कळंगुट पंचायत क्षेत्रात तसेच संपूर्ण मतदारसंघात वेश्या व्यवसाय, मसाज पार्लर आणि बेकायदा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या निषेधार्थ काल सायंकाळी ४ वा. कळंगुट पंचायतचे पंचसदस्य जोजेफ सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली ५०० लोकांचा मोर्चा कळंगुट पोलीस स्थानकावर नेण्यात आला. यावेळी सरपंच पालास्को फर्नांडिस व इतर पंचसदस्य उपस्थित होते.
कळंगुट पंचायत क्षेत्र हे सध्या वेश्या व्यवसायिक आणि मसाज पार्लरमधून चालत असलेल्या अनैतिक व्यवसायाने गाजत आहे. यावर स्थानिकांनी अनेकवेळा आवाज उठविला तसेच सरकारनेही यावर बंदी आणण्याचे प्रयत्न केले, पण तेही फोल ठरले. पोलीसही आपल्या परीने काम करतात पण या दलालाच्या भरतीमुळे त्यांनाही यश मिळत नाही, असे मोर्चेकर्यांचे म्हणणे होते.
यावर बाहेरील राज्यातील युवतींना कळंगुटमध्ये आणून वेश्या व्यवसायात गुंतविले जात असल्याचा आरोप जोजेफ सिक्वेरा यांनी केला. यावर त्वरित कारवाई केली नाही तर यावर आवाज उठविला जाईल, असेही त्यांनी सांगितले. आजचा मोर्चा कळंगुट पंचायतकडून सुरू होऊन कळंगुट पोलीस स्थानकापर्यंत गेला. नंतर सरपंच फर्नांडिस, पंच सिक्वेरा व काही ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक राजेशकुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी ५०० नागरिक मोर्चात सामील झाले होते.