- प्रदीप गोविंद मसुरकर
(मुख्याध्यापक)
प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता आणि आवडीनिवडी असतात. त्याप्रमाणे आम्ही डोळसपणे वातावरणनिर्मिती केल्यास ते चांगले वक्ते, डॉक्टर, इंजिनिअर, क्रीडापटू, शिक्षक, वैज्ञानिक होऊ शकतात व आत्मनिर्भरतेचे बीज मुलांच्या क्षमतेत असते.
……………………………………
अगदी स्वयंपाकघरापासून ते आम्ही वावरतो, काम करतो तेथे शिस्तबद्ध पद्धतीने नीट समजून घेऊन कोणतेही कार्य केल्यास तेथेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर केला असे होईल व हेच खरे विज्ञान आहे.
आपले मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाच्या सर्व जनतेस ‘आत्मनिर्भर’ होण्याचा संदेश दिला आहे. ‘आत्मनिर्भर’- स्वतःच्या क्षमता विकसीत करून आपल्या पायावर उभे राहण्यास शिका.
‘आत्मनिर्भर व्हा’ हे वाक्य आता देशातील प्रत्येक व्यक्तीस आत्मचिंतन करण्यास प्रेरित करीत आहे. आजही आम्ही काही बाबतीत इतर देशांवर अवलंबून आहोत ते न राहता आपल्या स्व-क्षमतेवर नवनिर्मिती (इन्नोव्हेशन) करण्यास प्रवृत्त करीत आहे. यासाठी नावीन्यपूर्ण विचार व दृष्टिकोनाची गरज आहे.
या आजच्या जीवनशैलीत आम्ही स्वतःबद्दल व स्वतःमधील असलेल्या क्षमतेबद्दल कितपत विचार करतो?
सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने गतीविषयक तीन नियम जगाला दिले. त्यातील सर्वांत पहिला नियम फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे –
‘‘एखादी वस्तू स्थिर असेल किंवा एकसमान गतिमान असेल तर ती त्याच अवस्थेत राहील जोवर त्यावर कोणत्याही बाह्य बळाची क्रिया होत नाही’’.
- याचाच अर्थ आपल्या कृतींना, क्षमतेला किंवा विचारांत बदल हवा असल्यास त्याला तितक्याच शक्तिशाली बाह्यबलाची गरज असते आणि ते बाह्यबलाचे प्रेरणेचे कार्य पंतप्रधान मोदीजींनी आम्हाला दिलेले आहे ‘आत्मनिर्भर व्हा’. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हवा. ही त्यांच्याकडून आम्हाला मिळालेली एक उत्कृष्ट प्रेरणा आहे.
दृष्टिकोन – सकारात्मक (पॉझिटिव्ह)
– नकारात्मक (निगेटिव्ह)
– शून्य (स्थिर) न्युट्रल
प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा भिन्न आहे. युनिक आहे. वैयक्तिक मतभेद आढळतात व तो भिन्नपणा आनुवंशिकता आणि वातावरणामुळे येत असतो. अगदी जुळी मुले दिसावयास सारखी असली तरी ती विचाराने, कौशल्याने, बुद्धिमत्तेने वेगळी दिसून येतात. त्यांच्यामधील आवडीनिवडी वेगळ्या असतात. काहींमधील क्षमतेची चमक लहान वयातच दिसून येते.
- दीड वर्षाचे मूल खेळताना मी निरीक्षण केले – त्या मुलाला आम्ही सांगितलेल्या सूचना चांगल्या कळतात, हे दिसून आले. त्याला पूर्णपणे बोलता येत नाही. अजूनही भाषेचा विकास व्हायचा आहे. तरीपण काही वैशिष्ट्यपूर्ण कृती मी त्या मुलामध्ये पाहिली. मी सहज त्या मुलाला सांगितले, ‘‘बाबू, तुझी गाडी दुरुस्त करू या. तुझ्या गाडीची चाकं सारखी आहेत का ते पाहू या. तर त्या छोट्याशा मुलाने मला आपली खेळण्यातली गाडी आडवी करून, चारही चाके फिरवून बघितली. आतून हात घालून हँडलकडे त्याने काहीतरी केले व समोरचा हॉर्न वाजवून बघितला व त्याची ती बसायची गाडी सरळ करून त्याने तिचा हॉर्न वाजवला व नकळत मला त्याने सुचवले- आपली गाडी दुरुस्त झाली व आनंदाने हसू लागला. अशी ही क्षमता लहान असतानाच त्यांच्यामध्ये दिसून येते. हळूहळू विकसित होते व त्याप्रमाणे पोषक वातावरण दिल्यास तो चांगला ऑटोमोबाइल इंजिनिअर किंवा मेकॅनिकल इंजिनिअरसुद्धा बनू शकेल. अशा मुलांना तांत्रिक शिक्षण आवडते.
- माझ्या शेजारी राहणारा लहान ३ वर्षांचा मुलगा, तो बॅट व बॉल घेऊन खेळत होता. दुसरा त्याच्यापेक्षा वयाने मोठा… तो चेंडू त्याच्यासमोर टाकत होता. मी थोडावेळ निरीक्षण केले. तो लहान मुलगा ३ वर्षांचा पण इतक्या चांगल्या प्रकारे छोटी बॅट फिरवत होता की मला त्याच्यात एका बॅट्समनला लागणार्या कौशल्याची चुणूक दिसली. यात चांगली गती दिल्यास तो उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होऊ शकेल.
प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता आणि आवडीनिवडी असतात. त्याप्रमाणे आम्ही डोळसपणे वातावरणनिर्मिती केल्यास ते चांगले वक्ते, डॉक्टर, इंजिनिअर, क्रीडापटू, शिक्षक, वैज्ञानिक होऊ शकतात व आत्मनिर्भरतेचे बीज मुलांच्या क्षमतेत असते.
शाळेतील प्रगतिपुस्तकात जे गुण (मार्क्स) दिसतात त्यावरून पूर्णपणे मुलांचे व्यक्तिमत्त्व, क्षमता, आवड, कौशल्ये यांचे मूल्यमापन होत नाही. त्यासाठी आता नवीन शैक्षणिक धोरणात परफॉर्मन्स- कृतीवर – प्रायोगिक कौशल्यावर (स्किल्स)वर भर देण्यात आला आहे जेणेकरून मुलांच्या क्षमतेनुसार, आवडीनुसार शिक्षण घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल व ती आपल्या उपजत क्षमतेत काहीतरी नावीन्य दाखवण्यात यशस्वी होतील.
मा. पंतप्रधान श्री. मोदीजींनी देशातील युवा पिढीलाच आत्मनिरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. त्यांनी – ‘‘स्किलिंग म्हणजे कौशल्ये; रीस्किलिंग म्हणजे कौशल्यांची पुनरावृत्ती व अपस्किलिंग म्हणजे त्यात नावीन्याची भर टाकून नवीन कौशल्य निर्मिती’’- ही सध्या काळाची गरज आहे हे पुन्हा पुन्हा जनतेच्या निदर्शनास आणून देत आहेत, जेणेकरून आपले युवक आपली क्षमता जाणून प्रशिक्षण घेऊन, ते स्वतःचा उद्योग करू शकतात. - आत्मनिर्भर होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हवा –
‘विज्ञान’ या शब्दाचा अर्थ नीट समजून घेतल्यास नावीन्यात नक्कीच भर पडेल. विज्ञान याचा अर्थ फक्त विज्ञान विषय असा न घेता, आपण जी कृती करतो ती शिस्तबद्ध व योग्य नियमांचे पालन करून केल्यास पावलो-पावली आपल्याला विज्ञान दिसेल.
अगदी स्वयंपाकघरापासून ते आम्ही वावरतो, काम करतो तेथे शिस्तबद्ध पद्धतीने नीट समजून घेऊन कोणतेही कार्य केल्यास तेथेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर केला असे होईल व हेच खरे विज्ञान आहे. कारपेंटर म्हणजे सुतार, गवंडी, रोडमोटर मेकॅनिक हे सगळेच शाळेत जाऊन शिक्षण घेतलेले नाहीत पण ते आपल्या कौशल्याच्या आधारे, योग्य प्रकारे कार्य करून ते आपला रोजगार मिळवतात. नकळत त्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिक असतो. ते शिस्तबद्ध पद्धतीने करतात व अशा तरुणांना आणखी प्रशिक्षण दिल्यास ते नावीन्यपूर्ण काहीतरी आपल्या कौशल्यात भर घालतील.
मोठे मोठे शेफ (स्वयंपाकी) – त्यांची कौशल्ये यांची सुरुवात स्वयंपाकघर या प्रयोगशाळेपासून होते व पुढे ते प्रशिक्षण- शिक्षण घेऊन चांगले शेफ म्हणून नावारूपाला येतात. ही आवड व कौशल्ये काही व्यक्तींमध्ये असतात. ते कॅटरींगचा व्यवसाय चांगल्या रीतीने करू शकतात. आपले स्वतःचे हॉटेल व उद्योग करू शकतात. ही आवड व क्षमता काही जणांमध्ये लहानपणापासून दिसून येते. अशा मुलांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ती चांगल्या प्रकारे आत्मनिर्भर होतील. - लॉकडाऊनचा काळ कसा गेला?
लॉकडाऊनच्या काळात आमच्या युवकांनी आत्मपरीक्षण करून नवीन उद्योग सुरू केले. या काळात काही युवकांनी आपली नोकरी गमावली पण धैर्य न सोडता त्यांनी आपली कौशल्ये जाणून दुसरा उद्योग सुरू केला व खर्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल केली.
या काळात सर्वजण घरीच असल्याने काही गृहिणींनी नवीन नवीन पदार्थ करून बघितले व त्यामधूनच त्याच्यामधील पाक-कौशल्याची जाणीव होऊन त्यांनी कॅटरींगचा व्यवसाय सुरू केला. घरपोच खाण्याचे घरगुती पदार्थ व त्यात त्यांना गती आली व एका गृहिणीने आम्हालासुद्धा पदार्थ पाठवून दिले व आपली ऑर्डर नोंदवली.
काही तरुण-तरुणींनी हँडमेड दागिने करण्याचा उद्योग केला व आपले आत्मकौशल्य जाणून घेतले व त्यांना यात गती मिळते आहे.
काही तरुण शेती व नर्सरी व्यवसायाकडे वळले. भाजीपाला व इतर छोटी छोटी पिके घेऊ लागले. काही घरपोच भाजीपाला पोचवू लागले. त्यांच्या कार्यात लवचिकता दिसून आली. त्यांनी यामध्ये आणखी त्या प्रकारचे प्रशिक्षण घेतल्यास ती स्वावलंबी व आत्मनिर्भर होतील.
हा कठीण काळसुद्धा आमच्या तरुण मंडळींना प्रेरणा देऊन गेला.
वैज्ञानिक दृष्टिकोन –
कोणतीही गोष्ट असो वा कृती असो, ती शिस्तबद्धपणे केल्यास त्यास सायन्स किंवा शास्त्र असे म्हणतात. ते पावलो-पावली दिसून येते आणि तसे न केल्यास आपली प्रगती अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो.
वैज्ञानिक दृष्टिकोनात – आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. वेळेचे व पैशांचे नियोजन केले पाहिजे. कृती ठरवली पाहिजे व नंतर मूल्यांकन केले पाहिजे व पुन्हा कृती करून त्यातील त्रुटी भरून काढून पुढे वाटचाल केली पाहिजे.
म्हणून आम्ही सदा सकारात्मक विचार करून त्यायोग्य ते नियोजन करूया व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करू या व आमच्या माननीय पंतप्रधान मोदीजींचे ‘आत्मनिर्भर’ भारताचे स्वप्न साकार करू या.
ध्येय — नियोजन — कृती — मूल्यांकन — पुन्हा कृती व यशाची वाटचाल करूया.