- दत्ताराम साळगावकर
व्यवस्थापनाकडे कौशल्य लागतं. हाताखालच्या लोकांचा विश्वास, जवळीक व आदर प्राप्त करणारी व्यक्ती चांगला व्यवस्थापक बनू शकते; ते ‘रिंगमास्टर’ होऊन शक्य नसतं. व्यवस्थापकावर जबाबदार्या असतात, त्याची कर्तव्यं असतात व त्याला अधिकारही असतात. पण ‘सौजन्याची ऐशीतैशी’ करायची नसते.
‘व्यवस्थापन’ हा शब्द पूर्वीही होता, आजही आहे. पूर्वीपेक्षा आज या शब्दाची धार, व्याप्ती थोडी वाढल्यासारखी वाटते. बदलणारा काळ आपल्यासोबत बदल घेऊन येतो. शब्दांचे अर्थ, संदर्भ तेच असतात; फक्त जुनं-नवीन असा फरक असतो, निरर्थक असला तरी! व्यवस्थापन कुठे नसतं? आपण जे काही करतो, जबाबदार्या निभावतो त्यामागे विशिष्ट अशी पद्धत असते. आपण विचारपूर्वक मांडणी करतो, विचारपूर्वक काम तडीस नेतो; जबाबदारी म्हणून असो, कर्तव्य म्हणून असो, आपण जी पावलं उचलतो ते व्यवस्थापन असतं. टाईम मॅनेजमेंट, इव्हेन्ट मॅनेजमेंट, कॅश मॅनेजमेंट वगैरे जाडे-जाडे शब्द वापरले म्हणजे काही वेगळं असं नसतं. आपण आपली वैयक्तिक व दैनिक कामं करतो ती पण व्यवस्थापनाचाच भाग असतात; आपल्या अंगवळणी पडलेली असतात म्हणून त्यांचं विशेष असं वाटत नाही.
व्यवस्थापन हे सगळीकडे म्हणजे घरात, ऑफिसात, समारंभात असतंच. घरात आपण किंवा वडीलधारे असतात, ऑफिसात व्यवस्थापक. छोट्याबाबतीत प्रॉब्लेम छोटे, मोठ्याबाबतीत मोठे, एवढाच फरक. व्यवस्थापनाकडे कौशल्य लागतं. हाताखालच्या लोकांचा विश्वास, जवळीक व आदर प्राप्त करणारी व्यक्ती चांगला व्यवस्थापक बनू शकते; ते ‘रिंगमास्टर’ होऊन शक्य नसतं. व्यवस्थापकावर जबाबदार्या असतात, त्याची कर्तव्यं असतात व त्याला अधिकारही असतात. पण ‘सौजन्याची ऐशीतैशी’ करायची नसते. मानाचा व अधिकारांचा विचार मन आणि भान यांची जाणीव बाळगून करायचा असतो; नाहीतर मनही नाही, मानही नाही अशी अवस्था ओढवून घ्यायची पाळी येते!
कुशल व्यवस्थापक तुमच्यातले गुण ओळखतात. तुमचा स्वभाव त्यांच्या स्वभावाशी जुळणारा असेल तर तुम्ही त्यांचे विश्वासू सहकारी बनता. ते शिस्तप्रिय जरूर असतात म्हणून थोडे कडक वाटतात. पण मनाने ‘मृदूनी कुसुमादपि’ असे असतात. आपल्या हाताखाली काम करणार्यांना काम करण्यास प्रवृत्त करणे तेवढेच महत्त्वाचे असते. काहीजण काही कारणांमुळे काम करताना मागे पडतात. सर्वांची आकलनशक्ती काही सारखी नसते. त्यांच्यातील उणिवा समजणं, ओळखणं व त्याना समजावणं असंही करावं लागतं. अशानं बरंच काही साध्य होतं. आपण प्रत्येक बाबतीत नाक खुपसू नये. सर्वच नव्हे तर काही गोष्टीकडे डोळेझाक करायची, काही गोष्टी माफ करायच्या, काही विसरायच्या असतात. ‘नखानं तुटतं त्याला कुर्हाड लावू नये’ असं म्हणतात. कामाच्या ठिकाणी वातावरण प्रसन्न असावं, जे काम करण्याची ऊर्जा पैदा करतं. चांगला व्यवस्थापक बनण्यासाठी पुढील सहा गोष्टींचा अवलंब करावा असं म्हणतात.
१. पाच महत्त्वाचे शब्द ः ‘तुम्ही फार चांगलं काम केलंत’- कोणीही चांगलं काम केलं तर त्याची नेहमी स्तुती करावी.
२. चार महत्त्वाचे शब्द ः ‘तुमचं याविषयी मत काय?’- सर्वच नव्हे पण काही महत्त्वाच्या गोष्टीत सहकार्यांना सल्ला विचारावा. त्यांना फार बरं वाटतं आपलं मत विचारलं म्हणून.
३. तीन महत्त्वाचे शब्द ः ‘एवढं करू शकाल?’- काम सांगताना विनंतीवजा शब्द वापरावेत. आज्ञार्थी नसावेत.
४. दोन महत्त्वाचे शब्द ः ‘आभारी आहे’- केलेल्या कामाचे आभार मानावे.
५. एक महत्त्वाचा शब्द ः ‘आम्ही’- सर्वांचा सहयोग, सहभाग महत्त्वाचा असतो हे जाणावं. त्यामुळे सांघिकवृत्ती वृद्धिंगत होते. केलेल्या कामाचं श्रेय वाटून घ्यावं; त्यातच सगळ्यांचा मान व सन्मान असतो.
६. टाळण्याचा महत्त्वाचा एक शब्द ः ‘मी’- सर्वकाही मी करतो, सर्व गोष्टी माझ्याचमुळे साध्य होतात. असा ‘मी-मी’ हा शब्द कटाक्षानं टाळावा, कारण तो सुरळीत कामासाठी घातक असतो व तो बाकीच्यांच्या मनात द्वंद्व, निरुत्साह निर्माण करतो.
याशिवाय व्यवस्थापकाकडे निर्णयक्षमता हवी, विचारशक्ती हवी, अभ्यास हवा. सर्वांना सामावून घेण्याची हातोटी हवी. प्रसंगाला तोंड द्यायची तयारी व क्षमता हवी. असं असेल तर सहकारी तुमचा आदर करतात, कोणत्याही प्रसंगी तुमच्या साथीला असतात.
लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात असलेली एक गोष्ट आठवते, बहुतेकांच्या माहितीची असेल. एक शेतकरी असतो. तो आपल्या शेतीवाडी, जमीनजुमल्याचे सर्व व्यवहार स्वतःच करत असतो. त्याला तीन मुलगे असतात. शेतकरी म्हातारा होतो व सर्व व्यवहारांची जबाबदारी मुलांकडे सोपवण्याचा विचार त्याच्या मनात येतो. व्यवहार हाताळायला तिघांपैकी योग्य कोण हे ठरवण्यासाठी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवतो. तिघांनाही एकत्र बोलावतो व प्रत्येकाकडे एक-एक आणा देतो. आणा हे पूर्वीचं पैशांचं परिमाण. सोळा आण्यांचा एक रुपया बनत असे. तो शेतकरी मुलांना सांगतो की या एका आण्यातून घरभर पदार्थ घेऊन या. तिघेही बाहेर पडतात, सर्वत्र फिरतात, एका आण्यात काय विकत मिळेल ते पाहण्यासाठी. एका आण्यात कुठचा पदार्थ मिळतो जो घर भरून टाकेल? शक्य नाही! दोन मुलगे हात हलवीत म्हणजे रिक्तहस्ते घरी परततात. तिसरा मुलगा त्याला दिलेल्या त्या एका आण्यातून एक पणती, थोडा कापूस व थोडे तेल आणतो. घरी येऊन कापसाच्या वाती बनवतो, पणतीत तेल घालतो व त्या वाती घालून पणती पेटवतो. त्या पणतीचा प्रकाश घरभर पडतो. हाच तो घरभर पदार्थ! हा तिसरा मुलगा वडिलांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतो व ते निर्णय घेतात की आपल्यामागे हाच मुलगा सर्व व्यवहार चालवण्यास पात्र व योग्य आहे. शेतकर्यानं परीक्षा घ्यायचं ठरवलं हा व्यवस्थापनाचा भाग व तिसर्या मुलानं जे केलं ते पण व्यवस्थापनाचाच भाग!
व्यवस्थापन म्हणजे काय हे शिकण्याची साधी व सोपी आणखी कुठली गोष्ट असेल?