एस्कॉर्ट वेबसाईटवर आधारित वेश्याव्यवसाय रॅकेट प्रकरणाच्या तपासासाठी बार्देश तालुक्यातील तीन टॅक्सीचालकांना गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.
गुन्हा अन्वेषण विभागाकडून एस्कॉर्ट वेबसाईटवर आधारित वेश्याव्यवसाय प्रकरणी देशातील विविध भागांतून चार संशयित आरोपींना अटक केली आहे. संशयितांनी महिला पीडितांची ने-आण करण्यासाठी टॅक्सी सेवेचा वापर केल्याचे समोर आले आहे. वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. इमाम सुतार (पाली-बार्देश), उमेश बागली (बेती) आणि झिशान अली शेख (मरड, म्हापसा) यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. गोव्यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या संशयितांनी संबंध असल्याने तिघांचीही चौकशी होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता
यांनी दिली.
गुन्हे शाखेने सय्यद उस्मान (चित्तूर, आंध्र प्रदेश), मोहम्मद मोहब्बुल्ला, (गुडगाव, आंध्र प्रदेश), योगेश कुमार (गाझियाबाद, उत्तरप्रदेश) आणि सुभाष प्रधान (मूळ ओरिसा आणि सध्या रा. नेरुळ) यांना अटक करून वेश्याव्यवसाय प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
संशयित आरोपी एस्कॉर्ट वेबसाईट चालवत होते आणि त्यांनी महिलांची अश्लील छायाचित्रे अपलोड केली होती. त्यांनी वेबसाइटवर एक संपर्क क्रमांक देखील देण्यात आला होता. जो ग्राहक वापरत होते. ग्राहकांच्या पुष्टीनंतर, आरोपींकडून व्यवहार अंतिम करण्यासाठी इतर एजंटांशी समन्वय साधला
जात होता.
आधी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींनी ग्राहकांना रोख, गुगल पे किंवा पेटीएम मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे पेमेंट करून डील फिक्स करून या सेवा सुविधा पुरवल्या. आरोपींनी, तसेच महिलांना ग्राहकांपर्यंत नेण्यासाठी टॅक्सीचालकांनाही कमिशन मिळाले, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक तुषार लोटलीकर करीत आहेत.