वेळसाव प्राणघातक हल्ला प्रकरणी 10 जणांना अटक

0
10

वेळसांव येथे तीन जणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी गोंयचो रापोणकरांचो एकवोटच्या दहा सदस्यांना अटक केली. पोलिसांनी गुरुवारी रात्री 10 वाजल्यानंतर अटकसत्राला सुरुवात करून शुक्रवार पहाटेपर्यंत सर्वांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. हा हल्ला रेल्वे दुपदरीकरण प्रकरणावरुन झाला होता, असे मुरगाव तालुका पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी सांगितले.

सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री दहा वाजता फ्रान्सिस्को ब्रागांझा, अँथनी डिमेलो, कॅजी डिमेलो, जोकिम फर्नांडिस, फेलिक्स व्हिन्सेट, रेमंड फर्नांडिस, फिलिपो टिओडोसिओ, बॅप्टिस्ट डिमेलो, आग्नेलो फर्नांडिस व मेनिनो फर्नांडिस आणि इतर अज्ञात संशयितांनी चाकूसारख्या घातक शस्त्रांनी, काचेच्या बाटल्या आणि इतर वस्तूंनी हल्ला केला होता. फ्रान्सिस्को ब्रागांझाने ॲलिस्टो पिंटो याच्या नाकावर बिअरच्या काचेच्या बाटलीने हल्ला केला होता. त्यात पिंटो गंभीर जखमी झाला होता. आरोपी अँथनी डिमेलो याने पिंटो यांच्या दिशेने चाकूने वार केला, तर केप डिमेलो याने पिंटो यांना बेदम मारहाण केली होती. याशिवाय सर्व संशयितांनी अन्य वस्तूंद्वारे पिंटो यांच्या क्रिस्टोड रॉड्रिग्स आणि पास्कोल रॉड्रिग्स या मित्रांनाही मारहाण केली आणि त्यांना गंभीर दुखापत केली होती. त्यानंतर त्यांनी तेथून पलायन केले होते. तिन्ही जखमींना त्यांच्या मित्रांनी इस्पितळात दाखल केले होते. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.