मंत्री सुरेश प्रभूंची ऑफर; प्रकल्प खर्चाच्या २ % देण्याचा विचार
‘निर्धारित वेळेत काम पूर्ण करा, आणि प्रकल्प खर्चाच्या २ टक्के रक्कम बक्षीस मिळवा’ ही योजना आहे नव्याने केंद्रीय रेल्वे मंत्रीपदाचा ताबा स्वीकारलेले सुरेश प्रभू यांची. हे बक्षीस त्या प्रकल्पावर काम करणारा प्रमुख व त्याच्या टीमला दिले जाईल. रेल्वेचे रखडलेले अनेक प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यासाठी प्रभू यांनी ही उपाययोजना केली आहे. दरम्यान, मुदतीत काम झाले नाही तर मात्र कर्मचार्यांना दंडही होऊ शकेल, तसेच त्यांच्या गोपनीय अहवालात त्याची नोंद केली जाईल.
मंत्र्यांनी रेल्वे मंडळाला हा प्रस्ताव धाडला असून मंडळ त्याला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया करीत आहे, असे कळते. गेल्या ३० वर्षांच्या कालावधीत रेल्वेचे एकुण ६३७ प्रकल्प मंजूर झाले होते. त्यासाठी रु. १, ५७, ८८३ कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. दरम्यान, त्यापैकी केवळ ३१७ प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित ३५९ प्रकल्पांसाठी आता रु. १, ८२, ००० कोटींची गरज लागेल. दरम्यान, गेल्या रेल्वे अर्थसंकल्पावेळी निधीच्या कमतरतेमुळे ३० महत्त्वाचे प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, प्रकल्प छोटा असेल तर बक्षीसाची किंमत २ टक्क्यांपेक्षा कमीही असू शकते. मंत्री बनल्यानंतर प्रभू यांनी रेल्वे अधिकार्यांच्या बैठका घेणे सुरू केले असून अधिकार्यांची मानसिकता बदलून त्यांना अधिक कार्यक्षम बनविण्याकडे त्यांचा कल आहे. नुकत्याच झालेल्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत त्यांनी वरील प्रस्ताव मांडला आहे.
रेल्वेला सध्या निधीची चणचण भासत आहे. त्यावर उपाय म्हणून प्रभू यांनी रेल्वेच्या जमिनी तारण ठेऊन निधी उभारण्याची सूचनाही केल्याचे कळते. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडे असलेल्या देशातील मालमत्तेचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, रेल्वे बोर्डाची लवकरच पुनर्रचनाही केली जाणार आहे. शिवाय रेल्वे बोर्डाकडे असलेल्या अधिकारांचे विकेंद्रीकरणही केले जाणार आहे. यापुढे निविदा व अन्य व्यावसायिक कामे विभागीय सरव्यवस्थापकांच्या पातळीवर केली जाणार असून त्यात मंत्रालयाचा हस्तक्षेप राहणार नाही. रेल्वे बोर्डाला निधीसंबंधी एक श्वेतपत्रिकाही तयार करण्यास सांगितली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय मानकांनुसार रेल्वेला घडविण्यसाठी आराखडाही तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, रेल्वेमंत्री प्रभू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जी – २० परिषदेला जात असून ते परत आल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.