काही इस्पितळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या हतबलपणाचा, भावनांचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडत आहेत असे अनेकदा दिसून येते. या दुःस्थितीवर अनेक सत्शील, प्रामाणिक, वैद्यकक्षेत्रातील निष्ठावंत डॉक्टरांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे अनेक गुपित कारस्थाने जगासमोर उघड झाली आहेत.
संस्कृतमध्ये वैद्याला ‘यमराज सहोदर’ असे सुभाषितकारांनी म्हटले आहे. त्याचा अर्थ-वैद्य हा यमाचा मोठा भाऊ आहे. यम केवळ प्राण हरण करतो, मात्र वैद्य प्राण घेऊन धनही लुटतो. यातील विनोदाचा भाग वगळला तर अशी प्रवृत्ती वाढताना दिसते आहे. एकेकाळची फॅमिली-डॉक्टर ही संकल्पना नष्ट होऊन त्यातील हसते खेळते कौटुंबिक वातावरण कमी होत चालले आहे. वैद्यक व्यवसायात पूर्वी काही अपप्रवृत्ती नव्हत्या असे नाही. त्याचे प्रमाण खूप कमी होते आणि असले तरी ते किरकोळ स्वरुपाचे असल्यामुळे त्यात गुन्हेगारी प्रवृत्तीने जोर धरला नव्हता. मात्र आता पवित्र गणल्या जाणार्या या क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून गेला असून सेवाप्रवृत्तीपेक्षा त्याचे व्यापारीकरण झाले आहे. वैद्यकीय पेशा हा आता अमाप पैसा कमावण्याचा मार्ग बनला आहे.
जर भारत महासत्ता बनणार असेल तर देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, सामाजिक समता, स्वातंत्र्यता, बंधुता या सगळ्या गोष्टी समप्रमाणात मिळायला हव्यात. मात्र तसे होताना दिसत नाही. अनेक आरोग्य समस्यांवर भरमसाट पैसा खर्च करावा लागत असल्यामुळे सामान्यांच्या तो आवाक्याबाहेर गेला आहे. सरकारने कितीही मुक्त आरोग्यसुविधा पुरवण्याचा डांगोरा पिटला तरी आज खाजगी इस्पितळांचेच वैद्यकीय क्षेत्रावर वर्चस्व आहे. ‘‘ना मामू से नकटा मामू अच्छा’’ या म्हणीप्रमाणे ज्या गरीबाला काहीच मिळत नाही, तो या सरकारी आरोग्यसुविधांवर खूष असतो.
खिशात पैसा असेल तर जगायचे, नाहीतर सरळ सरणावरची वाट धरायची अशी बिकट आणि हतबल परिस्थिती आज सामान्य नागरिकांची आहे. सरकारी इस्पितळांत सरकार योग्य त्या सुविधा पुरवत नाही. मग नाईलाजाने खाजगी इस्पितळाकडे वळतो आणि तेथूनच त्याची आणि त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक संकटांची मालिका सुरू होते आणि त्या मालिकेचा शेवट एकेकदा शोचनीय मृत्यूतच होतो. खाजगी इस्पितळाचे बिलाचे पैसे फेडण्यासाठी एका महिलेवर आपले शील विकण्याची पाळी आली होती. माणसाचा जीव अनमोल आहे. त्याची किंमत लावता येत नाही. आमच्या कोकणीत एक म्हण आहे, ‘जीव आसा जाल्यार भीक मागून खायन.’ जीव वाचविण्यासाठी माणूस आपल्या आयुष्यभराची कमाई घालवून कंगाल होण्यासही तयार असतो. प्रत्येक गरीब भारतीयासाठी आधुनिक शापरुपी आघात म्हणजे असाध्य रोगाने आजारी पडणे.
ज्या पेशाचे ध्येय मानवी जीवन निरोगी बनवणे, चिकित्सा पद्धतीसाठी अत्याधुनिक यंत्रणेचा प्रामाणिकपणे उपयोग करणे असा आहे, ते आज रुग्णांच्या नातेवाईकांच्या हतबलपणाचा, भावनांचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडत आहेत असे अनेकदा दिसून येते. या दुःस्थितीवर अनेक सत्शील, प्रामाणिक, वैद्यकक्षेत्रातील निष्ठावंत डॉक्टरांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे अनेक गुपित कारस्थाने जगासमोर उघड झाली आहेत. अनेक न पटणार्या, वैद्यक कायद्याने सिद्ध होऊ न शकणार्या अपप्रवृत्तीने उच्छाद मांडला आहे असे त्यावरून दिसते.
उंच टोलेजंग आलीशान इस्पितळे शहरात वाढत असतात. त्यात अनेकांचा पैसा गुंतलेला असतो. तो वसुल करण्यासाठी रुग्णांकडून अनावश्यक तपासण्या करून त्यांच्या खिशाला कात्री लावली जाते. मोठमोठ्या वैद्यकीय महाविद्यालयात २०-३० लाख देणग्या देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. नंतर ती रक्कम वसूल करण्यासाठी हे डॉक्टर अनेक अघोरी मार्ग पत्करतात. एक डॉक्टर दुसर्या डॉक्टरकडे (विशेषज्ञ) पाठवतो. कधी कधी हा सल्ला अनावश्यक असतो. यात मधल्यामध्ये दलालीचा मामला असतो. जर एखादा विशेषज्ञ डॉक्टर रुग्णांकडून १००० (एक हजार रुपये) शुल्क घेत असेल तर मूळ डॉक्टरला चारशे ते पाचशे पर्यंत दलाली ठरलेली असते असेही उदाहरण आहे.जवळजवळ ३०-४० रुग्णांना अनावश्यक तपासणीसाठी पाठविले जाते. हा ‘कट प्रॅक्टीस’चा मार्ग पत्करूनच अनेक विशेषज्ञ डॉक्टर या क्षेत्रात आपले बस्तान बसवतात. अनेक राजकीय नेते, माफियांना ज्याप्रकारे हप्ते दिले जातात, त्यातलाच हाही प्रकार असल्याचे अनेकांचे मत आहे.
अनेक डॉक्टर सुरुवातीला कट प्रॅक्टीस न करण्यावर ठाम असतात, परंतु त्यांना अशा तर्हेने रुग्ण मिळत नसल्याळे पुढे नाईलाजाने हा मार्ग पत्करावा लागतो. ही बाब केवळ डॉक्टरांपुरतीच मर्यादित नसून व्यायामतज्ज्ञ, योगशिक्षक हेसुद्धा डॉक्टरांकडे रुग्णाची शिफारस करण्यासाठी दलाली घेतात. अनेक डॉक्टर दुसर्या डॉक्टरांच्या संपर्कात येण्यासाठी भाड्याने दलाल बाळगतात असेही कधी कधी आढळते, जे इतर डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचे नेटवर्क तयार करतात. अगदी रुग्णवाहिका चालकांनाही यात सहभागी केले जाते, त्यामुळे अनेक रुग्ण चुकीच्या इस्पितळात पोचवले जातात आणि योग्य उपचाराअभावी आपला प्राण गमावतात.
इस्पितळात उभारलेल्या कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्रीचे पैसे वसुल करण्यासाठी हा एक सुलभ मार्ग उपलब्ध आहे. स्वतंत्र प्रॅक्टीस करणारे डॉक्टर हे छोटे मासे असून ती फक्त प्यादी आहेत. सर्वात मोठी चॅरिटेबल इस्पितळे हा असला संघटित स्वरुपाचा भ्रष्टाचार करीत असतात. काही कॉर्पोरेट इस्पितळांत डॉक्टरांना एका महिन्यात ठराविक शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले जाते. ते पूर्ण झाले नाही तर त्यांच्या हातात नारळ दिला जातो.
गरिबांना पैशांचे आमिष दाखवून किडणी विकत घेणे किंवा एखाद्याची शस्त्रक्रियेच्या आडून त्याला फसवून त्याची किडणी चोरणे, गर्भनिदान करून कन्याभ्रूणहत्या करणे असे प्रकार कडक कायदे असूनही सर्रास केले जातात. ‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ असा प्रकार चालला आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मुक्त उपचारासाठी महाराष्ट्रातील देवगडपासून ते कर्नाटकातील कारवारपर्यंतचे रुग्ण येतात. हे महाविद्यालय गरीब लोकांसाठी एक आधारस्तंभ आहे. गोवा सरकार हा खर्च आता पेलू शकणार नाही हे सत्य आपण समजून घेतले पाहिजे. निदान महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने त्यांच्यासाठी अनुदान द्यावे. देश म्हणजे एक कुटुंब आहे. मग आपण राज्याच्या सीमा लावून त्यांना उपचार नाकारणार आहोत का? आपल्या देशातील मोठमोठे नेते – मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, स्वतः वैद्यकीय उपचारासाठी विदेशात जातात आणि सामान्य गरीबांना उपचारासाठी हतबल होऊन मृत्यूला कवटळावे लागते, हे आपल्या देशाला लज्जास्पद आणि दुर्दैवी वास्तव आहे. आज मंदिरांवर अमाप पैसा उधळणारे अनेक धनदांडगे महाभाग आहेत. परंतु वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इस्पितळ उभारण्यात टाटासारखे एखादेच उद्योगपती पुढाकार घेतात. हे चित्र कधी बरे बदलेल?