व्यक्ती तितक्या…

0
388
  •  दत्ताराम प्रभू-साळगावकर

असल्या लोकांच्या काही गोष्टी ऐकून घ्यायच्या असतात, काही ऐकून सोडून द्यायच्या असतात, काही हसण्यावारी न्यायच्या असतात. चांगल्या व आपल्या मनाला पटणार्‍या मात्र जरूर स्वीकारायच्या असतात.

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी एक म्हण आहे. प्रकृती म्हणजे माझ्या मते ढोबळमानाने प्रवृत्ती, स्वभाव, तर्‍हा. प्रत्येकाच्या ‘अंतरीच्या नाना कळा’; वेगवेगळ्या, विचित्र! हुशार, अतिहुशार, बोलघेवडे, बंडलबाज; कुणाचे व किती किती गुण वर्णावे? प्रकृतींची मोजदाद करण्यासाठी ठरावीक संख्या नाही, परिमाण नाही… त्या असतात असंख्य. कोणाच्याही प्रवृत्तीविषयी, स्वभावाविषयी प्रथमदर्शनीच मत बनवू नये किंवा अंदाज बांधू नये. कारण, असले अंदाज हवामान खाते किंवा वेधशाळेच्या अंदाजाप्रमाणे हमखास चुकीचे ठरतात! असल्या लोकांच्या काही गोष्टी ऐकून घ्यायच्या असतात, काही ऐकून सोडून द्यायच्या असतात, काही हसण्यावारी न्यायच्या असतात. चांगल्या व आपल्या मनाला पटणार्‍या मात्र जरूर स्वीकारायच्या असतात. अनुभव येतात ते असे…
सकाळची आन्हिकं झाली की वर्तमानपत्र आणायचा माझा ठरलेला व दैनंदिन कार्यक्रम. रोज सकाळी दरवाजात पेपर टाकणारा अजून आमच्या वाड्यावर पोचलेला नव्हता, त्यामुळे ते काम मलाच करावे लागे. पेपरस्टॉल एक किंवा सव्वा किलोमीटर दूर, म्हणजे काही जास्त नाही, जवळच. सकाळच्या चहाबरोबर पेपर हातात धरायची बरीच जुनी सवय; पारंपरिक म्हणतात तशी. चहा पिता पिता पेपर वाचण्यात एक ‘किक’ असते; बातम्यांना चव असावी तशी. सकाळी पेपर ताजातवाना असतो, काही वेळानंतर शिळा बनतो व ‘शिळा’ बनून पडतो!

पेपर आणायला मी माझ्या स्कूटरवरून जायचो. एक दिवस पेपरस्टॉलजवळ स्कूटर पार्क करत असताना माझा एक पूर्वीचा सिनियर सहकारी भेटला, जुना मित्रच म्हणा ना, तसा.
‘‘सकाळी सकाळी कुठे?’’
‘पेपर न्यायला’ मी स्टॉलकडे अंगुलीनिर्देश केला.
‘‘पेपर न्यायला स्कूटरवरून?’’
‘‘म्हणजे?’’ विनाकारण कसले तरी प्रश्‍न विचारलेले कोणाला आवडत नाहीत, माझंही तसंच झालं म्हणून मी विचारलं.
‘‘अरे, तू इथून जेमतेम एक कि.मी.वर राहतोस आणि पेपर न्यायला स्कूटरवरून येतोस? पेपरची किंमत किती आणि येऊन जायला पेट्रोल किती पैशांचं जाळतोस? मी बघ, तुझ्यापेक्षा दूर राहतो पण चालत येतो आणि चालत जातो. तुला नाही जमत?’’
आता मला त्याच्या प्रश्‍नाचा रोख कळला. पण एवढ्यावरच संपलं नाही, पुढे आणखी लेक्चर…
‘‘तू पेट्रोल जाळतोस, पैसे मोडतोस, पर्यावरणाला हानी पोचवतोस. यापेक्षा चालत येऊन पेपर घेऊन गेलास तर किती फायदा! पैसे वाचतील, पर्यावरणाला हानी कमी आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे तुझ्या शरीराला उत्तम व्यायाम. प्रश्‍न फक्त अर्धा तास वेळ काढायचा. तेवढा वेळ तू काढू शकतोस अगदी सहज. माझं ऐक, उद्यापासून स्कूटर बंद!’’

मी हसून मान हलवली. पैशांपेक्षा, फायद्यापेक्षा त्याच्या सल्ल्याचं महत्त्व मला कळलं, पटलं, रूचलं! मी त्याला तसं सांगितलंही. त्या सकाळी स्कूटर स्टार्ट मारून बाहेर पडताना एक काळं मांजर आडवं गेलं होतं. आज काहीतरी घडणार अशी पाल माझ्या मनात चुकचुकली. ते काहीसं खरं झालं. दुसर्‍या दिवसापासून मी निश्‍चय केला की मित्राचा सल्ला मानायचा व चालत जाऊन पेपर आणायचा. मला फायदा, पर्यावरणाला हानी नाही. घड्याळाची वेळ लावून निघालो. जाऊन यायला पंचवीस मिनिटे लागली. फायद्या-तोट्याची गोष्टच वेगळी. काळं मांजर आडवं गेलं म्हणून अशुभ घडतंच असं नाही व मनात पाल चुकचुकली म्हणूनही नाही. असली ही मांजरं, पाली भीती, संशय व अंधविश्‍वासाला बळ देतात, आपण त्यांना बळी पडू नये!

पर्यावरण, पर्यावरण, हरितवायू म्हणून चारी बाजूनी, चारी दिशांनी ढोल बडविले जातात, पण किती लोक लक्षात घेतात? फक्त थोडेच! मला माझा एक नातेवाईक भेटला, गावात राहणारा सुशिक्षित. गावात अजून टेलिफोन आला नव्हता, पण थोड्याच दिवसांत येणार होता. याने पण कनेक्शनसाठी अर्ज करून आवश्यक बाबी पूर्ण केल्या होत्या. त्याचं घर रस्त्यापासून पन्नासएक मीटर आत होतं. रस्त्यावर खांब उभारण्याचा आराखडा तयार झाला व काम पण सुरू झालं. कनेक्शन देणार्‍याकडे याने चौकशी केली असता त्याला कळलं की त्याच्या घरानजीक जो खांब उभारण्यात येणार होता व त्या खांबावरून त्याला कनेक्शन मिळणार होतं त्यासाठी त्याच्या परसातल्या दोन-तीन आंब्याच्या कलमांच्या फांद्या आड येत होत्या व त्या कापाव्या लागणार होत्या. इसम मोठा पर्यावरणवादी. त्यानं स्पष्ट बजावलं की दुसरी काही व्यवस्था करा, वाटल्यास खांबाची जागा बदला. पण आपल्या घरात कनेक्शन देण्यासाठी आंब्याच्या कलमांच्या फांद्या कापाव्या लागणार असतील तर टेलिफोनच नको! टेलिफोनपेक्षा झाडांची पर्यावरणीय किंमत जास्त, पर्यावरणमूल्य जास्त. टेलिफोन नसला तरी चालेल. इतकी वर्षं काही अडलं नाही. झाडांची कत्तल करून टेलिफोन नकोच!

ही गोष्ट त्यानं मला सांगितली. यात पर्यावरण रक्षणाचा अतिरेक मला बिल्कुल आढळला किंवा जाणवला नाही. जे राखायचं ते राखायला हवंच. वाडवडिलांनी, पूर्वजांनी दिलेला तो वारसा आहे. पुढील पिढ्यांना आपण काही देणं लागतो; आपल्या सुखासाठी व सोईसाठी; त्यात तडजोड नको. पर्यावरणाचं रक्षण कदाचित होत नसेल, पण त्याचं भक्षण तरी निश्‍चितच नको!
गोष्ट सरळ व साधी. विचार करण्यासारखी, लक्षात घेण्यासारखी, पर्यावरणाचा संदेश देणारी! कारण-
पर्यावरण सलामत तो जान सलामत.
पगडी पचास की नाहीत ते येणारा काळ सांगेल!!