>> मडगावात दोन प्रकल्पांचे उद्घाटन
गोव्यात कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय प्राणवायूसाठी दुसर्या राज्यांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे हा प्राणवायूचा पुरवठा कधी होईल याची वाट पाहावी लागत होती. आता ‘पीएम केअर’तर्फे गोव्यात ६ प्राणवायू प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यातील एक या इएसआय इस्पितळात सुरू झाला आहे. त्यामुळे आता गोवा प्राणवायूबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. जादा तयार होणार्या प्राणवायूचा साठा करण्याचीसुद्धा तयारी आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मडगाव येथील ईएसआय इस्पितळात प्राणवायू प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, मजूर खात्याचे श्री. गावस, श्री. गुप्ता, डॉ. विश्वजित फळदेसाई उपस्थित होते.
आजच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देशातील सर्व राज्यांत एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्यात गोव्यातील सहा प्रकल्प आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
१९ मार्च २०१९ मध्ये गोव्यात कोविडबाधित रुग्ण सापडले तेव्हा त्यांच्यावर उपचार कोठे करावा यावर विचार चालू असता सर्व प्रथम ईएसआय इस्पितळाची निवड करून येथे उपचार सुरू केले. त्या काळात येथील डॉक्टर, परिचारिका, कर्मचार्यांनी अतोनात परिश्रम घेऊन एकजुटीने काम केले. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९८ टक्के होती. त्यात वैद्यकीय इस्पितळ, आरोग्य खाते, आरोग्यमंत्री व डॉक्टरांनी एकजुटीने घेतलेले परिश्रम होते म्हणून हे शक्य झाले. ज्यावेळी प्राणवायूची गरज होती तेव्हा महाराष्ट्र, कर्नाटकचे जिल्हाधिकारी, केंद्रीय मंत्र्याकडे आपण स्वतः संपर्क साधत होतो. प्रशासन व लोक यांच्या सहकार्याने या कोरोना संकटावर मात केली असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
गोव्यावर आलेल्या कोणत्याही नैसर्गिक संकटाच्या वेळी प्रशासनाला लोकांनी सहकार्य केले. यापुढेही गोव्यावर संकटे येण्याची शक्यता आहे. ती नैसर्गिक नसून गोव्याबाहेरून येणारी मानवी संकटे आहेत. ती मानवनिर्मित आपत्कालीन संकटे असतील. त्यांचा मुकाबला गोव्यातील जनतेने एकजुटीने करावा असेही आवाहन डॉ. सावंत यांनी केले. मंत्री जेनिफर मोसेंरात यांनी आभार मानले.
डॉ. सावंत यांनी मोदी यांचे आभार मानून कोविड काळात प्रशासनाला जनतेने सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आरोग्यमंत्री राणे यांनी, मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात इस्पितळात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील
प्रकल्पाचे पंतप्रधानांकडून उद्घाटन
भारतात कोरोनाचे महाभयंकर संकट आल्यानंतर प्राणवायू पुरवठा करण्याचे मोठे आव्हान होते. पण सरकारने डॉक्टर, वैज्ञानिक यांनी ऑक्सिजन उत्पादन करण्यासाठी मदत केली व आज भारत ऑक्सिजनचे उत्पादन करणारा प्रमुख देश बनला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
कोरोना संकटाच्या काळात संकटाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले व दुसर्या बाजूने प्राणवायू उत्पादन करण्यासाठी पावले उचलली. आता देशात एक लाखांहून अधिक प्राणवायू प्रकल्प तयार झाले आहेत. भविष्यात प्राणवायूबाबत भारत स्वयंपूर्ण बनेल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
व्हिडिओ कॉन्स्फरंसद्वारे या प्राणवायू प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपस्थित होते.