वाहतूक खात्याने व्यवसायासाठी वापर करण्यात येणार्या खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर कारवाईला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ६ चारचाकी आणि १५ दुचाकी मिळून २१ वाहनांचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिली.
राज्यात मोठ्या प्रमाणात व्यवसायासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे. खासगी दुचाकी व चार चाकी वाहने पर्यटकांना बेकायदेशीपणे भाड्डेपट्टीवर दिली जात आहेत. माल वाहतुकीसाठी सुध्दा खासगी वाहनांचा वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक खात्यातर्फे दोन महिन्यांपूर्वी व्यावसायिक कामासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यार्यांवर कारवाईसाठी खास मोहीम हाती घेतली होती. या खास मोहिमेत चार चाकी, दुचाकी मिळून एकूण ६५ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
वाहतूक खात्याच्या संबंधित कार्यालयांनी ताब्यात घेतलेल्या या वाहनाच्या मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावणी घेतली. आत्तापर्यंत सहा चार चाकी आणि १५ दुचाकीचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.