- निकिता चोडणकर
गोवा विज्ञान परिषदेने मुलांमध्ये विज्ञानाबाबत जनजागृती व्हावी तसेच वैज्ञानिक चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष आणि कौतुकास्पद पाऊल उचलत दरवर्षीप्रमाणे विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावर्षी हा महोत्सव १५ जानेवारी रोजी सुरू झाला असून १८ जानेवारी रोजी महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे.
माणसाच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाशी निगडित असते. म्हणूनच शैक्षणिक अभ्यासक्रमातील महत्त्वाचा घटक म्हणून या विषयाकडे पाहिले जाते. पण मुलांना मात्र शाळेतला सगळ्यात अवघड विषय विज्ञान हा वाटतो. त्यांना या विषयाबद्दल रुची कमी आणि भीति जास्त वाटते आणि काहीतरी करून पास होण्यासाठी बर्याचदा पाठांतर करून, विषय समजून न घेता मुले या विषयाचा अभ्यास करतात. पण खरे पाहता विज्ञानासारखा रंजक आणि आकर्षक दुसरा विषय नाही. आपल्या रोजच्या आयुष्यात वापरात येणार्या प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक कृतीमागे विज्ञान आहे. या सगळ्याची प्रक्रिया खूप सहज आणि सोप्या पद्धतीने जर शिकावयास मिळाली आणि विविध माध्यमातून ती उलगडत गेली तर मुलांना यात गोडी निर्माण होईल. नेमकी हीच गरज ओळखून गोवा विज्ञान परिषदेने मुलांमध्ये विज्ञानाबाबत जनजागृती व्हावी तसेच वैज्ञानिक चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष आणि कौतुकास्पद पाऊल उचलत दरवर्षीप्रमाणे विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावर्षी हा महोत्सव १५ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत पार पडला. १८ जानेवारी रोजी महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे.
या महोत्सवात गोवा सरकारसह राज्यातील विज्ञानाशी निगडित विविध संस्थांनी पाठिंबा दर्शविला. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत आयोजित प्रदर्शनात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी; राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र; भारतीय कृषी संशोधन परिषद; भारतीय वैज्ञानिक गॅलरी; न्यू एज टकक्नॉलॉजी, आयआयटी मुंबई; सेरन्स ऑफ सायन्स फॉर दीर्घायु- आयुर्वेद कॉलेज- शिरोडा आणि न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याशी निगडित गोष्टींचे प्रदर्शनही येथे आयोजित करण्यात आले.
महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या खास उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाचे आयोजन करण्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
गोमंतकीय मुलांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून ‘साय फी‘सारखे महोत्सव गोव्यात आवर्जुन आयोजित केले जातात हे पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. दरवर्षी साय-फी या महोत्सवाच्या आयोजनाची पातळी जास्त उंचावर जात आहे हीसुद्धा माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. शास्त्रज्ञ आणि चित्रपट आणि कार्यशाळांद्वारे आणि सृजनात्मकतेचा आधार घेत भारतीयांनी मोठी प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती आणि जाणीव करून देत त्यांना योग्य करिअरचा मार्ग निवडावा आणि स्वतःला आणखी सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त करावे, हा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या शाळांमध्येसुद्धा विज्ञानाशी निगडित फिल्ड ट्रीप म्हणजेच सहलींचे आयोजन होणे आवश्यक झाले आहे. तसे या सहलींच्या माध्यमातून ते आयोजित करुन वैज्ञानिक संस्थांना भेटी देऊन विज्ञानाची माहितीही दिली जाणे शक्य असल्याचे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या महोत्सवाबद्दल व्यक्त केले.
भारतीय विज्ञान फिल्म महोत्सवाचे (साय फी) उद्दिष्ट हेच आहे की विविध विज्ञानावर आधारित प्रदर्शने, कार्यशाळा, मास्टर क्लास आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून विज्ञानाची ओळख युवा मनाला करून देण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे. विज्ञान हा केवळ एक महत्त्वाचा विषय नाही तर एक मनोरंजक क्षेत्रसुद्धा आहे, ज्याला भरपूर वाव आहे. संशोधन, विकास आणि शोध यांसारख्या बाबी ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून आणि विविध उपक्रमांतून अत्यंत चांगल्या पद्धतीने उलगडत जातात. यातून गोमंतकीय विद्यार्थी आणि शिक्षक अशा महोत्सवाचा उत्कृष्ट वापर करतील आणि त्यांच्या ज्ञानात यामुळे भर पडेल अशी आशा ही विज्ञान परिषद, गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे यांना या महोत्सवाच्या निमित्ताने व्यक्त केली.
महोत्सवात वैज्ञानिक विषयांवर आधारित विशेष सिनेमे दाखवले जात आहेत. स्क्रिनिंगसाठी निवडलेल्या चित्रपटांमध्ये मिशन मंगल, अंतरिक्षम् ९००० केएम्पीएच्, एव्हरेस्ट (२०१५), व्हायरस (२०१९); टर्मिनेटर; डार्क फॅट (२०१९); जिओस्टॉर्म (२०१७), आमोरी (२०१९), आय एम् लिजंड आणि एज ऑफ टुमॉरो यांचा समावेश आहे.
महोत्सवात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये आयआरआरएस-इस्रो सेंटर, देहरादूनचे संचालक डॉ. प्रकाश चौहान यांचाही समावेश होता. बरेच लोक गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांपासून भीतिपोटी दूर पळत असतानाही, त्यांना विज्ञानाच्या जवळ आणण्याची तसेच त्यांना वेगळ्या पद्धतीने या विषयांबाबत माहिती करून देण्याची आपली जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
लहान मुलांना आवडतील अशा ढंगात मास्टर क्लास घेणे अत्यंत आवश्यक असते. मुलांना अशा वेगळ्या पद्धतीने मास्टरक्लासचे आयोजनही या महोत्सवात करण्यात आले.
चार दिवसीय महोत्सवात तीन मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला मास्टर क्लास १६ रोजी दुपारी थिओडॉन टेक्नॉलॉजीज येथील
चार दिवसीय महोत्सवात तीन मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला मास्टर क्लास १६ रोजी दुपारी १२.१५ ते १.३० पर्यंत थिओडॉन टेक्नॉलॉजीज येथील राजदीप पॉल यांनी घेतला. १७ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत सकट शेकररे यांनी मास्टर क्लास घेतला. त्यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ६वाजेपर्यंत एसआरटीएफआयचे प्रतिनिधित्व करणारे अमरेश चक्रवर्ती यांच्यासह दोघांनी एटीएलॅब्सच्या इनोव्हेशन्स आणि एंटरप्रेन्योरशिप याविषयावरील सेशन घेतले. ईएसजी येथे ऑडी क्र. २ मध्ये सर्व मास्टर क्लास महोत्सवादरम्यान सुरूच होते.
महोत्सवात गोव्यातील विज्ञान शिक्षणाबाबतची आव्हाने आणि भविष्यातील संभावना या विषयावरील शिक्षकांसाठीच्या कार्यशाळेचे उद्घाटन गोवा शिक्षणसंचालनालयाच्या संचालक, आयएएस. वंदना राव यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी)चे प्रख्यात व्यक्तिमत्त्व पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी विज्ञान शिक्षण – त्याची भूमिका व जबाबदार्या यांचे विशेष मार्गदर्शन महोत्सवात ऐकायला मिळाले.
विज्ञानाच्या प्रचारासाठी विज्ञानावर आधारीत चित्रपट प्रभावी आहेत. हे चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकांना विज्ञानाबाबत माहिती देतात, अशा महोत्सवांमुळे प्रेक्षकांमध्ये वैज्ञानिक मनोवृत्ती निर्माण होण्यास मदत होते आणि त्यामुळे देशाच्या समावेशक विकासाची पूर्वस्थिती असलेल्या विश्लेषक विचारांना आकार मिळण्यास मदत होत असल्याचे सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय)च्या संचालक डॉ. देबमित्रा मित्रा यांनी सांगितले.
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (जीबीएसएचएसई)चे सचिव भागीरथ शेट्टी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)चे संचालक नागराज होन्नेकेरी, विज्ञान भारती (विभा)चे आयोजन सचिव जयंतराव सहस्त्रबुद्धे, (सारस्वतविद्यालय) पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक कला, विज्ञान व वाणिज्यच्या प्राचार्य सुप्रिया नेत्रावलकर आणि श्रीमती. पार्वतीबाई चौगुले कला व विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जी. के. नाईकयांची उपस्थिती असणारे परिसंवादाचे सत्र विद्यार्थ्यांना खूप आवडले.
पहिल्या दिवसाच्या उत्तम प्रतिसादानंतर महोत्सवाचा दुसरा आणि तिसरा दिवसही उत्तम सुरु झाला साय-फीच्या दुसर्या दिवसाची सुरुवात अनेक कार्यशाळा, तसेच विज्ञानाशी संबंधित संकल्पनेवर आधारलेल्या कार्यशाळा आणि चित्रपटांच्या स्क्रिनिंगसह झाली.
राकेश राव यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द क्लायमेट चेंज’ या चित्रपटाने झाली. वैज्ञानिक आणि दिग्दर्शक यांना यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले, ज्याची उत्तरे त्यांना देण्यात आली. एसआरएफटीआयच्या संचालक डॉ. देबमित्रा मित्रा यांनी यावेळी चित्रपटनिर्मिती आणि करिअरच्या संधी या विषयावर माहिती दिली. यानंतर एनपीसीओआरचे डॉ. अविनाश कुमार यांनी ‘हवामान बदलाचे कारण व परिणाम’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. रोहित श्रीवास्तव यांची ‘पोलर रीजनवर इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल क्लायमेट चेंज ऑन इम्पॅक्ट’ या संकल्पनेवर आधारित चर्चा केल्या.
महोत्सवातील नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार संकल्पना आणि चर्चासत्रामुळे महोत्सवाची लोकप्रियता आणि दर्जा दिवसेंदिवस वाढतो आहे. १८ जानेवारी रोजी म्हणजेच आज महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी ‘विज्ञान संवादातील समाजापुढील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. ज्यामध्ये सीएसआयआरचे डॉ परमानंद बर्मन, सीएसआयआरच्या डॉ. मेहेरवाण, सीएसआयआरच्या डॉ. शोभना चौधरी, एसआरएफटीआयचे साईकांत शेखरराय आणि एसआरएफटीआयचे अमरेश चक्रवर्ती प्रमुख असणार आहेत. या सत्राच्या सूत्रधार सौ. शुभदा आचार्य शिरोडकर असणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे पुढील वर्षीही नवीन शोधांची माहिती आणि विज्ञानाशी निगडीत चित्रपट घेऊन हा महोत्सव पुन्हा विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार असल्याचे आवाहन आयोजकांनी दिले आहे.