वेश्याव्यवसायप्रकरणी एकास अटक, चार युवतींची सुटका

0
25

>> बागा येथे हणजूण पोलिसांची कारवाई

बागा-हडफडे येथील टेकडीवर असलेल्या एका हॉटेलवर शनिवारी मध्यरात्री हणजूण पोलिसांनी छापा टाकत चार पीडित युवतींची सुटका केली आहे. तसेच याप्रकरणाशी संबंधित प्रवीण निवृत्ती बोराटे (३१, पंतनगर- घाटकोपर-मुंबई) या प्रमुख दलालाला ताब्यात घेतले आहे. त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. सुटका केलेल्या चौघां परप्रांतीय तरुणींची सध्या मेरशीच्या सुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरज गावस यांनी दिली.

राज्यातील पर्यटन हंगाम सुरू होत असल्याची संधी साधत वेश्याव्यसायाशी संबंधित अनेक परप्रांतीय दलाल किनारी भागात सक्रीय झाल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार बागा हडफडे येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक स्नेहा सावळ, हेडकॉन्स्टेबल श्यामसुंदर पार्सेकर, विवेकानंद दीवकर, महिला कॉन्स्टेबल. प्रज्ञा नाईक, पूजा नाईक आदींंनी भाग घेतला. ही कारवाई शनिवारी रात्री दीडपर्यंत सुरू होती.