वेळीच संपवा

0
7

मुंबईतील राजकीय नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरोखरच सिद्दिकी यांची हत्या ह्या टोळीने केली आहे की हे एखादे वेगळे प्रकरण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु ह्यानिमित्ताने बिश्नोई टोळीची वाढती दहशत आणि देशभरात पसरलेले तिच्या साथीदारांचे जाळे पाहता ह्या काट्याचा नायटा होण्याआधीच तिचा नायनाट करण्याची गरज मात्र नक्कीच निर्माण झालेली आहे. एक काळ होता, जेव्हा मुंबईवर गुन्हेगारी टोळ्या राज्य करायच्या. छोट्या मोठ्या प्रकरणांपासून सुरूवात केलेली दाऊद इब्राहिमची टोळी मग खून, खंडण्या, अपहरणे असे करीत करीत
बॉम्बस्फोटमालिकेसारख्या दहशतवादी कृत्यांपर्यंत कशी जाऊन पोहोचली हे आपण पाहिलेच आहे. सध्याच्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचे कारनामेही अशाच प्रकारे एकेक सीमा पार करीत दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करू लागलेले दिसत आहेत. त्यामुळे भारत सरकारने ह्या टोळीच्या अमेरिका आणि कॅनडामधून सूत्रे हलवणाऱ्या सूत्रधारांना चाप लावण्याची आत्यंतिक गरज निर्माण झालेली आहे. अन्यथा एक दिवस हे प्रकरण गळ्याशी आल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या नावे ह्या टोळीला ओळखले जाते, तो लॉरेन्स बिश्नोई हा अवघ्या 31 वर्षांचा तरूण आहे आणि गेली काही वर्षे गुजरातमध्ये साबरमती तुरुंगात कैदेत आहे. विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वापासून सुरू झालेला त्याचा प्रवास गँगस्टरपर्यंत येऊन ठेपला आहे. परंतु त्याचे विदेशस्थ साथीदार अमेरिका आणि कॅनडाच्या भूमीत सुरक्षित राहून तेथून भारतात कारवाया करीत आहेत. आज देशातील किमान अकरा राज्यांमध्ये ह्या बिश्नोई टोळीच्या कारवाया चालल्या आहेत आणि तब्बल सातशे शूटर त्यांच्या टोळीत आहेत अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या तपासात समोर आलेली आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या गोव्यातही जोधपूरच्या एका व्यावसायिकाकडून खंडणी उकळून गोव्यात कॅसिनोत मौजमजा करणारा बिश्नोई टोळीचा एक साथीदार पकडला गेला होता. आपल्या देशात बेरोजगारांची कमी नाही. त्यामुळे पैशाची आमिषे दाखवून त्यांना आपल्या टोळीत सामील करून घेणे आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर सोपे झालेले आहे. शिवाय आपली न्यायव्यवस्था गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरलेली असल्याने हे लोक निर्ढावले आहेत. पोलिसांची आणि न्यायालयाची तमा न बाळगता काही लाख रुपयांसाठी एखाद्याचा जीव घेण्यासही जर हे कोवळे गुन्हेगार कचरत नसतील, तर त्याचा अर्थ आपल्याला आपल्या गुन्ह्याची सजा हे लोक देऊ शकणार नाहीत ह्याची खात्रीच ह्या गुन्हेगारांना वाटत असावी. सध्याच्या सिद्दिकी प्रकरणात बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगणारी जी पोस्ट सोशल मीडियावर प्रसृत झाली, त्यामध्ये जणू आपण एखादे देशभक्तीचे काम पार पाडल्याची शेखी मिरवली गेलेली दिसते. एखाद्याचे प्राण घेणे ही देशभक्ती कशी काय ठरू शकते? सलमान खान काळवीट शिकार प्रकरणाची पार्श्वभूमी ह्या प्रकरणाला असल्याचे सांगितले जात आहे. ते प्रकरण 1998 सालचे. सलमान खानला त्या गुन्ह्याची सजा होऊ शकलेली नाही हेही वास्तव आहे. परंतु सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न, मुंबईतील घरावरील गोळीबार आणि आता त्याच्याशी जवळीक असलेल्या बाबा सिद्दिकीची हत्या ह्या घटना हे त्या काळवीट प्रकरणाचे सूडसत्र आहे की हा बॉलिवूडवर आणि पर्यायानेे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर खंडणीखोरीसाठी आपली दहशत बसवण्याचा प्रयास हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बिश्नोई टोळीने आजवर अनेक हायप्रोफाईल गुन्हे केलेले आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येपासून करणीसेनेचा प्रमुख सुखदेवसिंग गोगामेडीपर्यंतच्या हत्या अत्यंत निर्घृणपणे आणि कोणतीही दयामाया न दाखवता घडविल्या गेल्या. खुद्द बिश्नोईवर दोन डझनांहून अधिक गुन्हे नोंद आहेत. एनआयएने त्याच्यावर यूएपीएखाली खटला भरलेला असला, तरी त्याचे जे विदेशस्थ सूत्रधार आहेत, ते भारतीय तपासयंत्रणेच्या कार्यकक्षेपासून दूर असल्याने आपला केसही कोणी वाकडा करू शकणार नाही ह्या भ्रमात आहेत. कॅनडा हा देश तर भारतविरोधी धोरणांसाठीच ओळखला जातो. शिवाय खलिस्तानवाद्यांचा तो अड्डा बनलेला आहे. अशावेळी भारतातील एका गुन्हेगारी टोळीचे हस्तक त्या देशात आश्रयाला असणे हे भविष्यात अतिशय धोकादायक ठरू शकते. दाऊद टोळीचे वारसदार आपल्याला पुन्हा निर्माण होऊ द्यायचे आहेत काय? नसेल तर भारत सरकारने अगदी प्राधान्यक्रमाने ह्या वाढत्या गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून फेकावीत आणि हे जे दहशतीचे नवे पर्व सुरू झाले आहे ते संपुष्टात आणावे.