्के दराने व्याज मिळणार. पण जर होम लोन इंटरेस्ट सेव्हर खात्यात ठेवली तर गृहकर्जावर भरावयाच्या व्याजाचे बरेच पैसे वाचतील. या खात्यात जमा केलेले पैसे गरज पडली तर परत काढण्याचीही सोय आहे. या खात्यात कर्जाच्या मुदतपूर्तीत ठरविलेल्या वेळेपूर्वी जास्त पैशांचा भरणा केला, तसेच मुदतपूर्तीपूर्वी कर्जफेड केली तर यासाठी शुल्क आकारले जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक वैयक्तिक कर्जे घेणार्यांना त्यांनी जर ‘फ्लोटिंग’ दराने कर्जे घेतली असतील तर काही शुल्क आकारत नाहीत. पण जर होम सेव्हर लोन घेतले असेल तर शुल्क आकारते.
होम लोन इंटरेस्ट सेव्हर खात्याला पर्याय म्हणजे नेहमीचे गृहकर्ज. यासाठी व्याजाचा दरही कमी असतो आणि वेळेआधीही कर्जाचा भरणा करता येऊ शकतो. व्याजही वाचविता येऊ शकते. गृहकर्जदाराला गृहकर्जातून अधिकचे पैसे भरून लवकर बाहेर पडायचे असेल तर ‘सेव्हर’ खात्याचा विचार करू नये. ही कर्ज योजना सर्व बँकांकडे नाही.
देशात अर्थचक्राला चालना मिळावी म्हणून रिझर्व्ह बँक गेली कित्येक वर्षे ‘रेपो’दर, ‘रिव्हर्स रेपो’दरात वाढ करत नव्हती. उद्योजकांना कमी व्याजदराने कर्जे मिळावीत व उद्योगचक्र चालू राहून देश आर्थिक मंदीतून बाहेर यावा हे रिझर्व्ह बँकेचे धोरण होते. त्यामुळे त्या काळात देशात कर्जेही कमी व्याजदराने दिली जात होती. परिणामी ठेवींवरही कमी दराने व्याज दिले जात होते. पण देशात चलनवाढीचे प्रमाण प्रचंड वाढले व ते नियंत्रणात येणे कठीण झाले, त्यामुळे रिझर्व्ह बँकेने चलनवाढीला आळा बसावा म्हणून गेल्या दोन पतधोरणांत ‘रेपो’दर वाढविला. परिणामी बँकांनी सर्व तर्हेच्या कर्जांवरील व ठेवींवरील व्याजदर वाढविले. नजीकच्या भविष्यात रिझर्व्ह बँक ‘रेपो’दर ६ टक्क्यांपर्यंत वाढवेल असा अंदाज व्यक्त होत आहे. परिणामी, गृहकर्जावरील व अन्य व्याजदरही वाढणार.
ज्यांच्याकडे सतत पैसा/निधी येत असतो अशांसाठी ‘इंटरेस्ट सेव्हर’ हा चांगला पर्याय आहे. या खात्याचे एक उदाहरण घेऊ- गृहकर्जदाराने १ कोटी रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी ७.५० टक्के दराने घेतले आहे. हा गृहकर्जदार त्याच्या इंटरेस्ट सेव्हर खात्यात १५ लाख रुपये शिल्लक ठेवतो असे मानू. जर इंटरेस्ट सेव्हर खात्यात काही रक्कम असेल तर अशा गृहकर्जदाराला महिन्याला मुख्य रक्कम व व्याज मिळून रु. ८० हजार ५६० रुपये बँकेत भरावे लागतील. आणि जर वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या सेव्हर इंटरेस्ट खात्यात १५ लाख जमा असतील तर त्याला महिन्याला रुपये ७१ हजार ५४४ भरावे लागतील. म्हणजे रुपये ९,०१६ वाचतील. संपूर्ण वीस वर्षांच्या कालावधीसाठी गृहकर्जदाराचे २१ लाख ६३ हजार ८३२ रुपये व्याजापोटी वाचतील व फक्त ५.९८ टक्के दराने गृहकर्ज भरावे लागेल. गृहकर्जाचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक कर्जदारास त्यास जो योग्य वाटेल तो पर्याय स्वीकारावा.
गृह कर्ज, वाहन कर्ज व शैक्षणिक कर्ज ही बँकांच्या ‘किरकोळ’ कर्जे या कॅटेगरीत समाविष्ट होतात व बँका किरकोळ कर्जे देण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे गरजूंना सहज गृहकर्ज मिळू शकते. यांपैकी कोणता पर्याय स्वीकारायचा याचा निर्णय प्रत्येकाने विचारपूर्वक घ्यावा.