व्यक्तिगत सूड?

0
28

विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यामागे नगरनियोजनमंत्री वि श्वजित राणे हात सध्या धुवून लागलेले दिसतात. अर्थात, त्यामागे मंत्री म्हणून आपली कार्यक्षमता दाखवण्याचा सोस आहे, मायकलवर सूड उगवून पक्षश्रेष्ठींना प्रभावित करण्याचा ध्यास आहे की मुख्यमंत्र्यांवरही वरचढ ठरण्याचा प्रयास आहे असा प्रश्न पडावा अशा प्रकारचे त्यांचे हे वागणे आहे. मंत्रिपदी आल्यापासून राणे यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले होते. आपल्या खात्यातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी हेल्पलाईनची त्यांनी केलेली घोषणा, पाचशे चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांना अभियंते वा वास्तुरचनाकारांद्वारे प्रमाणित करण्याचा व दोन हजार चौरस मीटरच्या बांधकामांवर एकवीस दिवसांत निर्णय न झाल्यास मंजुरी गृहित धरण्याचा निर्णय, फायलींचे ऑनलाइन ट्रॅकिंग उपलब्ध करण्याचे उचललेले पाऊल, असा त्यांनी निर्णयांचा धडाका लावलेला होता. त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुकही केले होते. मात्र, आता त्यांच्या रडारवर विरोधी पक्षनेते मायकल लोबो आलेले दिसतात आणि या कारवाईला सरळसरळ व्यक्तिगत सूडाची दुर्गंधी येते आहे. गोव्याला वाचवण्यासाठी जर ही कारवाई असेल तर मग ताळगावात आजही भर शेतामध्ये बांधकामे उभी राहात आहेत, त्यावर कारवाई का होत नाही?
काही दिवसांपूर्वी मायकल लोबोंवर दाखल झालेला डोंगरकापणीचा गुन्हा, लोबोंच्या कार्यक्षेत्रातील पर्रा, हडफडे, नागवे, कळंगुट, कांदोळी आदी गावांचे ओडीपी स्थगित करण्याचा निर्णय, पर्रातील त्यांच्या जमिनीसंदर्भात झालेली कारवाई, आणि आता त्यांच्या दोन रिसॉर्टवर उगारलेला बडगा या सार्‍यातून विश्वजित राणे मायकल लोबोंना जन्माचा धडा शिकवण्यास उतावीळ झालेले दिसत आहेत. गेल्या निवडणुकीआधी मायकल लोबोंनी भाजपला रामराम ठोकला आणि विरोधी पक्षात जाऊन कॉंग्रेसचे सरकार आणण्यासाठी धडपड केली. त्याचीच ही शिक्षा त्यांना दिली जात असावी असा संशय घेण्यास जागा आहे, कारण हे जे काही बेकायदा बांधकामाचे आरोप लोबो यांच्यावर केले जात आहेत, ती आज एकाएकी उभी राहिलेली नाहीत. आजवर जेव्हा मायकल भाजपा सरकारचे किंगमेकर बनून सत्ताधार्‍यांसोबत वावरत होते, त्यांच्या गळ्यातला ताईत बनले होते, तेव्हा या बेकायदा गोष्टींवर सरकारने झापडे का ओढली होती? विरोधकांवर व्यक्तिगत सूड उगविण्याची जी परंपरा गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये निर्माण झालेली दिसते, त्याच वाटेने जाणारे विश्वजित यांचे हे वागणे आहे असे त्यामुळेच म्हणावे लागते. मुख्यमंत्र्यांनाही विश्वासात न घेता वा न जुमानता विश्वजित सध्या सुसाट सुटलेले दिसतात, परंतु हे त्यांच्या प्रतिमेला तारक ठरण्याऐवजी मारकच ठरेल याची जाणीव ठेवणे त्यांच्याच हिताचे ठरेल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आजवरचे राजकारण हे बेरजेचे राजकारण राहिलेले आहे. विश्वजित यांच्या सध्याच्या आक्रस्ताळेपणाला मुख्यमंत्र्यांचे समर्थन आहे काय? आपल्या असल्या आक्रस्ताळ्या वागण्यामुळे भाजपाच्या दिल्लीस्थित श्रेष्ठींचे डोळे दिपतील असा जर विश्वजित यांचा समज असेल तर त्यांना अद्याप भाजपा पुरता उमगलेला नाही असेच म्हणायला हवे. विश्वजित यांच्यावर अजूनही पक्षाचा भरवसा नाही आणि मुख्यमंत्र्यांचा तर नाहीच नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरले असता त्यांना ज्या प्रकारे खड्यासारखे बाजूला काढण्यात आले, त्यावरूनच त्यांना त्यांच्या मर्यादांची जाणीव व्हायला हवी होती, परंतु आपल्या धडाकेबाज कारवाईतून आपण राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेऊन प्रतिपर्रीकर बनू असे जर त्यांना वाटत असेल तर तो निव्वळ भ्रम आहे. राजकारण ही विचारांची लढाई असायला हवी. त्याला व्यक्तिगत मारामारीचे स्वरूप येता कामा नये. पूर्वी राजकारणाला अशी सुसंस्कृतपणाची सुबक किनार होती. आजच्या काळात राजकीय शत्रू म्हणजे व्यक्तिगत शत्रू अशा तर्‍हेने त्यांना वागवले जाताना दिसत आहे आणि हे चित्र नेत्रसुखद निश्‍चित नाही. मायकल लोबो हेही काही संतमहंत नव्हेत. ज्या प्रकारे कळंगुट व आसपासच्या किनारपट्टीच्या गावांमध्ये त्यांनी प्रचंड साम्राज्य उभे केलेले आहे, त्याचा पायाच मुळात भुसभुशीतच आहे. त्यामुळे जोवर सत्तेत होते, तोवर सगळे सुखाने चालले, पण विरोधकांत सामील होऊनही जेव्हा सरकार बनवता आले नाही, तेव्हा आता घडे भरत चालले आहेत. लोबोंविरुद्ध हे जे कारवाईचे पाश आवळले जात आहेत, त्यामागे केवळ विश्वजित यांचे व्यक्तिगत सूडाचे राजकारण आहे की हा त्यांना घाबरवण्याचा वा सत्ताधारी पक्षात सामील व्हायला भाग पाडण्याचा प्रयत्न आहे हेही पाहावे लागेल. आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी लोबोंनी उद्या भाजपात घरवापसी केली, तर त्यानंतर विश्वजित यांची काय भूमिका असेल??