पूर्व लडाखमधील गलवान खोर्यामध्ये चीनच्या कुरापतखोरीचा विरोध करण्यासाठी गेलेल्या आपल्या वीस जवानांना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी शून्याखालील तापमानामध्ये लोखंडी सळ्या आणि दगडांनी ज्या निर्दयपणे मारले, त्या घटनेने संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. गेली अनेक वर्षे चीनकडून भारताच्या पूर्व सीमेवर सातत्याने वाद उकरून काढून कुरापत काढली जाते आहे. कधी देमचोक, कधी दोकलाम, कधी दौलतबेग ओल्डी अशी ठिकाणे वेगळी असतील, परंतु चीनची आक्रमणाची खुमखुमी पुन्हा पुन्हा दिसून आली आहे. या वर्षी तर गेल्या पाच मे पासून लडाख सीमेवर सातत्याने कुरापत काढली जात राहिली आहे. भारतीय हद्दीमध्ये कित्येक किलोमीटर आत घुसखोरी करायची, परतवून लावायला भारतीय जवान आले की त्यांच्याशी तणातणी करायची, हिंसक हाणामारी करायची आणि सरतेशेवटी शांतता बोलणी करायला भाग पाडून मोठे उपकार केल्यागत मागे हटायचे यातून चीन आपली वर्चस्ववादी नीतीच सदान्कदा दाखवत असतो. काहीही करून भारताची पूर्व सीमा अशा रीतीने धगधगत ठेवायची रणनीती चीनने आखलेली दिसते. यावेळी मात्र अमानुषतेच्या सार्या मर्यादा चिनी सैनिकांनी पार केल्या. सीमावाद निवळण्यासाठी लष्करी अधिकार्यांच्या पातळीवरील चर्चा सुरू असताना आणि माघार घेण्याची तयारीही स्वतः दर्शवलेली असताना भारतीय सैनिकांच्या निःशस्त्र पथकावर अशा प्रकारे हिंसक हल्ला चढवून गलवानमध्ये जो रक्ताचा सडा घातला गेला, तो आपण असाच विस्मरणात जाऊ देणार आहोत का?
वुहानपासून ममलापुरमपर्यंत उभय देशांदरम्यान झालेल्या चर्चा आणि वायदे एव्हाना कुठल्या कुठे विरून गेले आहेत. गलवानमधील घुसखोरीने तर ६२ साली त्याच भूमीमध्ये त्याच तंत्राचा अवलंब करून भारताशी चीनने युद्ध पुकारले होते त्याच्या कटु स्मृती आज ताज्या झालेल्या आहेत. चीनची ही सततची दंडेलशाही यावेळीही भारत मुकाट्याने खपवून घेणार का हा आता खरा प्रश्न आहे. भारतासाठी हे लष्करी आव्हानापेक्षाही अधिक राजनैतिक स्वरूपाचे आव्हान आहे. भारत या आगळिकीला कशा प्रकारे खमके प्रत्युत्तर देतो याची आता देशवासीयांना उत्कंठा आणि प्रतीक्षा आहे. पाकिस्तानने पुलवामा घडवले त्यानंतर बालाकोटद्वारे ज्या प्रकारे खणखणीत प्रत्युत्तर मोदी सरकारने दिले होते. आपला देश एकीकडे चीनचीच देण असलेल्या कोरोनाशी झुंजत असल्याने युद्धाला आमंत्रण देण्याच्या स्थितीत नाही. चीनची लष्करी ताकद आपल्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. परंतु म्हणून या आगळिकीला असेच जाऊ देणेही भारताच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. त्यामुळे लष्करी प्रत्युत्तर जरी विचाराधीन नसले तरी कुरापतखोर चीनला खणखणीत राजनैतिक आणि व्यापारी प्रत्युत्तर देणे आपल्या हाती निश्चितच आहे.
चीनचा भारतद्वेष काही कधी लपून राहिलेला नाही. पाकिस्तानला पंखांखाली घेऊन आणि श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या भारताच्या शेजारी राष्ट्रांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी तेथे अब्जावधींची गुंतवणूक करून चीनने भारताला जवळजवळ घेरलेले आहे. नेपाळने नुकताच लिपुलेखचा समावेश आपल्या नकाशात केला, त्याला अप्रत्यक्षपणे चीनचेच पाठबळ आहे. आपल्यामहत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड उपक्रमाद्वारे तर संपूर्ण आशियावर चीन आपला प्रभाव प्रस्थापित करण्यामागे लागलेला आहे. चीनने पूर्व सीमेवरील आपले लष्करी संसाधन बळकट करण्यास सुरूवात केल्याने भारतानेही ईशान्य भारतापासून लडाखपर्यंतच्या आपल्या साडे तीन हजार किलोमीटरच्या पूर्व सीमेवर संसाधनांची जोरदार उभारणी चालवली आहे. सीमावर्ती भागांमध्ये रस्ते बांधले जात आहेत, सेतू उभारले जात आहेत. परिणामी चीन अस्वस्थ आहे. पूर्व सीमेवर आपले कायमस्वरूपी लष्करी तळ उभारण्यामागे लागला आहे. भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून आपले स्थान तो भक्कम करू पाहतो आहे. कोरोनामुळे चिनी अर्थव्यवस्था रसातळाला चालली आहे. चीनची जगभरामध्ये नाचक्की झाली आहे, हॉँगकॉंगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून तेथील जनआंदोलन चिरडून टाकण्याचे प्रयत्न चालवल्याने तेथील मानवाधिकार हननाचा विषय ऐरणीवर आला आहे, अमेरिकेने चीनशी असलेल्या व्यापाराचे नाक दाबून धरले आहे. चिनी जनतेचे लक्ष त्यापासून भारताकडे वळवण्याचा शी जिनपिंग यांचा हा प्रयास दिसतो. या सततच्या कुरापतींना भारताकडून खणखणीत प्रत्युत्तर देण्याची अपेक्षा आज देश करतो आहे. चिनी व्यापाराचे नाक दाबण्याची वेळ आता आलेली आहे. भारतातील अब्जावधी डॉलरांच्या चिनी गुंतवणुकीच्या आशेने राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत अशा आगळिकीकडे कानाडोळा करणे आता या देशाच्या जनतेला मान्य नाही. पक्षपातळीवर चिनी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन जनतेला करण्यापेक्षा सरकारच्या पातळीवर चीनची कोंडी करण्यासाठी काय करता येईल याचा विचार सरकारने केला पाहिजे. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे पंतप्रधान काल म्हणाले ते प्रत्यक्षात उतरेल असा विश्वास भारतीय जनतेला आहे. चीनने सीमेवर आपल्या जवानांचे लाल रक्त सांडायचे आणि आपण मात्र चिनी कंपन्यांसाठी लाल पायघड्या अंथरायच्या हे आता चालणार नाही. येऊ घातलेल्या चिनी कंपनी हुवाईच्या फाईव्ह जीपेक्षा आमच्यासाठी आमच्या जवानांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. चीनच्या ठोशाला मोदी सरकार कसा ठोसा लगावते हे देशाला पाहायचे आहे!