वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी ही गंभीर बाब ः मुख्यमंत्री

0
9

>> महिला, मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देणार

गोव्यात वेश्या व्यवसायासाठी होणारी महिलांची तस्करी ही अत्यंत गंभीर बाब असून ती थांबायला हवी असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. तसेच या मानवी तस्करीवर आळा घालण्यासाठी केंद्र तसेच अन्य संघटनांच्या मदतीने कडक पावले उचलण्यात येणार असून गोवा महिला व मुलींसाठी अधिक सुरक्षित कसा होईल याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यात वेश्या व्यवसायासाठी होणारी तस्करी थांबवणे या विषयावर राज्य महिला आयोग व ‘अर्ज’ या संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेचे काल पणजीत उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रंजिता पै, महिला आयोगाच्या सदस्य व आमदार डिलायला लोबो, पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणे हा एक फार मोठा गुन्हा आहे. महिलांना देवी, आई, पत्नी, मुलगी, बहिण आदींचे रूप मानले जाते. एका बाजूने आपण महिला शक्तीला वंदन करतो. मात्र, त्याच महिलांना वेश्या व्यवसायातही जाण्यास जबरदस्ती करतो. महिलांचे हे असे शोषण थांबायला हवे, असे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.