वैद्यकीय पर्यटनात भारत अव्वल

0
6

>> श्रीपाद नाईक; जी-20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात

जी-20 आरोग्य कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीला कालपासून राज्यात सुरुवात झाली. ही बैठक बुधवारपर्यंत चालणार आहे. बांबोळी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काल झालेल्या बैठकीत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, गेल्या एका वर्षात 1.4 दशलक्षहून अधिक पर्यटकांनी वैद्यकीय पर्यटनासाठी भारताला भेट दिली. त्यामुळे भारत वैद्यकीय पर्यटनासाठीचा एक अव्वल देश बनला असल्याचे सिद्ध झाले आहे. भारताच्या वैद्यकीय व निरामय क्षेत्राशी निगडित पर्यटनाचे हे यश आहे. जागतिक आरोग्य व्यवस्थेच्या विविध पैलूंवर अर्थपूर्ण चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी जी-20 प्रतिनिधींना केले.

या बैठकीत आपल्या बीजभाषणातून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारताचे जी-20 प्राधान्यक्रम हे सर्वसमावेशक, समानताकारक आणि प्रतिनिधीत्व देणाऱ्या मंचाची निर्मिती करणाऱ्या सुधारित बहुपक्षवादावर भर देणारे असून, ते 21व्या शतकातील अनेक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी योग्य असल्याचे स्पष्ट केले. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही भारताच्या जी-20 अध्यक्षतेची संकल्पना असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आरोग्य सेवेपासून कोणीही वंचित राहणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी प्रतिरोधक आरोग्य सेवा प्रणालीची उभारणी, सर्वांना समानतेने होणाऱ्या लसींच्या उपलब्धतेचे, निदानाचे आणि उपचारांचे पाठबळ यासाठी सध्या सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे एकीकरण करण्यासाठी देश झटत असल्याचे त्या म्हणाल्या.

महामारीचा धोका कमी करण्यासाठी ‘एक आरोग्य’ दृष्टिकोनातून आरोग्य व्यवस्थेमध्ये भूतकाळापेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची गरज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली. या बैठकीला आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल, आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अगरवाल, केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि जी-20 सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.